‘विना सहकार नाही उद्धार’ हा मंत्र जपत गृहनिर्माण क्षेत्रात सल्लागार म्हणून यशस्वी कारकीर्द उभारणार्या अश्विनी बुलाख यांच्याविषयी...
"विशिष्ट क्षेत्रासंदर्भात काम करताना धोरण निश्चित केले जाते. त्या विशिष्ट क्षेत्रातील ज्ञानसंपन्न व्यक्तीने त्या धोरणनिर्मितीमध्ये काम करणे गरजेचे आहे,” ‘सहकार भारती’चे संस्थापक सदस्य सतिश मराठे यांचे हे म्हणणे अश्विनी बुलाख यांच्या मनावर कोरले गेले. गृहनिर्माण संस्था आणि सहकार यामध्ये अश्विनी बुलाख यांना अनेक वर्षांचा अनुभव होता. पुस्तकांमध्ये जे लिहिले, त्यासोबतच वास्तवात गृहनिर्माण संदर्भात काय काय अडचणी आहेत? गृहनिर्माण धोरणांचा वापर कशाप्रकारे केला जातो, याची त्यांना मुळापासून माहिती होती. त्यामुळेच महाराष्ट्र सरकारने गृहनिर्माण संदर्भात धोरण निश्चिती करण्याचे जाहीर केले, त्यावेळी अश्विनी यांनी आपल्या ज्ञानाचा, अनुभवाचा उपयोग करत या गृहनिर्माण धोरणासंदर्भात सूचना मांडल्या.
अश्विनी या ‘सोसायटी प्रो.’ या कंपनीच्या विश्वस्त आहेत. या कंपनीचे मुख्य काम म्हणजे गृहनिर्माण संस्थांना सहकार्य, मार्गदर्शन करणे. तसेच, त्या ‘हाऊसिंग वर्ल्ड कॉ.’ संस्थेच्या संस्थापक अध्यक्षही आहेत. सहकार त्यातही गृहनिर्माण क्षेत्रात सल्लागार म्हणून काम करणे हे सोपे काम नाही. एकतर गृहनिर्माण संस्था एकत्र येणे आणि त्यातही सोसायटी म्हणून त्यांचा पुनर्विकास करता येणे, या सगळ्यांमध्ये कायद्याची जाण, समाजाचे वास्तव माहिती असणे गरजेचे आहे. या सगळ्या परिक्षेपामध्ये अश्विनी या आज बदलापूर आणि परिसरातील ३५० गृहनिर्माण सोसायटीच्या सल्लागार आहेत. या सोसायटीमध्ये १२ हजार, ५०० कुटुंब आहेत.
वाणिज्य शाखेत पदव्युत्तर शिक्षण घेतलेल्या अश्विनी यांनी ‘गर्व्हमेंट डिप्लोमा इन कॉप अकाऊन्टसी’ आणि ‘कॉर्पोटिव्ह हाऊसिंग मॅनेजमेंट या दोन विषयाचेही शिक्षण घेतले. या क्षेत्रात त्यांनी स्वतःचे अस्तित्व निर्माण केले. महिलांनी या क्षेत्रात काम करावे, स्वतःचे उज्ज्वल भवितव्य निर्माण करावे, यासाठीही अश्विनी काम करतात. त्या आज महाराष्ट्रभर गृहनिर्माण धोरणासंदर्भात जागृती करत आहेत. आज त्यांच्या कंपनीमधून कामाची सुरुवात करणार्या एकूण आठ महिलांनी, गृहनिर्माण संस्थेच्या सल्लागार म्हणून स्वतःच्या कंपन्या सुरू केल्या आहेत.
असो! गृहनिर्माण क्षेत्रात सल्लागार म्हणून कार्यरत असतानाच अश्विनी सामाजिक कार्यही करतात. त्या रोटरी क्लबच्या बदलापूर इंडस्ट्रियल इस्टेट विभागाच्या संयुक्त सचिवही आहेत. रोटरी क्लबच्या माध्यमातून शोषित, वंचित आणि खर्या अर्थाने गरजू व्यक्तींच्या उत्थानासाठी त्या काम करतात. गृहनिर्माण संदर्भातून किंवा रोटरी क्लबच्या माध्यमातून झालेल्या लोकसंपर्कातून, अश्विनी यांनी समाजाचे वास्तव जवळून अनुभवले. आज त्या ‘सहकार भारती’च्या राष्ट्रीय कार्यकारणीवर काम करतात तसेच, ‘सहकार भारती’च्या महाराष्ट्र गृहनिर्माण प्रकोष्ठ प्रमुखही आहेत.
दत्तात्रय दामोदरे आणि शैला या सुविद्य सुसंस्कारित दाम्पत्यांना तीन अपत्ये, त्यांपैकी एक म्हणजे अश्विनी. अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातले दामोदरे हे ब्राह्मण कुटुंंब. दत्तात्रय शेती आणि शेतीपूरक व्यवसाय करत. जातीपातीचे भेद न मानणार्या दामोदरे कुटुंंबाचे घर म्हणजे, सर्व गावकर्यांचे हक्काचे ठिकाण. अशा संस्कृतीमध्ये अश्विनी यांचे बालपण संस्कारित होत होते. मोठेपणी सरकारी अधिकारी होण्याची त्यांची ईच्छा होती. अश्विनी पुढे महाविद्यालयीन शिक्षणासाठी त्यांच्या काकांकडे, छत्रपती संभाजीनगर येथे आल्या. महाविद्यालयात शिकत असतानाच त्यांनी ‘आयएसडब्लू’साठीही अभ्यास सुरू केला मात्र, ती दुर्दैवी घटना घडली.
अश्विनी यांच्या गर्भाशयाला गाठ असण्याचे निदान झाले. त्यावर उपचारही सुरू झाले, शस्त्रक्रिया झाली. त्यांना सांगण्यात आले की, शस्त्रक्रिया झाली असली तरीही भविष्यात आई होणे अवघड आहे. कोवळे वय, आता कुठे भविष्याचे स्वप्न रंगवले होते, हे सगळे ऐकून कुणीही खचलेच असते. पण, सुदैवाने अश्विनी यांच्या आईबाबांनी आणि जवळच्या नातेवाईकांनी त्यांना कधीच निराश होऊ दिले नाही. बाबा म्हणाले, "आशू सगळे कधीच संपत नसते. थांबून कसे चालेल. शिक्षण पूर्ण कर.” अश्विनी यांनी नव्या जिद्दीने शिक्षण पूर्ण केले. पुढे कामानिमित्त कल्याणला त्या त्यांच्या आत्याकडे आल्या. तिथेच ‘अखिल भारतीय विद्यार्थी परिषदे’चे कार्यकर्ते प्रविण बुलाख यांच्याशी विवाह ठरला. अर्थात अश्विनी यांनी त्यांना स्वतःच्या शस्त्रक्रियेविषयी पूर्ण कल्पना दिली होती. प्रविण यांच्याशी विवाह म्हणजे, अश्विनी यांच्या जीवनातले महत्त्वाचे प्रेरणादायी परिवर्तनच होते. पुढे या दाम्पत्यांना युगा नावाचे कन्यारत्नही झाले. स्थिरस्थावर झाल्यावर अश्विनी यांनी व्यवसाय करण्याचे ठरवले. सुरुवातीला विविध चटण्या तयार करून विकण्याचाही व्यवसाय त्यांनी केला. पण, अकाऊंट्सची आवड असल्याने त्यांनी गृहनिर्माण संस्थांच्या अकाऊंट्ससंदर्भात काम सुरू केले. यात त्यांनी चांगला जम बसवला. त्या म्हणतात, "स्वतःचे घर हे सगळ्यांचेच स्वप्न आहे. हे स्वप्नपूर्ण करण्यासाठीचे मार्गदर्शन समाजाला करणे गरजेचे आहे. मी आयुष्यभर हेच काम करणार आहे. तसेच, सहकार क्षेत्रात भवितव्य निर्माण करण्यासाठी स्त्रीशक्तीने पुढे यावे, यासाठीही मी काम करणार आहे. सहकार तत्त्वावर समाजाची प्रगती होणे, गरजेचे आहे. कारण, ‘विना सहकार नाही उद्धार!” सर्वांचे हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण व्हावे यासाठी झटणार्या अश्विनी बुलाख यांच्या पुढील वाटचालीसाठी दै ’मुंबई तरुण भारत’च्या हार्दिक शुभेच्छा!