ब्रह्मकुमारी वासंती दीदी

    06-Jun-2025
Total Views |
Vasanti Didi vow to serve the people

अध्यात्मिक उत्कर्ष साधत अखंड जनसेवेचे व्रत हाती घेतलेल्या राजयोगिनी ब्रह्मकुमारी वासंती दीदी यांच्याविषयी...

हिंदू धर्मशास्त्रानुसार साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या अक्षय्य तृतीयेला १९४६ साली मुंबई येथे अखंड आध्यात्मिक सेवेच्या व्रतस्थ, प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाच्या नाशिक जिल्हा मुख्य संचालिका राजयोगिनी ब्रह्मकुमारी वासंती दीदी यांचा जन्म झाला. दीदींना लहानपणापासूनच नवीन काहीतरी करून दाखवावे, असे वाटायचे. एक साधारण जीवनापेक्षा काहीतरी आदर्श जीवन बनवावे, असे विचार सतत त्यांच्या मनात घोळत. या विचारांनीच त्या ‘ब्रह्माकुमारीज’ संस्थेशी जोडल्या गेल्या. ‘ब्रह्मकुमारी’ संस्थेचा परिचय झाल्यानंतर दीदींची आध्यात्मिकतेबद्दल रूची वाढू लागली. जवळपास १९७२ पासून दीदी राजयोगाचा नियमित अभ्यास करीत आहेत. या राजयोग ध्यान साधनेतून त्यांचे आत्मबल, आत्मविश्वास वाढत गेला. ‘ब्रह्मकुमारी’ जीवनात आल्यानंतर त्यांच्यात पवित्रता, प्रेम, करूणा आदी गुणांचा विकास झाला.

नियमित राजयोगाच्या अभ्यासामुळे मनाची शांती, एकाग्रता, स्थिरता, दृढता आणि मानसिक शक्तींचाही विकास होत असल्याचा त्यांना साक्षात्कार झाला. दीदींना राजयोगाद्वारे परमात्मा शक्तीची ओळख तसेच परमात्म्याच्या गुण शक्तींची अनुभूतीदेखील झाली. ईश्वरीय गुणांना जीवनात धारण करत असताना दैवी संस्कारांचा विकासही खूप सहजरितीने होऊ लागला. विश्वसेवा तसेच सर्व मनुष्य आत्म्यांचे जीवन परिवर्तन करण्याच्या विचाराने, दीदींनी आपले जीवन ईश्वरीय सेवेत समर्पित करूनच ‘ब्रह्माकुमारीज’च्या वेगवेगळ्या ठिकाणी सेवा दिल्या. त्याप्रमाणे लाखो लोकांच्या संपर्कात येण्याची व त्यांची सेवा करण्याची संधीदेखील मिळाली. मुंबई सेवाकेंद्रापासून ते अहमदाबाद, छत्रपती संभाजीनगर, पनवेल, सोलापूर, नागपूर, लातूर, नवी मुंबई अशा वेगवेगळ्या ठिकाणी सेवा देऊन, आता नाशिकमध्ये दीदी जवळजवळ ३० वर्षांपासून आपली निष्काम वृत्तीने सेवा देत आहेत. नाशिक सेवाकेंद्रामध्ये सेवा देताना दीदींनी समाजातील वेगवेगळ्या घटकांना ईश्वरीय संदेश पोहोचविण्यासाठी, वेगवेगळ्या सेवांचे आयोजन केले. यात कुंभमेळ्यात भव्य आध्यात्मिक मेळ्याचे आयोजन करून, लाखो जनतेपर्यंत ईश्वरीय संदेश पोहोचविला. जीवन जगण्याची कला व जीवनात खर्या मार्गावर चालून जीवन श्रेष्ठ बनविण्यासाठी, दीदींनी अनेकांना मार्गदर्शन केले. प्रत्येक वर्षी ‘ब्रह्मकुमारी’ संस्थेच्या मुख्यालयातर्फे एक विशिष्ट संकल्पना घेऊन ते वर्ष साजरे केले जाते. या प्रकल्पांचे सफल आयोजन दीदी आपल्या नाशिक शहरात करीत असतात. यात विश्वशांती वर्ष, महिला वर्ष, युवावर्ष, विश्वयोगदिन इत्यादिंचा उल्लेख करता येईल. स्थानीय स्तरावर दीदी दरवर्षी विविध अभियानांचे आयोजनही करतात. यात आजपर्यंत सायकल यात्रा, मोटरसायकल रॅली, महिला संमेलन, धर्मसंमेलन, व्यसनमुक्ती अभियान, चालक, वाहकांसाठी तणावमुक्त जीवनावरती प्रवचने अशा कितीतरी कार्यक्रमांचे आयोजन, दीदी आपल्या कार्यक्षेत्रात करतात. दीदींनी ‘ब्रह्माकुमारीज’ संस्थेच्या शिक्षण विभागाद्वारे नाशिकमध्ये अनेक सेवाप्रकल्प कार्यान्वित केले आहेत. यात अतिशय उल्लेखनीय म्हणजे ’यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठा’सोबत केलेला ‘यश ब्रह्म’ हा प्रकल्प होय. या प्रकल्पामधून जीवनाला मूल्यवान बनविण्यासाठी, मूल्यांना विकसित करण्यासाठी डिप्लोमा, डिग्री अभ्यासक्रम सुरू करण्यात आला. अशा रितीने दीदींनी समाजाच्या सेवेत समर्पण करण्याचा आणि समाजात नैतिक मूल्ये रुजविण्याच्या कार्यात स्वतःला झोकून दिले आहे.

नुकतेच वासंती दीदी यांच्या मार्गदर्शनाखाली पेगलवाडी, त्र्यंबकेश्वर येथे प्रजापिता ‘ब्रह्मकुमारी’ संस्थेचे ‘शिवदर्शन सरोवर’ हे आध्यात्मिक संग्रहालय भव्य दिव्य स्वरूपात साकारले जात असून, नाशिकच्या धार्मिक, सांस्कृतिक, पर्यटन वैभवामध्ये फार मोठीच भर पडणार आहे. जिल्ह्यातील तसेच राज्यातील सर्व भाविक साधकांनाही दर्शनाचा लाभ होणार आहे. दीदी उच्च विद्याविभूषित असून, ‘मुंबई विद्यापीठा’तून ’अर्थशास्त्र’ या विषयातून कला शाखेची पदवीही त्यांनी संपादित केली. तसेच त्यांच्या अलौकिक कार्याबद्दल त्यांना अनेक पुरस्कारांनीही गौरविण्यात आले आहे. यामध्ये विशेष करून नाशिक महानगरपालिकेतर्फे लोककल्याण पुरस्कार, आदर्श महिला पुरस्कार, रोटरी क्लब व लायन्स क्लबतर्फे अनेकानेक पुरस्कार, ‘जिमो’ या संस्थेतर्फे आदर्श महिला व आदर्श शिक्षिका हा पुरस्कार, पर्यावरणाला सुजलाम् सुफलाम् ठेवण्यासाठी व मनातील नकारात्मकतेला आपण कशा रितीने घालवू शकतो यासाठी ‘क्लीन द माईंड’ अॅण्ड ‘ग्रीन द अर्थ’ हा पुरस्कारही देण्यात आला. अशा असंख्य संस्थेतर्फे दीदींना त्यांच्या कार्यासाठी अनेक पुरस्कार देण्यात आले. अशा सुंदररित्या विनामूल्य, निःस्वार्थ, अविरत आध्यात्मिक कार्य करणार्या राजयोगिनी ब्रह्मकुमारी वासंती दीदींना निरोगी आयुष्य लाभावे, यासाठी दै. ‘मुंबई तरुण भारत’कडून हार्दिक शुभेच्छा!



विराम गांगुर्डे
९४०४६८७६०८