वंचितांच्या ‘अपेक्षा’पूर्तीचा मधुघट

    06-Jun-2025   
Total Views |
 
Dr Madhukar Gumble
 
 
वंचित समुदायांना सशक्त करणार्‍या आणि शाश्वत विकासाला चालना देणार्‍या ‘अपेक्षा होमियो सोसायटी’चे संस्थापक डॉ. मधुकर नामदेवराव गुंबळे यांच्याविषयी...
 
त्या व्यक्तीचा जीवनप्रवास आहे, ज्याने आपले बालपण हलाखीच्या परिस्थितीत व्यतीत केले. इतके की, इयत्ता नववीपर्यंत पायात साधी चप्पल घालायचासुद्धा कधी योग आला नाही. आज तीच व्यक्ती ‘अपेक्षा होमियो सोसायटी’ नावाच्या संस्थेअंतर्गत समाजातील लोकांचे जीवन, त्यांचे आरोग्य सुधारण्यासाठी अथक परिश्रम घेत आहे. असे हे समाजशील व्यक्तिमत्त्व म्हणजे, डॉ. मधुकर नामदेवराव गुंबळे.
 
अमरावती जिल्ह्यातील तळेगाव ठाकुर या खेडेगावात त्यांचा जन्म झाला. इथल्याच एका शाळेत त्यांचे इयत्ता आठवीपर्यंतचे शिक्षण झाले. त्यांना शिकण्याची आणि समाजसेवेची प्रचंड आवड. पुढे त्यांनी नववी ते अकरावीपर्यंतचे शिक्षण यवतमाळ येथे पूर्ण केले. त्यानंतर त्यांनी डिप्लोमा केला.आईवडिलांसह पाच भाऊ, दोन बहिणी असा त्यांचा परिवार. घरची परिस्थितीसुद्धा अत्यंत हलाखीची. शेणाने अंगण सारवण्याचे काम ही भावंडे करायची. आधी म्हटल्याप्रमाणे, डॉ. मधुकर यांनी नववीपर्यंत कधी चप्पलही पायात घातली नाही. त्यांचा मोठा भाऊ नोकरीला लागल्यानंतर त्यांना पहिल्यांदा पायात घालायला स्लीपर मिळाली.
 
1977 सालची गोष्ट. त्याकाळी गावात आरोग्याचे प्रश्न अत्यंत गंभीर होते. त्यामुळे गावातील डॉक्टरांनीसुद्धा भयंकर लूट माजवली होती. एक इंजेक्शन दहा रुपये आणि सलाईन 50 रुपयांपर्यंत होते. डॉ. मधुकर जेव्हा गावात आले, तेव्हा त्यांनी होमियोपॅथीच्या सरावाला सुरुवात केली. स्वस्त आणि कोणतेही दुष्परिणाम न होणारी औषधे त्यांनी गावातील लोकांसाठी उपलब्ध केली.
याच दरम्यान डॉ. मधुकर यांनी एक समाजसेवी संस्था सुरू करण्याचा निर्णय घेतला. अमरावती जिल्ह्यातील तिवसा तालुक्यातील समुदायाच्या आरोग्यावर लक्ष केंद्रित करणार्‍या डॉक्टरांच्या गटाची स्थापना केली आणि 1980 साली ‘अपेक्षा होमियो सोसायटी’ची औपचारिक नोंदणी झाली. गावातील आरोग्याची बदललेली परिस्थिती पाहता त्यांनी गावकर्‍यांसाठी प्रथमतः आरोग्य तपासणी सुरू केले. हा उपक्रम साधारणतः 1988 सालापर्यंत यशस्वीरीत्या चालवला. गावकर्‍यांचाही हळूहळू या उपक्रमाला उत्तम प्रतिसाद मिळत गेला. त्यानंतर डॉ. मधुकर यांचे आसपासच्या नऊ गावांमध्येही काम सुरू झाले. त्यातून अनेक आरोग्य कार्यकर्ते त्यांच्याशी जोडले गेले. त्यांच्या नेतृत्वात 1990 सालच्या दरम्यान गावात सॅनिटायझेशनचे काम झाले. ‘अपेक्षा होमियो सोसायटी’ गेल्या 45 वर्षांपासून महाराष्ट्रात विशेषतः विदर्भातील नागरिकांचे जीवन सुधारण्यासाठी अथकपणे कार्यरत आहे. समाजातील गरजूंना परवडणारी आणि सुलभ आरोग्यसेवा उपलब्ध करून देणे हाच डॉ. मधुकर यांचे मूळ उद्देश. तेव्हापासून संस्थेने आपल्या कार्याचा विस्तार इतर अनेक विकासात्मक उपक्रमांपर्यंत केला, ज्यामध्ये बालहक्क, उपजीविका, समुदाय विकास आणि एकल महिलांचे सशक्तीकरण यांसारख्या उपक्रमांचा देखील समावेश होतो. या सर्व क्षेत्रांत संस्थेने लक्षणीय प्रगती केली असून, त्यांच्या कार्याचा कोट्यवधी लोकांच्या आयुष्यावर सकारात्मक प्रभाव पडला.
 
1990च्या सुमारास संस्थेने बहुआयामी विकास साध्य केला. केवळ आरोग्यावर लक्ष केंद्रित न करता, उपजीविका, स्वच्छता, शिक्षण अशा विविध मुद्द्यांवर काम सुरू केले, जेणेकरून गरिबीच्या समस्येविरुद्ध लढा देता येईल आणि समाजाचे जीवनमान उंचावेल. त्यानंतर 2000 सालापासून सुरू झालेले वंचित समुदायांना पाठबळ देण्याचे काम आजतागायत सुरू आहे. संस्थेने वंचित घटकांवर लक्ष केंद्रित केले असून, आरोग्य, शिक्षण, शेती आणि प्रशासन या सेवा एकत्रित करून समग्र समुदाय विकासासाठी काम सुरू केले. 2010 सालच्या दरम्यान संस्थेतर्फे जनजागृती आणि नेटवर्किंगचे कार्य सुरू झाले. संस्थेने ‘चाईल्ड राईट्स अलायन्स’ या 25 स्वयंसेवी संस्थांच्या गटाची स्थापना केली. तसेच, ‘किसानमित्र नेटवर्क’ सुरू केले. यामधून बालहक्क आणि विदर्भातील कृषिसंकट अशा महत्त्वाच्या विषयांवर काम करण्यात आले. ‘अपेक्षा होमियो सोसायटी’ ही संस्था आजही आपल्या कार्याचा विस्तार करत असून, कार्यक्रमांची परिणामकारकता वाढवण्यावर भर देत आहे. विदर्भातील वंचित समुदायांचे सशक्तीकरण हेच संस्थेचे प्रमुख ध्येय राहिले आहे.
 
सर्वसमावेशक उपक्रमांद्वारे बालहक्कांचे संरक्षण करणे, एकल महिला स्वावलंबी आणि आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्ण व्हाव्या, या अनुषंगाने सामाजिक व आर्थिक सशक्तीकरणासाठी सर्वांगीण उपक्रम राबविणे, शाश्वत शेतीपद्धती आणि जलसंधारण विकास उपक्रमांच्या माध्यमातून उपजीविकेच्या संधी विकसित करणे, अशी काही महत्त्वपूर्ण उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी संस्था कार्यरत आहे. महिला, मुले, शेतकरी आणि भूमिहीन व्यक्तींच्या शाश्वत विकासासाठी लोकांना संघटित करून प्रयोग, सेवा आणि शासनासोबत समन्वय साधून, त्यांच्या क्षमतावर्धनाचे प्रयत्न करण्याचे ध्येय समोर ठेवून संस्था कार्यरत आहे.
 
संस्थेने आज महाराष्ट्रभर वंचित समुदायांच्या सशक्तीकरण आणि शाश्वत विकासाला चालना देण्यात उल्लेखनीय प्रगती केली आहे. ‘कम्युनिटी अ‍ॅक्शन फॉर हेल्थ’ उपक्रमाने स्थानिक आरोग्य समित्यांना बळकटी दिली असून, आरोग्य सेवांचा पायाभूत ढांचा सुधारण्यात मदत केली आहे. ‘चाईल्डलाईन 1098’, ‘महाराष्ट्र ग्रामीण उपजीविका वृद्धी प्रकल्प’, ‘कोविड-19’मुळे विधवा झालेल्या महिलांसाठीचा मदत व पुनर्वसन प्रकल्प, यांसारख्या अनेकविध उपक्रमांतून एकल महिलांना उपजीविकेच्या संधी संस्थेने उपलब्ध करून दिल्या. शिलाई मशीन वाटप प्रकल्पाद्वारेही एकल महिलांच्या जगण्याला नवी दिशा मिळाली. अशा या समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी झटणार्‍या डॉ. मधुकर गुंबळे यांना पुढील वाटचालीसाठी दै. ‘मुंबई तरुण भारत’तर्फे अनेक शुभेच्छा!
 
 

ओंकार मुळ्ये

'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक