सगळे ‘वेस्ट ऑफ इंडिया’

    20-Jul-2023   
Total Views |
article on opposition meeting in bengaluru
मम्मी आता ’इंडिया’ म्हणून आपण त्या मोदी अंकलना टूक-टूक करून दाखवू! आता ते आपल्या आणि आपल्या मित्रपक्षांच्या विरोधात काहीच बोलू शकणार नाहीत ना? कारण, ते काहीही बोलले, तरी ’इंडिया’च्या विरोधात बोलले, असेच म्हटले जाणार. मग सगळे ‘इंडियन’ भडकणार! मग ते मोदी अंकलला सोडून आपल्याकडे येणार ना मम्मा, ’ब्रिलिंयट आयडिया!’आपल्या सगळ्या पक्षांच्या एकीला ’इंडिया‘ नाव ठेवले, तर लोक मी परदेशात जाऊन ’इंडिया’ विरोधात काय बोलतो, ते विसरतील का गं? ‘इंडिया‘मध्ये विषमता आहे, हिंसाचार आहे, अल्पसंख्याक आणि दलितांबद्दल वाईट वातावरण आहे, असे मी जे काही बोलत असतो, ते ‘इंडिया’चे लोक विसरतील का? मी कधी जानवं घालून ब्राह्मण होतो, कधी इस्लामचा कैवारी होतो, तर कधी येशूचा सेवक होतो. भोळाभाबडा असण्याची अ‍ॅक्टिंग करतो. ’मोहब्बत की दुनिया’, ‘सर्वधर्मसमभाव,’ म्हणत राहतो. सगळ्या लोकांना खरे वाटते का गं मम्मा? जाऊ दे मला; पण माहिती आहे की, यापैकी एकाबद्दलही लोक माझ्यावर विश्वास ठेवत नाहीत.मम्मा, तुला एक गंमत सांगू. ते जेव्हा बंगळुरूमध्ये सगळ्या पक्षांच्या एकत्रीकरणाला ‘इंडियन नॅशनल डेव्हलपमेंटल इन्क्लुझिव्ह अलायन्स’ म्हणाले ना तेव्हा मला वाटले, हे इतके मोठे नाव, मी लक्षात कसं ठेवणार? बरं झाल ’इंडिया’ हे नाव घ्यायच ठरवलं. थॅक्स अ लॉट. हं एक सांगायचं राहिलं. ‘इंडिया’च्या स्पेलिंगमध्ये पहिले अक्षर ’आय’ येते. ते ’आय’ म्हणजे आपल्या आजीचे गाव इटली होऊ शकते का गं? पूर्वी म्हणे ’आय’ म्हणजे आपल्या दादीचं नावसुद्धा घ्यायचे ना? ‘आय फॉर इंदिरा‘ नाही-नाही ‘इंदिरा इज इंडिया,‘ असे पण म्हणायचे ना? आता हा अख्खा ’इंडिया‘ पक्ष मोदींच्या विरोधात उभा राहणार आणि जिंकणार. पण, मग भारत देश कुणाच्या बाजूने आहे? हे कोण म्हणतय, भारत देश मोदी अंकलच्या सोबत आहे. पण, आपला ’इंडिया‘ पक्ष मोदींच्या विरोधात आहे ना? म्हणजे भारत देश मोदी अंकलसोबत म्हणजे ‘भारत’ विरोधात आपला ‘इंडिया’ पक्ष आहे? मम्मा लोक म्हणतात, ती कुणी लुटारू ’ईस्ट इंडिया कंपनी’ होती, तशी आपली ’वेस्ट इंडिया कंपनी’ आहे. मला हेसुद्धा चालेल. आपली इटली ‘वेस्ट’मध्येच येते. पण, मम्मा ते बघ कुणीतरी पुन्हा काय म्हणतात की, ‘वेस्ट‘ म्हणजे ’पश्चिम’ नाही, तर ’वेस्ट’ म्हणजे ’कचरा’? सगळे ’वेस्ट ऑफ इंडिया‘?

जित्याची खोड...

मणिपूरमधल्या त्या संतापजनक व्हिडिओने समाजात संतापाची लाट उसळली. दोन जमातींच्या संघर्षातून एका समाजातील काही लोकांनी दोन महिलांची नग्न धिंड काढणे, सामुदायिक बलात्कार करणे, हे सगळे-सगळे अत्यंत भीषण आणि माणुसकीला काळीमा फासणारे. याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खेद व्यक्त करून दोषींवर कारवाई करण्याची ग्वाही दिली आहे. मात्र, या सगळ्या घटनेवरून ‘मानवतेशिवाय तुझा गौरव व्यर्थ आहे,’ असे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे वचन शरद पवार यांनी ट्विट केले म्हणे. यावरून एकच वाटते की, कठीण समय येता कोण कामासी येते? असा प्रश्न जेव्हा-जेव्हा शरद पवार आणि त्यांच्या विचारांच्या लोकांना पडला, तेव्हा-तेव्हा शाहू, फुले, आंबेडकर त्यांना आठवतात. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची आणखीही खूप काही वचने आहेत, जी शरद पवार आणि त्यांच्यासारख्या लोकांनी कायम स्मरणात ठेवून तसे वागले असते, तर महाराष्ट्राचे खरेच नंदनवन झाले असते.जसे डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते की, “मी प्रथम भारतीय आणि अंतिमतः भारतीय.“ ना मी कोणत्या जातीधर्माचा, मी फक्त भारतीय असा अर्थ असणारे, हे वचन शरद काकांना माहिती आहे का? व्यक्तिपूजा करू नका, असेही डॉ. बाबासाहेब म्हणाले आणि त्यावर ते ठामच होते. तसेच, बाबासाहेबांचा घराणेशाहीलाही विरोध होता. घराणेशाहीविरोधात वेळोवेळी त्यांनी भूमिकाही मांडली होती. शरद पवार कधीही बाबासाहेबांचे विचार मांडताना दिसले नाहीत. असो, मणिपूरमधल्या घटनेबद्दल कोणत्याही संवेदनशील माणसाला दुःखच होते. मात्र, महाराष्ट्रीयन म्हणून आपल्याच महाराष्ट्रातली खैरलांजेची, ती सामुदायिक बलात्काराची घटना आणि पीडित भोतमांगेचा आक्रोश, गोवारी हत्याकांड आणि आता आता कोरोना काळातले मनसुख प्रकरण आणि पालघर साधू हत्याकांड सगळे-सगळे भयानक आपत्तीकारक. शरद पवार सत्तेत सहभागी असण्याच्याच काळातले. पण, या सगळ्या घटनांबद्दल पवार काय म्हणाले? “मणिपूरमध्ये न्यायासाठी एकत्र या,“ असे ट्विट मध्ये ते म्हणाले. पण, महाराष्ट्राच्या त्यांच्या कारकिर्दीतील या भयानक घटनांविरोधात जनतेने एकत्र या, असे ते म्हणाल्याचे आठवत नाही. शेवटी माणुसकी आणि न्यायही सत्तास्वार्थासाठीच वापरायचे असतात, हे पवारांचे गणित पूर्वीही होते आणि आताही आहेच? शेवटी जित्याची खोड...



आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

योगिता साळवी

एम.ए. समाजशास्त्र. सध्या मुंबई तरुण भारत  येथे वार्ताहर-उपसंपादक पदावर कार्यरत. राजकीय कार्यकर्ता म्हणून प्रदीर्घ अनुभव. विविध सामाजिक प्रश्‍नांच्या अभ्यासाची आवड व लिखाण. वस्त्यांचे वास्तव हे मुंबई तरुण भारतमधील लोकप्रिय सदराच्या लेखिका.