उद्या निवडणूका झाल्या तरी भाजप तयार मंत्री चंद्रशेखर बावनकुळे ; ५१ टक्के मते घेऊन आम्ही जिंकणार

    04-Aug-2025
Total Views |

नागपूर : उद्या जरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका झाल्या तरी भाजप पूर्णपणे तयार आहे, असा विश्वास महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सोमवार, ४ ऑगस्ट रोजी व्यक्त केला. त्यांनी नागपूर येथे माध्यमांशी संवाद साधला.

मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, "उद्या जरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका झाल्या तरी भाजप पूर्णपणे तयार आहे. आमचे नियोजन पूर्ण झाले आहे. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली बुथपर्यंत गठन झाले आहे. १२२२ मंडळांमध्ये कार्यकारिणी झाल्या आहेत. पुढच्या काळात प्रत्येक जिल्हांत, प्रत्येक तालुक्यात मेळावे होतील. काही जिल्ह्यांमध्ये देवेंद्रजी स्वत: जात आहेत. आम्ही सर्वच लोक प्रवास करतो आहोत. ज्याप्रमाणे विधानसभेत ५१.७८ टक्के मते घेऊन आम्ही जिंकलो, त्याचप्रमाणे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ५१ टक्के मते घेऊन आम्ही जिंकणार आहोत."

राऊतांना जास्त सिरीसय घ्यायचे नसते

"उद्धव ठाकरेंकडे उरलेसुरले कार्यकर्ते पाच वर्षे सांभाळायचे असल्याने ते असे वक्तव्य करतात. राहुल गांधींसुद्धा बोगस मतदानाचा मुद्दा घेऊन बसले आहेत. मी असे वक्तव्य चालवले तर माझ्या पक्षाचे लोक थांबतील असे त्यांना वाटते. त्याचप्रमाणे आता उद्धव ठाकरेसुद्धा हे बदलणार, ते बदलणार असे सांगत आहेत. पक्षातील लोक सोडून जात असल्याने त्यांना थांबवण्यासाठी त्यांना असे बोलावे लागते. संजय राऊतांना जास्त सिरीसय घ्यायचे नसते. त्यांच्याकडे हिंसाचार करणारी टीम नाही. हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे शिवसेना असताना ती हिंदूत्ववादी विचारांकरिता खरे आंदोलन करायचे. आता यांच्याकडे ना टीम आहे, ना माणसे आहेत. त्यामुळे ते हिंसाचार वगैरे काही करत नाही. हे कायद्याचे राज्य असून हिंसाचाराच्या गोष्टी करणाऱ्यांना सरकार सोडून देणार का? महाराष्ट्र राज्यात हिंसाचाराची भाषा शोभत नाही. इथे कायद्याने काम करावे लागते. महाराष्ट्रात कुणी मराठी भाषेविरुद्ध बोलल्यास आम्ही सहन करणार नाही, हे आम्ही यापूर्वीच सांगितले आहे. आमचे सरकार मराठी भाषिकांच्या पाठीशी आहे," असेही त्यांनी स्पष्ट केले.

...तर सनातन धर्म गप्प बसणार नाही

"जितेंद्र आव्हाड हे विधानसभेत निवडून येण्यासाठी असे विधान करतात. तसे केले नाही तर ते निवडून येणार नाहीत. प्रत्येकवेळी माध्यमांमध्ये राहण्यासाठी ते असे वक्तव्य करतात. पण असे वक्तव्य करून त्यांनी हिंदू समाजाच्या भावना भडकवण्याचे काम करू नये. त्यांनी वारंवार सनातन धर्मावर टीका केल्यास सनातन धर्मसुद्धा गप्प बसणार नाही," असेही मंत्री बावनकुशे म्हणाले.

जिल्हाप्रमुखांना सूचना

"नागपूर येथे झालेल्या महसूल परिषदेमध्ये आमच्या अधिकाऱ्यांनी जवळपास साडेतीनशे सुधारणा सुचविल्या. या सुधारणा लागू केल्यानंतर महाराष्ट्रातील महसूल विभाग देशातील क्रमांक एकचा महसूल विभाग होईल. लोकाभिमुख प्रशासन चालवायचे असल्यास जिल्हाधिकाऱ्यांनी आठवड्यातून एक शुक्रवार प्रवास केला पाहिजे. महसूल विभागाच्या तलाठ्यापासून तर प्रांतापर्यंत सर्व ऑफिसमध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी प्रवास केला पाहिजे. एखाद्या गावात जाऊन जनतेच्या समस्या सोडवल्या पाहिजे. जनतेच्या अडचणी काय आहेत, ते समजून घ्यायला हवे. लोकाभिमुख प्रशासनाची घोषणा करतो तेव्हा अधिकाऱ्यांना जनतेत जावे लागेल, जेणेकरून मंत्र्यांकडे किंवा मुख्यमंत्र्यांकडे जाणाऱ्या तक्रारी कमी होतील. ज्यादिवशी एकही अर्ज महसूल मंत्र्यांना येणार नाही, ज्यादिवशी एकही तक्रार मुख्यमंत्र्यांकडे येणार नाहीत तोच खरा उत्कृष्ट महसूल विभाग ठरेल. पुढच्या तीन वर्षात कुठलाही शेतकरी किंवा व्यक्ती महसूल मंत्र्यांकडे तक्रारी घेऊन येणार नाही असे महसूल प्रशासन तयार करावे, अशा सूचना मी सर्व जिल्हाप्रमुखांना सूचना दिल्या आहेत," असे त्यांनी सांगितले.

माझे वक्तव्य महाराष्ट्रात होत असलेल्या नोटंकीबाज आंदोलनांबाबत

"मी कधीही बच्चू कडूंचे नाव घेतले नाही. या राज्यात अनेक लोक वेगवेगळ्या पद्धतीने नौटंकी करत आहेत. त्यांनी त्यांच्या सरकारच्या काळात काहीही केले नाही. महाराष्ट्रात अनेक नौटंकी आंदोलन सुरु आहेत. याचा अर्थ माझे विधान बच्चू कडूंसाठी आहे असे नाही. अनेक आमदार सभागृहात विषय न मांडता विरोधी पक्षांचे लोक बाहेर बसून आंदोलन करतात. याऊलट बच्चू कडूंनी मांडलेल्या प्रश्नांसंदर्भात मी सगळ्या बैठका घेतल्या आहेत. तसेच १५ ऑगस्टनंतर पुन्हा एकदा सगळ्या बैठका होणार आहेत. त्यांनी सुचवलेल्या प्रश्नावर सरकार काम करत आहेत. ८ विभागांशी संबंधित बच्चू कडूंच्या वेगवेगळ्या मागण्या आहेत. १५ ऑगस्टनंतर त्यासंदर्भात बैठक घेणार आहोत," अशी माहितीही मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.