वसई : वसई पूर्वेतील शाळांमध्ये आषाढी एकादशी च्या पूर्व दिनी म्हणजेच शनिवारी विठू नामाचा गजर घुमला.शाळांतील विद्यार्थ्यांनी शाळा परिसरात मोठ्या भक्ती भावाने टाळ मृदुंगाच्या तालात भजने गाऊन , शिक्षणाचे महत्व पटवण्यासाठी हाती फलक घेऊन विठुरायाची पालखी दिंडी काढली होती .
पंढरपूर च्या वारीने साऱ्या जगाला अचंबित करणाऱ्या आषाढी एकादशी ची ओढ ही दरसाल सर्वांना लागलेली असते .यासाठी वारकरी साऱ्या भारतातून येत असून विदेशी पाहुणे हे पाहण्यासाठी खास करून येत असतात .त्याला विद्यार्थी कसे अपवाद ठरतील .यासाठी शाळांना यंदा एकादशी ही रविवारी सुट्टीच्या दिवशी आल्याने एक दिवस अगोदर वसई पूर्वेतील विध्यार्थ्यांनी आपल्या परिसरातील गावात पालखी दिंडी काढून वारकरी प्रथा आत्मसात केली .
आषाढी एकादशी म्हटले की डोळ्यासमोर पंढरीच्या वारीचे चित्र उभे राहते. वर्षभरात येणाऱ्या इतर २४ एकादशांपेक्षा या एकदाशीला विशेष महत्त्व आहे. भागवत धर्मात हिला 'महाएकादशी' असे म्हटले जाते. नामस्मरण आणि भक्ती हा ईश्वरप्राप्तीचा सोपा मार्ग भागवत धर्मात सांगितला आहे. तसंच भागवत धर्मात जातीभेद मानत नसल्याने सर्व जाती, पंथांचे लोक एकत्र येऊन पंढरीची वारी करतात. तुकाराम, नामदेव, जनाबाई या संतांनी विठ्ठलभक्तीची महती लोकांपर्यंत पोहचवली आणि तेव्हापासून महाराष्ट्रामध्ये विठ्ठलभक्तीची परंपरा सुरु झाली. सुरु झालेली ही परंपरा वारकरी संप्रदायाकडून अद्याप अखंड सुरु आहे.अश्या ह्या महत्वपूर्ण एकादशीला वसई तालुक्यात मोठे महत्व असून अनेक गावांतून वारकरी असलेल्या या भागातील अनेक शाळांमधून दिंडीचे आयोजन करण्यात आले होते .तर तालुक्यातील अनेक मंदिरांपैकी विरार व वालिव येथील विठ्ठल रुख्माई मंदिर आषाढी एकादशीसाठी साठी सज्ज झाले आहेत .
दरम्यान आषाढी एकादशी निमित्त वसईच्या शाळांमधून विद्यार्थ्यांनी विठूरायाची पालखी घेऊन परिसरात दिंडी काढली होती . यावेळी विद्यार्थ्यांचे लेझीम पथक अग्र स्थानी होते . तर त्यांच्या मागे विठ्ठल ,रुखमाई, संत तुकाराम ,नामदेव ,जनाबाई यांच्या आकर्षक वेशभूषा केलेले विध्यार्थी होते . तसेच त्यांच्याही मागे असणाऱ्या पालखीतील विठूरायाचे दर्शन घेताना दिंडी मार्गातील गृहिणींनी औक्षणाने विठूमाउलीची आरती केली . परिसरातील प्रतिभा विद्यामंदिर खानिवडे,बा बा जाधव स्मारक विद्यामंदिर चांदीप,ज्ञानदीप विद्यामंदिर वालिव यांच्यासह अनेक शाळांमधून आषाढी एकादशी मोठ्या भक्ती भावाने साजरी करण्यात आली . यावेळी विद्यार्थ्यांनी सुद्धा पारंपरिक लुगडे ,धोतराचा,व कुर्ता टोपी लेंग्याचा पेहराव केला होता . यावेळी मोठ्या संख्येने विद्यार्थी , शिक्षक ,पालक आणि ग्रामस्थांनी दिंडीत सहभाग घेतला होता .