मुंबई : राज्यातील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी दि. ८ आणि ९ जुलै रोजी राज्यव्यापी आंदोलन करत आहेत. मुंबईच्या आझाद मैदानावर आपल्या अनुदानासह विविध प्रलंबित मागण्यांसाठी हे आंदोलन होत आहे. यासाठी राज्याभरातील हजारो शिक्षक रस्त्यावर उतरले आहेत. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राज्याभरातील शाळा शाळा बंद राहणार असा संभ्रम विद्यार्थीं-पालकांमध्ये तयार झाला होता. मात्र शिक्षण विभागाने याबाबत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
सोमवारी रात्री उशीरा शिक्षण विभागाचे संचालक महेश पालकर परीपत्रक जारी करत स्पष्ट केलं की, राज्यातील कोणत्याही शाळा आंदोलनामुळे बंद ठेवल्या जाणार नाहीत. शाळांना नियोजित कोणतीही सुट्टी नसतानाही शाळा बंद ठेवणं चूकीचे असून, हे विद्यार्थ्यांचे नुकसान असल्याचं संचालक महेश पालकर यांनी म्हटले आहे. आंदोलनदिवशी ही राज्य शासनाच्या या निर्णयाने आज आणि उद्या शाळा नियमित सुरू राहणार आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांनी नियमित प्रमाणे शाळेत उपस्थित राहावं, असे आवाहनही राज्य शासनाच्या शिक्षण विभागाकडून करण्यात आले आहे.
परंतू जर शाळेत शिक्षकच नसतील तर, शिक्षकांच्या अनुपस्थितीत शाळा कश्या चालतील? हा प्रश्न सध्या विद्यार्थीं-पालकांमध्ये चर्चेचा विषय ठरला आहे. दुसरीकडे शिक्षक आणि कर्मचारी आपल्या मागण्यांवर ठाम असून कोणत्याही परीस्थीतीत आंदोलन मागे घेणार नसल्याचे जाहीर केलं आहे.