राहुल गांधींनी गृहपाठ करावा! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खोचक सल्ला
22-Jun-2025
Total Views | 18
नागपूर : राहुल गांधींनी गृहपाठ करावा, असा खोचक सल्ला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे. राहुल गांधींनी मेक इन इंडियाबाबत केलेल्या विधानावर त्यांनी प्रत्युत्तर दिले. रविवार, २२ जून रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली त्र्यंबकेश्वर (नाशिक) येथे २०२७ मध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळाच्या निमित्ताने रस्ते विकासासंदर्भात बैठक पार पडली. त्यानंतर त्यांनी माध्यमांशई संवाद साधला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "राहुल गांधींना मेक इन इंडिया माहिती नाही. त्यांना आपल्या देशात काय बनते हेसुद्धा माहिती नाही. त्यांचे सरकार असताना भारताची अर्थव्यवस्था ही जगातील ११ वी अर्थव्यवस्था होती. पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी १० वर्षात भारताला जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनवली असून येणाऱ्या २ वर्षात आपण जगातील तिसरी मोठी अर्थव्यवस्था बनणार आहोत. त्यामुळे राहुल गांधींनी गृहपाठ करावा," असा टोला त्यांनी लगावला. अबु आझमींना प्रसिद्धीलायक समजत नाही!
अबू आझमी यांनी वारीसंदर्भात केलेल्या विधानावर बोलताना ते म्हणाले की, "अबु आझमी यांना वादग्रस्त विधाने करण्याची सवय आहे. कारण वादग्रस्त विधाने केल्याने प्रसिद्धी मिळते असे त्यांना वाटते. त्यामुळे मी त्यांना प्रसिद्धीलायक समजत नाही," असे ते म्हणाले.
ते पुढे म्हणाले की, "नाशिकमध्ये होणाऱ्या कुंभमेळ्याच्या निमित्ताने आम्ही केंद्र सरकारला एक विनंती केली होती. कुंभमेळ्याच्या निमित्ताने जे रोड नेटवर्क तयार करायचे आहे त्यात राष्ट्रीय महामार्ग किंवा इतर महत्वाच्या मार्गांकरिता केंद्र सरकारने पुढाकार घ्यावा, अशी विनंती आम्ही केली होती. त्या दृष्टीने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी या पत्रावर बैठक घेतली. ८ प्रमुख रस्त्यांच्या विकासासंदर्भात ही बैठक झाली असून जवळपास सर्व रस्त्यांना तत्वत: मान्यता दिली आहे. लवकरच त्यासाठी निधी उपलब्ध करून ते काम पूर्ण करण्यात येईल. यामुळे कुंभ मेळ्याच्या काळात अपेक्षित असलेल्या वाहतूकीकरिता विस्तारित रस्त्यांचे जाळे उपलब्ध होणार आहे," अशी माहितीही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिली.