पंतप्रधान मोदींकडून सुप्रिया सुळेंकडे शरद पवारांच्या तब्येतीची विचारपूस! पवारांनी मानले आभार
11-Jun-2025
Total Views | 35
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खासदार सुप्रिया सुळेंकडे शरद पवारांच्या तब्येतीची विचारपूस केली. त्यानंतर बुधवार, ११ जून रोजी माध्यमांशी संवाद साधताना शरद पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार मानले आहे.
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दहशतवादाच्या विरोधात भारताची भूमिका जागतिक व्यासपीठावर मांडण्यासाठी विविध पक्षांच्या सदस्यांचे शिष्टमंडळ पाठवण्यात आले होते. दरम्यान, मंगळवार, १० जून रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्ली येथे या सर्वपक्षीय शिष्टमंडळांच्या सदस्यांची भेट घेतली.
यावेळी सुप्रिया सुळेदेखील उपस्थित होत्या. याप्रसंगी त्यांनी आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांच्या जीवनकार्याचा आढावा घेणारी राम प्रधान यांची 'वाय. बी. चव्हाण अ पिक्चरल बायोग्राफी' आणि 'वाय. बी. चव्हाण सिलेक्टेड स्पीचेस् इन पार्लिमेंट' ही दोन पुस्तके सप्रेम पंतप्रधान मोदींना भेट दिली.
दरम्यान, यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुप्रिया सुळेंकडे शरद पवारांच्या तब्येतीची विचारपूस केली. त्यानंतर शरद पवारांनी माध्यमांशी संवाद साधताना मोदींचे आभार मानले आहे. "तब्येतीची विचारपूस केल्याबद्दल आभारी आहे," असे म्हणत त्यांनी पंतप्रधान मोदींचे आभार मानले.