
मुंबई : वरळी येथील माता रमाई आंबेडकर यांच्या स्मृतीस्थळावर सध्या असलेली साधी पत्र्याची शेड हटवून त्या जागी अष्टकोनी डोम उभारण्याचा निर्णय मुंबई महानगरपालिकेच्या वतीने घेण्यात आला आहे. या कामासाठी माजी मंत्री विजय (भाई) गिरकर यांनी गेली अनेक वर्ष सातत्याने पाठपुरावा केला असून अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश आले आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्नी माता रमाई यांचे २७ मे १९३५ रोजी निधन झाले. त्यानंतर त्यांच्या अंत्यविधीसाठी वरळी येथील स्मशानभूमीतच त्यांचं दहन करण्यात आलं होतं. या वेळी बाबासाहेब आंबेडकर स्वतः उपस्थित होते. त्यानंतर या स्थळी फक्त एक साधी पत्र्याची शेड उभारण्यात आली होती. या स्मृतिस्थळाचे स्मारक म्हणून रूपांतर व्हावे, या हेतूने विजय (भाई) गिरकर यांनी अष्टकोनी डोम उभारण्याची संकल्पना मांडली होती.
या संदर्भात गिरकर आणि सामाजिक कार्यकर्ते मयुर देवळेकर यांनी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त भूषण गगराणी यांची भेट घेऊन डोमचा सविस्तर आराखडा सादर केला. महापालिका आयुक्तांनी या प्रस्तावास सकारात्मक प्रतिसाद देत अष्टकोनी डोम उभारण्याचे निर्देश संबंधित विभागास दिले आहेत.
यानंतर विजय (भाई) गिरकर यांनी जी/दक्षिण विभागाच्या सहाय्यक आयुक्त स्वप्नजा क्षीरसागर यांची भेट घेऊन प्रत्यक्ष कामाची रूपरेषा सादर केली. यावेळी सहाय्यक आयुक्तांनी प्रस्तावित आराखड्यानुसार काम लवकरात लवकर सुरू करण्यात येईल, असे आश्वासन दिले.
या बैठकीस महापालिकेचे सहायक अभियंता राजेशकुमार यादव, मयुर देवळेकर, अमोल साळुंके, सिध्दार्थ खंडागळे, प्रकाश डोळस आदी उपस्थित होते. या निर्णयामुळे रमाई स्मृतीस्थळाच्या सन्मानात भर पडणार असून, हे ठिकाण अधिक आकर्षक आणि स्मरणीय स्वरूप धारण करणार आहे.