मुंबई : मुंबईच्या इतर मेट्रो मार्गांप्रमाणेच आता मुंबई मेट्रो ३वर देखील सहज ‘टॅप अॅन्ड ट्रॅव्हल’ सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनने 'नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया' आणि 'स्टेट बँक ऑफ इंडिया' यांच्या सहकार्याने मुंबई मेट्रो३वर रुपे एनसीएमसी कार्ड तयार केले आहे. या कार्डचे अनावरण मंगळवार, दि.१० रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पार पडले. यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक, एमएमआरसीच्या व्यवस्थापकीय संचालक अश्विनी भिडे आणि संचालक (प्रणाली) राजीव उपस्थित होते.
या नवीन सुविधेमुळे आता प्रवासी आरे जे.व्ही.एल.आर. ते आचार्य अत्रे चौक दरम्यान एनसीएमसी कार्ड वापरून सहज व संपर्करहित प्रवास करू शकतील. यामुळे तिकीट खिडकीवर रांगा टाळता येतील आणि प्रवास अधिक जलद व सुरक्षित होईल. हे एनसीएमसी कार्ड कार्ड मेट्रो मार्ग ३ सोबतच मार्ग २अ , ७ आणि मार्ग १ वर देखील वापरता येईल. त्यामुळे एकसंध व सोयीस्कर प्रवासाचा अनुभव मिळेल. इतर मेट्रो मार्ग व 'चलो बस' सारख्या ट्रान्सपोर्ट ऑपरेटर्सने उपलब्ध करून दिलेले एनसीएमसी कार्ड्स देखील मेट्रो मार्ग ३ वर वापरता येतील. प्रवाशांना आज बुधवार दि.११ जून २०२५ पासून सकाळी ११ वाजल्यापासून ही सेवा उपलब्ध होईल. नवीन एनसीएमसी कार्ड आरे जे व्ही एल आर ते आचार्य अत्रे चौक दरम्यान कोणत्याही स्थानकावर उपलब्ध आहे व एसबीआयच्या सहभागी शाखांमधुन कार्ड मिळेल. हे कार्ड मोफत दिले जात आहे, मात्र वापरासाठी ₹१०० ते ₹२००० पर्यंत अनिवार्य टॉप-अप करणे आवश्यक आहे.
“एनसीएमसी कार्ड हे इतर वाहतूक सुविधा जसे की बेस्ट बसेस तसेच विविध मेट्रो मार्ग च्या एकत्रीकरण च्या दृष्टीने व सावर्जनिक वाहतूक व्यवस्था अधिक बळकट करण्याचा दृष्टीने एक महत्त्वाचा टप्पा आहे. नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया व एसबीआय यांच्या सहकार्याने आम्ही मुंबईकरांसाठी एक सुलभ आणि एकत्रित प्रवासाचा अनुभव देण्यासाठी कटिबद्ध आहोत,” असे मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या व्यवस्थापकीय संचालिका अश्विनी भिडे यांनी सांगितले.