‘स्वाक्षरी’वीर कौस्तुभ

    22-Oct-2023   
Total Views |
Article on Kaustubh Sathe

अनेक महान माणसांच्या स्वाक्षर्‍या टिपणारा, सामाजिक कार्यात रुची असणारा आणि आपल्या आजोबांच्या कार्याचा वारसा पुढे चालवणार्‍या कौस्तुभ साठे याच्याविषयी...

छंद माणसाला काय देतो? आपण सहज म्हणतो, छंद म्हणजे जगण्याचं कारण. ते जर मिळालं, तर माणूस पछाडल्यासारखं आयुष्य जगतो. आपण निवडलेल्या किंवा ठरवलेल्या कार्याप्रति संपूर्ण समर्पणात्मक भूमिका घेऊन आपला प्रवास सुरू होतो. छंद आयुष्याला वेग देतो, ओळख देतो, आनंद देतो आणि अर्थ देतो. प्रत्येकाचा छंद वेगळा. आवड वेगळी, आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा. काही छंद आपल्याला घडवतात, प्रगल्भ करतात, समृद्ध करतात. कौस्तुभ असाच घडत गेला. घरातून, परिसरातून झालेले संस्कार त्याच्या व्यक्तिमत्त्वात झिरपत गेले आणि आज तो अनेकांचे प्रेरणास्थान आहे.

स्वाक्षरी मागायला जाणार्‍या गोंडस मुलापासून अनेक जवानांना दिवाळीचा फराळ पोहोचवणार्‍या हक्काच्या दादापर्यंत, त्याचा प्रवास थक्क करणारा आहे. शाळेत असताना गीता पठण स्पर्धेत त्याचा पहिला क्रमांक आला होता, तेव्हा त्याला स्वाक्षरी वही बक्षीस म्हणून मिळाली. आजोबांनी त्याला त्यात आई, बाबा अन् शिक्षक या प्रथम गुरूंच्या स्वाक्षरी घेण्यास सांगितले. त्यानंतर ठाण्यातच काही कार्यक्रम असताना स्थानिक मान्यवर लोक भेटल्यास त्यांना भेटून, तो स्वाक्षरी घेऊ लागला. सुप्रसिद्ध साहित्यिक प्रवीण दवणे यांची एक आठवण तो आवर्जून सांगतो की, एका कार्यक्रमात ते भेटले, तेव्हा मी त्यांना आजोबांची ओळख दिली.

त्यांचा मी नातू म्हणून सांगितले. त्यानंतर काही महिन्यांनी पुन्हा भेट झाल्यावर, पुन्हा तशी ओळख कौस्तुभने सांगितली. तेव्हा त्यांनी दिलेला एक सल्ला माझ्या चांगलाच लक्षात आहे. ते म्हणाले होते की, “किती दिवस अशी आजोबांची ओळख देशील? स्वतःची ओळख तयार कर.” माझा आता तोच प्रयत्न आहे. हा धडा विसरता येण्यासारखा तर नव्हताच; पण उमेदीचे पंख देणारा होता. आता आपली स्वाक्षरी वही गावाबाहेर न्यायचे त्याने ठरवले. नामवंत मंडळींची स्वाक्षरी घेताना त्यांच्या समीप जाता येते, त्यांना जवळून निरखता येते, त्यांचे वागणे, बोलणे, त्यांचे विचार, त्यावर आधारलेलं त्यांचं बोलणं हे सगळं सगळं पाहता येतं.

२००६ साली पहिल्यांदा डोंबिवलीमध्ये कौस्तुभने आपल्या स्वाक्षर्‍यांचे प्रदर्शन भरवलं. त्यानंतर नाशिक, पुणे, रत्नागिरी, ठाणे अशा अनेक ठिकाणी १४ ते १५ प्रदर्शने झाली. आज २५ वर्षांनी त्याच्याकडे एकूण ४ हजार, ७४० अधिक दोन अशा स्वाक्षर्‍या आहेत. कित्येकांच्या स्वाक्षर्‍या त्याने कितीतरी वेळा घेतल्या आहेत. एवढ्या की त्यांची तर नोंदच नाही. एका व्यक्तीची स्वाक्षरी अनेक काळानंतर घेतल्याने तिच्यामध्ये काही बदल झाले असतात, ते बदलही टिपून घ्यायला हवेत, असं त्याचं म्हणणं. ‘ग्राफोलॉजी’बद्दल मात्र तो फार काही बोलत नाही. त्याला असं वाटतं की, माणसाची स्वाक्षरी बदलत असते. काही स्वाक्षर्‍या जशी रतन टाटा, अब्दुल कलाम या मोठ्या माणसांच्या सह्या चुकल्या. त्याच्याबद्दल तो हळहळ व्यक्त करतो. रतन टाटांनी त्याची स्वाक्षर्‍यांची वही पाहिलीसुद्धा, पण स्वाक्षरी दिली नाही. ते म्हणाले की, ‘बेटर लक नेक्स्ट टाईम.’ कित्येक मराठी साहित्यिकांच्या घरी तो गेला. त्याच्या स्वाक्षरी वहीची सुरुवात केवळ मराठी मनोरंजन क्षेत्रातल्या कलावंतांपासून केली होती. पण, त्यानंतर साहित्य आणि संस्कृती या विषयात महत्त्वाचं काम केलेल्या लोकांच्या स्वाक्षर्‍याही आहेत.

हा झाला त्याचा आवडीचा आणि छंदाचा भाग. यानंतर सगळ्यात मोठा भाग मात्र राहतोच. समाजकार्य आणि देशकार्य तसेच एनजीओ चालवणं, सेवाभावी संस्थांना मदत करणं हे कार्यसुद्धा तो करत असतो. या कार्याची प्रेरणासुद्धा आपल्या आजोबांच्या कार्यातूनच मिळाल्याचे तो सांगतो. ठाण्यातल्या प्रसिद्ध शाळेत त्याचे आजोबा संस्थेचे अध्यक्ष होते. त्यांनी अनेकांना मदत केली. यातूनच सामाजिक कार्याचे बाळकडू त्याला मिळालं. या व्यतिरिक्त कौस्तुभ तबला शिकला आहे, दोन परीक्षाही त्याने दिल्या आहेत. एका चांगल्या कंपनीत व्यवस्थापकपदावर तो कार्यरत आहे. आपल्या आजोबांच्या नावानेच त्याने २०२२ साली एक सेवाभावी संस्था स्थापन केली आणि त्या संस्थेमार्फत अन्नदानाचे महत्त्वाचा कार्य तो करतो.

आपल्या देशाचे रक्षण करणारे जवान सीमेवर कार्यरत असताना, त्यांना दिवाळीला घरी यायला जमत नाही. त्यांना घरचा फराळ खायला मिळत नाही. हे घरातलं प्रेम त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही. तेव्हा ते पोहोचावं म्हणून १ हजार, २५० फराळाचे खोके त्यांनी सैनिकांना पाठवले. ते दिवाळीपर्यंत त्यांच्यापर्यंत पोहोचतील. त्याचबरोबर त्यांच्या संस्थेमार्फत एक अतिशय स्तुत्य उपक्रम राबवला जातो, मुंबईतील टाटा कर्करोग रुग्णालयात अनेक रुग्ण असतात, त्यांच्या दुपारच्या जेवणाची सोय अनेक सेवाभावी संस्था करतात. परंतु, रात्री मात्र त्यांना उपाशीच झोपावे लागते. तेव्हा त्यांना उपाशीपोटी झोपायला लागू नये, म्हणून अन्नछत्र चालवलं जातं. त्या अन्नछत्रासाठी लागणारे सगळे वाण सामान ‘नाना साठे प्रतिष्ठान’मार्फत पुरवले जाते. समाजसेवेत त्यांचे कार्य असेच अविरत सुरू राहो, कौस्तुभच्या या स्तुत्य उपक्रमाला दै. ‘मुंबई तरुण भारत’कडून अनेकानेक शुभेच्छा!

आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

मृगा वर्तक

मुंबई विदयापीठातून पत्रकारिता व संज्ञापण विषयात पदव्युत्तर शिक्षण. इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठातून मानसशास्त्र विषयात पदव्युत्तर शिक्षण. वसईतील विविध समाज व खाद्यसंस्कृतीचा अभ्यास. ललित व पर्यटन विषयावर लेखन करण्याची आवड. तसेच स्त्रीवादी विषयांवर लेखन करण्याची आवड.