'निर्मलवारी'मुळे पालखी मार्गावरील गावे ८० % दुर्गंधीमुक्त! ३६०० फिरती शौचालये; हजारो कार्यकर्ते वारकऱ्यांच्या सेवेसाठी तत्पर

    05-Jul-2025   
Total Views |

मुंबई : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि सेवा सहयोग संस्थेच्या पुढाकारातून गेली १० वर्षे निर्मलवारी अंतर्गत स्वच्छता मोहीम राबवली जात आहे. यामध्ये एकूण ३६०० फिरती शौचालये वापरली जात असून आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरमध्ये अतिरिक्त दोन हजार शौचालये बसवण्यात आली आहेत. विशेष म्हणजे पंढरपूरच्या स्थानिक प्रशासनाने २६ हजार सार्वजनिक शौचालये उपलब्ध करून दिली आहेत. निर्मलवारी उपक्रमामुळे पालखी मार्गावरील गावांमधील घाणीत ८० टक्के घट झाली आहे.

निर्मलवारी सुरु करण्यामागचे कारण हे होते की, दरवर्षी आषाढी एकादशीनिमित्त लाखो वारकरी दिंडीत पायी पंढरपूरला जातात. पालखी मुक्कामावर बहुदा सुविधा नसल्यामुळे वारकऱ्यांना उघड्यावर शौचास जावे लागत होते. ज्यामुळे घाण आणि दुर्गंधी पसरत होती. हा प्रश्न सोडवण्यासाठी २०१५ पासून निर्मलवारी मोहीम राबविली जात आहे. त्यामुळे आधुनिक काळात वारी खरोखरच शारीरिकदृष्ट्या स्वच्छ झाली आहे.

निर्मलवारीचे मुख्य समन्वयक संदीप जाधव म्हणाले की, “राज्य सरकारने संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरू संत तुकाराम महाराज, निवृत्तीनाथ महाराज, सोपानकाका यांच्या पालखींसोबत फिरते शौचालये उपलब्ध करून दिली आहेत. त्यांचे व्यवस्थापन, स्वच्छता, वापराचे नियोजन तसेच वारकऱ्यांचे प्रबोधन गेल्या १० वर्षांपासून सेवा सहयोग आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांकडून केले जात आहे. वारी यात्रा स्वच्छ आणि निर्मळ करण्यासाठी स्वयंसेवकांनी पुढे येऊन ही मोहीम सुरू केली. ज्याला आता राज्य सरकार आणि समाजातील विविध संघटनांकडून मोठा पाठिंबा मिळत आहे. दरवर्षी वारी अधिक स्वच्छ आणि निरोगी होत आहे. पालखी थांब्यांवर पसरणारे आजार जवळजवळ संपले आहेत.”

पुढे ते असेही म्हणाले की, गेल्या १० वर्षांत वारीमध्ये उघड्यावर शौचास जाण्याचे प्रमाण ८० टक्क्यांनी कमी झाले. नियमित 'वारी' करणारे वारकरी शौचालयांचा वापर करत आहेत आणि दिंडी चालक आणि स्थानिक नागरिकांकडूनही शौचालयांचा वापर करण्यावर भर दिला जात आहे, ज्याला वारकऱ्यांकडूनही सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे.

हजारो कार्यकर्ते निर्मलवारीसाठी कार्यरत

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि सेवा सहयोगाचे हजारो कार्यकर्ते निर्मलवारीसाठी कार्यरत आहेत. २७ कार्यकर्ते पूर्णकालिक म्हणून सेवा देत आहेत. तसेच प्रत्येक थांब्यावर, रा. स्व. संघाच्या महाविद्यालयीन विभागातील स्वयंसेवक आणि ५० ते ६० सामाजिक कार्यकर्ते व्यवस्था करण्यासाठी तत्पर आहेत. तिथे पाणी, वीज, स्वच्छता इत्यादींबाबत आणि वारकऱ्यांना जागरूक करण्याचे काम केले जात आहे. सोलापूर येथील विठ्ठल शिक्षण संस्था, हिंदू एकता चळवळ, सिंहगर्जना पथक इत्यादींकडूनही पाठिंबा मिळत आहे.

पालकी मार्गावरील मोबाइल शौचालयांची संख्या :

१८०० - संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज
१२०० - जगद्गुरु संत तुकाराम महाराज
३०० - संत निवृत्तिनाथ महाराज
३०० - संत सोपानकाका

ओंकार मुळ्ये

'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक