मुंबई : ज्येष्ठ निरूपणकार पद्मश्री डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांना ‘महाराष्ट्रभूषण’ सन्मानाने गौरविण्यात आले. या पुरस्कार सोहळ्याच्या निमित्ताने मनोगत व्यक्त करताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, जगात खरे श्रीमंत तुम्ही आहात. तुमच्यापेक्षा श्रीमंत कोणीच नाही. इथे जमलेले लोक हे जगातील आठवं आश्चर्य असल्याचे फडणवीस म्हणाले. कपडे खराब झाले तर धुता येतात. पण मन स्वच्छ कसं करायचे. हे मन स्वच्छ करण्याचे रसायन आहे, जी कला आहे ती कला आप्पासाहेबांच्या शब्दांमध्ये असल्याचे फडणवीस म्हणाले. ते महाराष्ट्र भूषण आहेतच.
जगात सात आश्चर्ये आहेत. मात्र श्री सदस्यांची ही अलोट गर्दी हे जगातील आठवे आश्चर्य आहे. पैशापेक्षाही खरी श्रीमंती काय हे या श्री परिवाराकडे आणि उपस्थित श्रीसदस्यांकडे बघून समजते. निरुपणाच्या माध्यमातून सकारात्मक विचार करण्याची ऊर्जा दिली जाते. मन स्वच्छ करण्याची अद्भुत कला आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्याकडे आहे. विविध सामाजिक कार्याच्या माध्यमातून धर्माधिकारी कुटुंबीय व प्रतिष्ठान करीत असलेले कार्य महान आहे. वृक्षारोपण, स्वच्छता, महिला सशक्तीकरण, व्यसनमुक्ती, रक्तदान अशा अनेक क्षेत्रात त्यांचे उत्तुंग काम आहे. देश-विदेशातही त्यांचे मोठे सामाजिक कार्य आहे.
आपली भारतीय संस्कृती महान आहे. या संस्कृतीचे आप्पासाहेबांच्या माध्यमातून अद्भुतरित्या जतन आणि संवर्धन होत आहे. आप्पासाहेब स्वारीना प्रदान करण्यात आलेल्या महाराष्ट्र भूषण पुरस्काराचे महत्व आज निश्चितच वाढले आहे, असेही उपमुख्यमंत्री फडणवीस सांगितले.यावेळी फडणवीसांनी बोलताना धर्माधिकारी नावाचा इतिहास आपल्या वाचनात आल्याचं सांगितलं. आप्पास्वारी माझ्या एक गोष्ट वाचण्यात आली की मुळात आपल्या घराण्याचा इतिहास साडेचारशे वर्षांचा आहे. आपल्या आठ पिढ्यांपूर्वी गोविंद चिंतामण शांडिल्य हे महाराजांच्या काळात धर्मजागृतीचं काम करत होते.त्या कामाचं स्वरूप पाहिल्यानंतर महाराजांच्या आरमाराचे प्रमुख कान्होजी आंग्रे यांनी सांगितलं की आपण केवळ शांडिल्य नाही आहात तर आपण धर्माधिकारी आहात. तेव्हापासून महाराजांच्या प्रेरणेनं हे ‘धर्माधिकारी’ नामाबिरूद लागलं. तिथपासून पिढ्यान् पिढ्या हे धर्मजागरणाचं कार्य आपल्या माध्यमातून होतंय, असं फडणवीस म्हणाले.