मुंबई : महाराष्ट्रातील कोळीवाड्यांमधील मच्छीमारांच्या मुलांसाठी आता सागरी खेळांच्या प्रशिक्षणाची एक अनोखी संधी उपलब्ध झाली आहे. 'यॉटिंग असोसिएशन ऑफ महाराष्ट्र' आणि राज्य सरकारच्या 'मत्स्यव्यवसाय व बंदर विभागा'च्या संयुक्त विद्यमाने, सर्फिंग, सेलिंग आणि स्टँड-अप पॅडल बोर्डिंगसारख्या खेळांचे प्रशिक्षण अत्यंत माफक दरात दिले जाणार आहे.
नुकत्याच झालेल्या राष्ट्रीय खेळांमध्ये (नॅशनल गेम्स) महाराष्ट्राने ६ पदके पटकावली, ज्यात 'याचिंग असोसिएशन ऑफ इंडिया' अंतर्गत मिळालेल्या सुवर्णपदकाचाही समावेश आहे. ही महाराष्ट्रासाठी अत्यंत गौरवाची आणि ऐतिहासिक बाब ठरली आहे. याच यशानंतर, महाराष्ट्राला लाभलेल्या विस्तीर्ण सागरी किनारपट्टीचा पुरेपूर उपयोग करून, कोळी समाजातील मुलांना या खेळांमध्ये प्रशिक्षित करण्याचे महत्त्वाकांक्षी उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. त्यांना आशियाई खेळ (एशियन गेम्स) आणि ऑलिम्पिकसारख्या आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये सहभागी होण्यासाठी सक्षम बनवणे हे यामागील प्रमुख ध्येय आहे.
या महत्त्वाकांक्षी उपक्रमाला मत्स्यव्यवसाय व बंदर विभागाचे कॅबिनेट मंत्री नितेश नारायण राणे यांचा पूर्ण पाठींबा लाभला आहे. त्यांनी प्रशिक्षणासाठी आवश्यक जागा, उपकरणे आणि सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आहे. यामुळे या प्रशिक्षणाला सरकारी पातळीवर अधिक बळकटी मिळणार आहे. हा उपक्रम यॉटिंग असोसिएशन ऑफ महाराष्ट्रचे अध्यक्ष सागर झोंडले, सचिव हेतल काकू, संयुक्त सचिव चेतन सुनील राणे, कमोडोर प्रशांत जाधव आणि संचालिका अनिता म्हात्रे यांच्या उपस्थितीत यशस्वीरित्या पार पडला.