‘समाजभूषण’ मारुती पवार

    12-Jun-2025   
Total Views |

भटके-विमुक्त समाजासाठी समरसतेने काम करणारे आणि राज्य सरकारच्या ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कारा’ने सन्मानित सांगलीच्या मारुती पवार यांच्या सामाजिक योगदानाविषयी...

बाळाचा जन्म झाला आणि बातमी आली, आधीच बाळाचा आजारी असलेला तीन वर्षांचा भाऊ वारला. जेव्हा आईला हे कळले, तेव्हा ती प्रचंड दुःखी झाली. त्या दुःखात तिने बाळाला दूर लोटले. बाळ पांढर्या पायाचे आहे. त्याने लेकराला खाल्ले असे तिचे म्हणणे! बाळाचे बाबा दुसर्या शहरात रोजंदारीचे काम करीत होते. बाळाचे संगोपन कसे होणार, हा विचार करून शेजारच्या दोन आयाबायांनी ज्यात एक चर्मकार समाजाची, तर दुसरी मराठा समाजाची महिला होती; या दोन महिलांनी बाळाला त्यांच्या बाबांकडे नेले. हा मुलगा जन्मला आणि आपला मोठा मुलगा देवाघरी गेला, असे बाबांनाही वाटत होते. त्यामुळे बाबांनीही त्या बाळाचा सुरुवातीला रागरागच केला. पण, काही दिवसांनी आई दुःखातून सावरली आणि बाळाला आईबाबा मिळाले. पण, त्या बाळाच्या आयुष्यातील चढउतार काही संपले नाहीत. मात्र, त्या सर्व परिस्थितीवर मात करत या बाळाने आयुष्यात स्वतःचे अस्तित्व निर्माण केले. समाजासाठी कर्तव्यदक्षतेचा मोठा आदर्श उभा केला. ते बाळ आज मारुती पवार म्हणून सामाजिक क्षेत्रात परिचित आहे.

भटके-विमुक्त समाज तसेच, दिव्यांगांसाठी मारुती पवार यांनी अनेक दशके काम केले. समाजातील धर्मांतरण रोखणे, समाज व्यसनमुक्त व्हावा, म्हणूनही अत्यंत निरपेक्ष, निस्वार्थी वृत्तीने ते कार्यरत आहेत. ‘अंध-अपंग बहुउद्देशीय विकास संघा’चे ते अध्यक्ष आहेत. तसेच, ‘स्व. गोपीनाथ मुंडे आश्रमशाळे’चे ते संचालक आहेत. या आश्रमशाळेत भटके-विमुक्त समाजातील ११० विद्यार्थी निवास करून शिक्षण घेतात. पवार यांना समाजकार्यासाठी अनेक पुरस्कारांनी सन्मानितही करण्यात आले. नुकताच त्यांना महाराष्ट्र सरकारचा ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार’ही प्राप्त झाला.

मारुती म्हणतात, "विद्यमान सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत हे सरकार्यवाह असताना त्यांची भेट झाली होती. तेव्हा त्यांचा साधेपणा आणि त्यातही सर्व समाजाविषयी असणारी त्यांची तळमळ, समाजभान आणि प्रेरणा देणारी वृत्ती पाहून विचारांना दिशा मिळाली. त्यापूर्वीही ‘समरसता मंचा’चे काम करायचो. पण, सरसंघचालकांना भेटल्यानंतर समरसतेच्या विचाराबद्दल स्पष्टता आली.”

मारुती पवार यांच्या आयुष्याचा मागोवा घेऊ. विठ्ठल आणि पार्वती पवार मूळचे सांगली जिल्ह्यातील बत्तीस शिराळा तालुक्यातील कोकरूड गावचे. बेलदार समाजाचे अत्यंत धार्मिक कुटुंब. या दाम्पत्याला पाच अपत्ये, त्यांपैकी एक मारुती. गाढवावरून दगड वाहणे, दगड कापणे हा त्यांचा पारंपरिक व्यवसाय. घरची आर्थिक गरिबी. त्याकाळात गुरांसाठी असलेली शेंगदाण्याची पेंड खाऊनही त्यांनी दिवस काढले. आयुष्य खडतर होते; पण त्याबाबत मारुतीसह त्यांच्या कुटुंबाला कोणतीच तक्रार नव्हती. अशातच मारुती सात वर्षांचे असताना त्यांच्या आईचा मृत्यू झाला. जीवनात आणखीन कष्ट आले. मात्र, विठ्ठल यांनी मुलांचे पालनपोषण आईसारखेच केले. मारुती सातवीपर्यंत शिकले. शिक्षणाचा खर्चही परवडण्यासारखा नव्हता. सोबत छोटा भाऊही शिकत होताच. लहान भावाला शिकता यावे, म्हणून मारुती यांनी ठरवले की, आपण मजूर म्हणून काम करायचे आणि भावाला शिकवायचे. चार-पाच वर्षे त्यांनी गाढवावरून दगडांची वाहतूक करण्याचे काम सुरू केले. मात्र, मारुती यांचे मेहुणे तुकाराम यांना हे मान्य नव्हते. त्यांनी विठ्ठल यांना सांगितले की, "मारुती आयुष्यभर गाढवच सांभाळेल, तर त्याचेही आयुष्य असेच दगड फोडण्यात, वाहण्यात जाईल. त्यापेक्षा त्याला आमच्याकडे कोल्हापूरला नेतो.”

मारुती कोल्हापूरला गेले. तिथे छोटीमोठी कामे करू लागले. तसेच, मेहुण्यासोबत सामाजिक कार्यातही सहभाग घेऊ लागले.तसे पाहायला गेले, तर मारुती यांनीही वंचित जगण्याचा त्रास भोगला होता. मात्र, आता शोषित-वंचित समाजाचे प्रश्न त्यांना नव्याने समजले. प्रवाहाबाहेर असलेल्या या समाजाची प्रगती कशी होईल? हा विचार त्यांच्या मनात कायम घुमू लागला. अर्थार्जनासोबतच ते सर्वार्थाने समाजासाठी काम करू लागले. याच काळात त्यांचा विवाह झाला. समाजकार्य, काम आणि संसार यात त्यांचे दिवसरात्र जात होते. पण, एक दिवस तापाचे निमित्त झाले आणि मारुती यांच्या पायातली शक्ती गेली. अशात अपंगत्वच आले. पण, मारुती खचले नाहीत. दिव्यांग व्यक्तींना काय आणि कशा समस्या असतील, हे त्यांनी थोडक्यात अनुभवले. त्यांनी दिव्यांगांसाठी काम करायचे ठरवले. त्यासाठी ‘अंध-अपंग बहुउद्देशीय विकास संघा’ची स्थापना केली. त्या माध्यमातून दिव्यांगांसाठी अहोरात्र सेवाकार्य सुरू केले. पुढे भटके-विमुक्त समाजातील मुलांचा शिक्षणाचा टक्का वाढावा, यासाठी ‘स्व. गोपीनाथ मुंडे आश्रमशाळा’ही सुरू केली. ते म्हणतात, "भटके-विमुक्त समाजाचे अनेक प्रश्न आहेत. मात्र, शिक्षण हे त्या सर्व प्रश्नांचे उत्तर आहे. ‘स्व. गोपीनाथ मुंडे आश्रमशाळे’च्या माध्यमातून समाजातील मुलांनी शिक्षित व्हावे, यासाठी मी खारीचा वाटा उचलत आहे. समाजातील मुलांनी अधिकाधिक शिक्षणाच्या प्रवाहात यावे, सर्वार्थाने यशस्वी व्हावे, यासाठी मी आजन्म काम करणार आहे.” दुर्दैवाने कितीही प्रहार केले, तरी न डगमगता ठामपणे समाजासाठी काम करणारे मारुती पवार यांच्या जिद्दीला, समाजनिष्ठेला वंदन! त्यांच्या पुढील वाटचालीसाठी दै. ‘मुंबई तरुण भारत’तर्फे अनेक शुभेच्छा!

योगिता साळवी

एम.ए. समाजशास्त्र. सध्या मुंबई तरुण भारत  येथे वार्ताहर-उपसंपादक पदावर कार्यरत. राजकीय कार्यकर्ता म्हणून प्रदीर्घ अनुभव. विविध सामाजिक प्रश्‍नांच्या अभ्यासाची आवड व लिखाण. वस्त्यांचे वास्तव हे मुंबई तरुण भारतमधील लोकप्रिय सदराच्या लेखिका.