भिवंडी-वाडा-मनोर महामार्गाची वाट बनली बिकट.... नागरिक जीव मुठीत घेऊन करतात प्रवास; वाहनचालक हैराण

    22-Jun-2025
Total Views |

वाडा,
भिवंडी-वाडा-मनोर महामार्गाचे गेल्या ७ महिन्यांपासून नूतनीकरणाचे काम सुरू आहे. हे काम अगदी संथगतीने सुरू असून सध्या एक मार्गी वाहतूक सुरु आहे. त्यामुळे वाहतूक कोंडीसह अपघातांच्या घटना येथे रोजच घडत असून या महामार्गाची वाट बिकट बनली आहे. रस्त्याच्या दुरावस्थेमुळे वाहनांचेही नुकसान होत आहे. त्यातच वाहनचालकसह प्रवाशांमध्ये कंबर दुखी, पाठदुखी आदी दुखणे वाढल्याने नागरिक संताप व्यक्त करीत असून, आपला जीव मुठीत घेऊन या रस्त्यावरून प्रवास करीत आहेत.

भिवंडी- वाडा- मनोर ६४ कि.मी. अंतराच्या महामार्गासाठी ८०३ कोटी रुपयांचा निधी दिला आहे.तालुक्यातील या कामाचा ठेका ईगल इन्फ्रा इंडिया लिमिटेड या कंपनीला दिला आहे. या कंपनीकडून एका बाजूचे काम सुरू असून तेही अर्धवट आहे.वाहतूक सुरू असलेल्या एकेरी मार्गाची प्रचंड दुरावस्था झाली असून खड्यात रस्ता की रस्त्यात खड्डे हे समजणे मुश्किल होऊन बसले आहे. मोठे खड्डे पडल्याने प्रचंड त्रास वाहन चालकांसह प्रवाशांना होत आहे.

तालुक्यातील नेहरोली गावाजवळ एक ट्रक खड्यात अडकला तो काढताना ट्रकचालक मेटाकुटीला आला होता, यात ट्रकचेही नुकसान झाले, तर दुसऱ्या दिवशी लगेच शुक्रवारी सकाळी डाकिवली फाटा येथे एक टेलर पलटी झाला, त्याचीही प्रचंड हानी झाली. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या या भोंगळ कारभाराचा नागरिक तीव्र शब्दात निषेत व्यक्त करत आहेत.या महामार्गावर वाहतूक कोंडी नित्याचीच होऊन बसत असल्याने एक तासांच्या कालावधीसाठी तीन-चार तास जात आहेत. खराब रस्त्याचा सर्वाधिक त्रास हा या रस्त्यावरील वाहन चालकांना बसत आहे. शारीरिक त्रास तर होतोच पण गाडीचेही प्रचंड नुकसान होत असल्याचे चालकांचे म्हणणे आहे.या रस्त्याच्या संपूर्ण परिस्थितीकडे स्थानिक लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाचे पूर्णतः दुर्लक्ष होत आहे. ठेकेदार निधी उपलब्ध नसल्याचे सांगून काम संथगतीने करत आहे.