मुंबई : उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शनिवारी वरळीच्या डोम मैदानात झालेला मेळावा राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरला. या मेळाव्याला भाकपचे प्रकाश रेड्डी, राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरदचंद्र पवार गट) सुप्रिया सुळे, जितेंद्र आव्हाड, माकपचे अजित नवले, रासपचे महादेव जानकर, विनोद निकोले आणि भालचंद्र मुणगेकर यांनी हजेरी लावली. मात्र, काँग्रेसने या मेळाव्यापासून जाणीवपूर्वक अंतर राखले. राज ठाकरेंच्या याआधीच्या आक्रमक भूमिकेमुळे बिहारमधील आगामी विधानसभा निवडणुकीत उत्तर भारतीय मतदार नाराज होण्याची भीती काँग्रेसला सतावत आहे. त्यामुळे ठाकरे बंधूंच्या या मेळाव्यापासून काँग्रेसने स्वतःला दूर ठेवले.
मनसेच्या उत्तर भारताबाबतच्या जुन्या वादग्रस्त भूमिकांमुळे बिहार आणि उत्तर प्रदेशात राज ठाकरेंबद्दल नकारात्मक वातावरण आहे. त्यामुळे काँग्रेसला या मेळाव्यात सहभागी होणे जोखमीचे वाटले. बिहारमधील आगामी विधानसभा निवडणुकीत काँग्रेस-राजद आघाडीला याचा फटका बसू शकतो, अशी भीती पक्षाला आहे. काँग्रेसच्या एका वरिष्ठ नेत्याने नाव गुप्त ठेवण्याच्या अटीवर सांगितले, “राज ठाकरेंच्या मराठी अस्मितेच्या मुद्द्यामुळे बिहारमधील मतदारांमध्ये गैरसमज निर्माण होऊ शकतात. म्हणूनच आम्ही सावध पवित्रा स्वीकारला.”
वंचित बहुजन आघाडीने या मेळाव्याकडे पाठ फिरवली. याउलट, हिंदुत्ववादी भूमिकेसाठी ओळखल्या जाणाऱ्या राज ठाकरेंना भारतीय कम्युनिस्ट पक्ष (भाकप) आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष (माकप)च्या नेत्यांचे स्वागत करावे लागले. या नेत्यांना राज यांनी व्यासपीठावर बोलावले, मात्र ही बाब मनसेच्या कार्यकर्त्यांना रुचली नाही. दुसरीकडे, शरद पवार यांनी मेळाव्यास उपस्थित राहणे टाळले, ज्यामुळे महाविकास आघाडीच्या एकजुटीबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
मुंबई स्वतंत्र करता येते का, हे चाचपडून पाहिले - राज ठाकरे
मेळाव्याला संबोधित करताना राज ठाकरे म्हणाले, "कोणताही झेंडा नाही, मराठी हाच अजेंडा आहे. खरेतर हा प्रश्नच अनाठायी होता. कुठून हिंदीचा विषय आला, ते कळले नाही. कशासाठी हिंदी? कुणासाठी? लहान लहान मुलांवर जबरदस्ती का करत आहात? आमच्याकडे सत्ता आहे, आम्ही लादणार! पण, तुमच्या हातात सत्ता असेल ती विधानभवनात. आमच्याकडे सत्ता आहे ती रस्त्यावर. हिंदी भाषेबद्दल मला वाईट वाटत नाही. कुठलीही भाषा श्रेष्ठ आणि उत्तमच असते. एक भाषा उभी करायला प्रचंड तपश्चर्या लागते. एक लिपी उभी करायला प्रचंड ताकद लागते. भाषा अशाच उभ्या राहत नसतात. या संपूर्ण हिंद प्रांतावर सव्वाशे वर्ष मराठ्यांनी राज्य केले. पण इतर प्रांतांवर आम्ही मराठी लादली का? महाराजांच्या काळातसुद्धा हिंदी भाषा नव्हती. याचा अर्थ मुंबई स्वतंत्र करता येते का, हे त्यांनी फक्त चाचपडून पाहिले. आम्ही शांत आहोत याचा अर्थ गांडू नाहीत. माघार घेतल्यानंतर संपूर्ण प्रकरण वेगळ्या ठिकाणी वळवले", असा आरोप राज ठाकरे यांनी केला.
एकत्र आलोय ते एकत्र राहण्यासाठीच – उद्धव ठाकरे
उद्धव ठाकरे म्हणाले की, "बऱ्याच वर्षांनंतर राज आणि माझी भेट व्यासपीठावर झाली. आजच्या कार्यक्रमाची घोषणा झाल्यानंतर सर्वांचे लक्ष या भाषणाकडे आहे. पण मला असे वाटते की, आज आमच्या भाषणापेक्षा आमचे एकत्र दिसणे महत्त्वाचे आहे. आमच्या दोघांमधील अंतरपाट दूर केला. आता अक्षता टाकण्याची तुमच्याकडून अपेक्षा नाही. एकत्र आलोय ते एकत्र राहण्यासाठीच. भाषेचा विषय वरवरचा धरून चालणार नाही. आपण सर्वांनी या नतद्रष्टांचा अनुभव घेतला आहे. वापरायचे आणि फेकून द्यायचे. आता आम्ही दोघे मिळून तुम्हाला फेकून देणार आहोत. डोक्यावर शिवसेनाप्रमुख नसते, तर तुम्हाला महाराष्ट्रात कोण ओळखत होते? भाषेच्या नावाखाली गुंडगिरी सहन केली जाणार नाही. महाराष्ट्रात न्याय मागण्यासाठी मराठी माणूस आंदोलन करत असेल आणि त्याला तुम्ही गुंडगिरी म्हणत असाल, तर आम्ही गुंड आहोत. न्याय मागणे म्हणजे गुंडगिरी नाही," असेही ते म्हणाले.