सामाजिक कार्यात झोकून काम करणार्‍या उमा

    08-Jan-2023   
Total Views |
उमा आवटेपुजार

डोंबिवलीकर असलेल्या उमा आवटेपुजारी या वयाच्या ६९व्या वर्षीदेखील एकदम ‘फीट’ आहेत. त्या नियमित प्राणायाम, ध्यानधारणा करतात. तसेच नियमित पुस्तक वाचन करीत असल्याने आपला मेंदू ‘अ‍ॅक्टिव्ह’ राहत असल्याने आपण शारीरिकदृष्ट्या ’फीट’ असल्याचे त्या सांगतात. त्यांच्याविषयी जाणून घेऊया...


उमा यांचा जन्म २२ जानेवारी, १९५४ रोजी सातारा येथे झाला. त्यांचे बालपण सुरूवातीला काही काळ कल्याणमधील लेले आळीत गेले. १९६१ला त्या डोंबिवलीकर झाल्या. त्या आजतागायत डोंबिवलीकरच आहेत. त्यांचे शालेय शिक्षण शारदा मंदिर आणि टिळकनगर विद्यामंदिर, डोंबिवली या ठिकाणी झाले. महाविद्यालयीन शिक्षण त्यांनी ठाणे महाविद्यालयातून केले. त्यांचा मुलगा तीन वर्षांचा असतानाही त्यांनी आपले शिक्षण अर्धवट सोडले नाही. पुढे त्यांनी एम.ए. बी.एड्चे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर ३५ वर्षे आयडीयुडीएस कनिष्ठ महाविद्यालयात त्यांनी मराठी विषयांचे अध्यापन केले.

विशेष म्हणजे, महाविद्यालय व्यवस्थापन हे पंजाबी होते. मात्र, तरीही त्यांनी मराठी वाङ्मय मंडळ स्थापन करून ते अव्याहतपणे २० वर्षे चालविले. अर्थातच त्यासाठी व्यवस्थापनाची साथ होती. उमा यांच्या आई विजया अध्यापक या मुंबई महापालिकेच्या शाळेत शिक्षिका म्हणून कार्यरत होत्या. त्यांचे वडील अनंत हे खासगी कंपनीत काम करीत होते. घरी परिस्थिती फारशी आर्थिक सुबत्ता असलेली अशी नव्हती. त्यामुळे त्यांनाही चारचौघांसारखा संघर्ष करीतच शिक्षण घ्यावे लागले.

उमा यांनी मराठी व्याकरणात एम.एला रौप्यपदक मिळविले होते. मानसशास्त्रात त्यांनी सुवर्णपदक मिळविले आहे. उमा यांचा विवाह १९७७ साली चंद्रशेखर यांच्यासोबत झाल्या. लग्नानंतर त्यांना सासरही डोंबिवलीच मिळाले. चंद्रशेखर हे छत्रपती शिक्षण मंडळाच्या राधाबाई साठे विद्यालयात शिक्षक म्हणून कार्यरत होते. मात्र, निवृत्तीच्या वेळी ते नूतन विद्यामंदिर शाळेत मुख्याध्यापक पदावर कार्यरत होते.
 
उमा यांना सामाजिक कार्याची आवड होती. त्यामुळे नोकरी करीत असतानाच त्या ‘ज्ञानदीप मंडळा’शी जोडल्या गेल्या. सामाजिक कार्यात त्या सुरूवातीपासूनच कार्यरत असल्याने सेवानिवृत्तीनंतरही त्यांना कधी रिकामेपणा वाटला नाही. ज्येष्ठ नागरिक संघ असलेल्या रघुवीर नगर संघाच्या त्या सभासद होत्या. या संघाचे त्यांनी कार्यवाहपदही भूषविले आहे. सध्या त्या संघाच्या उपाध्यक्षापदी कार्यरत आहेत. ज्ञान, विज्ञान, मनोरंजन यासाठी वाहिलेल्या या ज्येष्ठ नागरिक संघाच्या अध्यक्ष पदाची माळही त्यांच्या गळ्यात लवकरच पडणार आहे. जिजाऊ महिला ज्येष्ठ नागरिक संघाच्या कार्यकारिणीतही त्या कार्यरत आहेत. डोंबिवली महिला महासंघाच्या त्या सभासददेखील आहेत.

महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या कार्यवाह म्हणून त्या काम पाहत आहेत. महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष सुरेश देशपांडे यांच्या सहकार्याने त्यांची दोन पुस्तके प्रकाशित झाली आहेत. त्यामध्ये ‘जीवन से भरी तेरी आँखे’ आणि ‘तू जो मेरे सुरमें’ या पुस्तकांचा समावेश ‘पै फ्रेण्ड्स लायब्ररी’तर्फे आयोजित करण्यात आलेल्या पुस्तक आदानप्रदान कार्यक्रमातही त्यांचा सक्रिय सहभाग आहे. १९७१-७५ या कालावधीत आकाशवाणीवर ‘युवावाणी’ कार्यक्रमाचे त्यांनी पाच वर्षे निवेदन केले आहे. १९७९-८७ या कालावधीत ‘ज्ञानदीप’ या दूरदर्शनावरील कार्यक्रमात घेतलेल्या मुलाखती, केलेले निवेदन या अनुभवसंपन्नतेतून त्या सध्या कार्यक्रमांचे निवेदन करीत आहेत.

 विविध माहितीपटांना त्या आवाजही देतात. १९८७-९० या कालावधीत त्यांनी हौशी रंगभूमीवर विविध नाटकांचे शंभरहून अधिक प्रयोगही केले आहेत. उमा यांना राज्य नाट्यस्पर्धेत सलग तीन वर्षे परीक्षक म्हणून काम करण्याची संधी मिळाली. अनेक वृत्तपत्रांतून त्यांनी पुस्तक परीक्षणे लिहिली आहेत.उमा या गेल्या २० वर्षांपासून ‘दि आर्ट ऑफ लिव्हिंग’ या संस्थेत कार्यकर्त्या म्हणून कार्यरत आहेत. या संस्थेचे संस्थापक श्री श्री रविशंकर यांच्यामुळे या संस्थेतील ‘बेसिक कोर्सेस’च्या शिक्षिका होण्याचा बहुमानही त्यांना मिळाला आहे. त्या श्री श्री रविशंकर यांच्या अनुयायी आहेत.

 उमा यांनी आयुष्यात समोर आलेली संधी मग ती कोणतेही असो ती स्वीकारली. गुरूंनी दिलेला प्रसाद असे समजून ती गोष्ट प्रामाणिकपणे स्वीकारली. कितीही संकटे आली, अडचणी आल्या, तरी ती संधी सोडायची नाही, ही गोष्ट आपण नेहमी प्रामाणिकपणे केल्याचे त्या सांगतात. एवढेच नाही, त्यांच्या या स्वभावामुळेच आपण आयुष्यात पुढे पुढे जात राहिलो, असेही त्या कबूल करतात. कोणतीही गोष्ट आपल्याला जमेल की नाही, याचा त्या कधीही विचार करीत नाही. समोर आलेली संधी ही आपल्या मांगल्यासाठी आणि उत्कर्षासाठीच गुरूंनी दिली आहे, असा सकारात्मक विचार करूनच त्या आपली वाटचाल करीत आहेत. त्या गोष्टीत त्यांना यश मिळणार आहे म्हणूनच गुरूंनी त्यांना ती संधी दिली आहे.

गुरूंना त्यात त्या यशस्वी होतील असा विश्वास आहे, म्हणूनच ते संधी देत असतात, असे त्या मानतात.आयुष्यात अनेक चांगली माणसे भेटत गेली. सकारात्मक दृष्टिकोन असलेली चांगली माणसं अवतीभोवती आहेत आणि हीच आपली खरी संपत्ती असल्याचे त्या सांगतात. उमा यांच्या हरहुन्नर व्यक्तिमत्त्वाला, त्यांच्या पुढील वाटचालीसाठी दै. ‘मुंबई तरुण भारत’कडून हार्दिक शुभेच्छा...!






 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.