जे का रंजले गांजले...

Total Views |
Dr. Sangeeta Patil Counsels womens to avoid cases like Vaishnavi Hagavane dowery case

समाजातील रंजल्या गांजल्या लोकांची मनोदशा समजून घेऊन त्यांची जीवनदशा बदलण्यासाठी प्रचंड मेहनत घेणार्या डॉ. संगीता पाटील यांच्याविषयी...


पुण्यातल्या वैष्णवी हगवणे यांचा मृत्यू हा वरकरणी जरी हुंडाबळी वाटत असला, तरी तो एका कुटुंबातील नकारात्मकता आणि समाज म्हणून एका हव्यासापोटी सामूहिक कृतीचा बळी आहे. जर यात त्या कुटुंबामध्ये योग्य वेळी कोणीतरी मध्यस्थी करून योग्य समुपदेशन केले असते, तर कदाचित वैष्णवीला अधिक चांगले आयुष्य मिळू शकले असते. अशा घटना घडतात, तेव्हा कौटुंबिक समुपदेशन विशेषतः मुलींचे समुपदेशन किती आवश्यक आहे, हे आपल्याला जाणवते. अशावेळी एक समुपदेशक किती महत्त्वाचा आहे, हेही आपणास जाणवते. जर वैष्णवीच्या हुंडाबळीसारख्या घटना घडत असतील, वाढत असतील आणि त्याची झळ समाजव्यवस्थेला बसत असेल, तर योग्य वेळी समुपदेशन गरजेचे नाही का? कुटुंबव्यवस्थेतील समुपदेशनाचे गांभीर्य पंढरपूर येथील प्रसिद्ध समुपदेशक डॉ. संगीता पाटील यांनी ओळखले.


पंढरपूर येथील डॉ. संगीता पाटील या २००९ सालापासून आजतागायत विविध क्षेत्रांतील महिलांना, शालेय विद्यार्थ्यांना सामाजिक संस्थांच्या माध्यमातून झोपडपट्टी, वस्त्या, वृद्धाश्रम येथे समुपदेशक म्हणून मार्गदर्शन करीत आहेत. पंढरपूर येथे आपले पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर, डॉ. संगीता यांनी ‘बीएमएचएस’ची पदवी घेतली. हे शिक्षण घेताना प्रकल्पांचा भाग म्हणून पुण्यातील झोपडपट्टींमध्ये पोलियोचे डोस देण्यासाठी जाणे, महिलांना आरोग्याविषयी माहिती देणे होत असे. त्या महिला उत्सुकतेने हे ऐकत असत. त्यातूनच डॉ. संगीता यांना या कामाची आवड निर्माण झाली आणि समाधानही वाटले.


होमियोपॅथीमध्ये अभ्यास करत असल्याने डॉ संगीता यांना शारीरिक व्याधींसोबतच, मानसिक व्याधींचीही माहिती दिली जात होती. डॉ. संगीता यांनी मानसोपचार विषय अभ्यासण्याचे ठरविले. त्यांनी समुपदेशनमधून ‘एमएस’ केले. हे करतानाच अनेक लहान सामाजिक कार्येही सुरू केली. यामध्ये अंगणवाडीमध्ये जाऊन वैद्यकीय शिबिरे घेणे, एचआयव्हीबाबत जनजागृती यांचा समावेश होता. एका प्रसंगी डॉ. संगीता सांगतात, एचआयव्हीबाबत एका कॅम्पमध्ये एका मुलीने प्रश्न विचारला होता की, ‘एखाद्या मुलाच्या चेहर्यावरून कसे ओळखावे की, हा एचआयव्ही पॉझिटिव्ह आहे?’ हा प्रश्न ऐकून मीच थोडी गोंधळले आणि याची अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न केला,” असे त्या सांगतात. "यानंतर अधिक जागरूकतेने या सगळ्या बाबींवर मी माहिती देऊ लागले,” असेही त्या संगतात.


पुढे विवाहानंतर डॉ. संगीता यांनी कोल्हापूर येथे आपली प्रॅटिस सुरूच ठेवली. कालांतराने डॉ. संगीता यांनी ‘रुही फाऊंडेशन’ या संस्थेची नोंदणी केली. डॉ. संगीता या खासगी शाळा आणि आपल्या संस्थेच्या माध्यमातून सेवा देतात. ‘रुही फाऊंडेशन’च्या माध्यमातून गरजू सामाजिक संस्था, वृद्धाश्रम येथे मोफत सेवा आणि समुपदेशन केले जाते.


आज घरातली मुलं ऐकत नाहीत, तरुण मुली कोणाचेही ऐकण्यापलीकडे जातात. एवढेच नव्हे, तर घरातले ज्येष्ठ अचानक घर सोडून निघून जाण्याइतपत निर्णय घेतात, यांसाठी तक्रार एकच की, मुलं ऐकत नाहीत. अशा सगळ्या घटनांमुळे अलीकडच्या काळात कौटुंबिक व्यवस्था बिघडते, अशी असंख्य उदाहरणे रोज प्रकाशात येतात. हे चित्र सुदृढ समाजाच्या दृष्टीने अत्यंत घातक असल्याची चिंता व्यक्त केली जाते. त्याच चिंतेवर चिंतन व्हावे आणि समाजव्यवस्था एक नव्या रूपात नव्या व्यवस्थित उभी राहावी, अशी अपेक्षा सर्वत्र व्यक्तही होते. अलीकडच्या काळात ‘काऊन्सिलिंग’ नावाची एक कॉर्पोरेट यंत्रणातच उभी केली गेली आहे. वेगवेगळ्या क्षेत्रांना आज समुपदेशनाचे महत्त्व पटले आहे.


आज कुटुंबामधील नाते अधिकाधिक घट्ट व्हावे आणि सुदृढ कुटुंबव्यवस्था निर्माण व्हावी, यासाठी डॉ. संगीता प्रयत्नशील आहेत. गोव्यातील एक ज्येष्ठ महिला मुलांशी पटत नाही, म्हणून बसने प्रवास करत पंढरपुरात आली. ‘निर्भया’ पथकाने त्या महिलेची विचारपूस केली. पोलीस ठाण्यात त्या आजींनी सांगितले की, "माझ्या मुलांना माझे निधन झाल्याचे तुम्ही कळवा.” पोलिसांनी डॉ. संगीता यांना या आजींचे समुपदेशन करण्यासाठी बोलवले. तेव्हा संगीता आजींना ‘मातोश्री’ वृद्धाश्रमात घेऊन गेल्या. तिथे आजी राहू लागल्या. पुढील काळात त्यांचे डॉ. संगीता यांनी समुपदेशन केल्याने आजींचे मन काही दिवसांत बदलले आणि त्या गोव्यात मुलांसोबत राहायला तयार झाल्या. यावेळी डॉ. संगीता यांनी या आजींच्या मुलांनाही समजावले. अशारितीने आपण एक कुटुंब जोडत असल्याचे समाधान व्यक्त करणे कठीण असल्याचे डॉ. संगीता सांगतात. डॉ. संगीता यांना आजतागायत अनेक सन्मानांनी गौरविण्यात आले आहे. मात्र, "माझ्या सेवेतून एखादे कुटुंब वाचणे, एखाद्या महिलेला तिची ओळख गवसणे, एखाद्या लहान मुलाला त्याच्या भविष्याचा वेध मिळणे, हेच माझ्या आयुष्यातील सर्वाधिक मोठे यश आहे,” असे डॉ. संगीता नमूद करतात. महाराष्ट्र पोलिसांचे ‘निर्भया’ पथक हे अत्यंत उत्कृष्टपणे कार्य करत आल्याचेही संगीता सांगतात. भविष्यात मुलां-मुलींसाठी एक अभ्यासिका सुरू करण्याचे संगीत यांचे स्वप्न आहे.


संगीता यांची जडणघडण आणि बालपण संपूर्ण आध्यात्मिक वातावरणात गेले. त्यांचे आईवडील आणि संपूर्ण कुटुंब हे अन्नदान, भजन, कीर्तन या माध्यमांतून आपले सामाजिक कार्य करत होते. आध्यात्मिक संस्कारातूनच मला सामाजिक कार्य आणि यशस्वी जीवनाचा मार्ग सापडल्याचे संगीता सांगतात. डॉ. संगीता यांना त्याच्या पुढील सामाजिक आणि वैद्यकीय क्षेत्रातील कार्यासाठी दै. ‘मुंबई तरुण भारत’च्या अनेकानेक शुभेच्छा!

गायत्री श्रीगोंदेकर

मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.