
निरोगी मनाचे गुणधर्म पाहत असताना आपल्या एक गोष्ट लक्षात येते की, निरोगी मनाचा सर्वात मोठा शत्रू म्हणजे आपला अहंकार. (इगो) असे लक्षात आले की, माणसाच्या बहुतांश समस्या या अहंकारामुळेच होत असतात. जगात ज्या लोकांना अहंकार आहे, त्या सवर्र् लोकांना कधीना कधीतरी या अहंकाराचा फटका १०० टक्के बसलेलाच आहे. ‘इगो’ आणि ‘सेल्फ रिसपेक्ट’ म्हणजे अहंकार आणि स्वाभिमान यामध्ये अगदी धूसर रेषा असते. वरकरणी दोन्ही सारखेच वाटतात. परंतु, सर्वात महत्त्वाचा फरक म्हणजे अहंकार हा ‘डिस्ट्रक्टिव्ह’ म्हणजेच विघटनात्मक असतो, तर स्वाभिमान हा ‘कन्स्ट्रक्टिव्ह’ म्हणजे रचनात्मक असतो. छत्रपती श्री शिवाजी महाराजांजवळ होता, तो स्वाभिमान आणि औरंगजेबाकडे होता, तो अहंकार. महाराणा प्रताप यांच्याजवळ होता, तो स्वाभिमान आणि अकबराकडे होता, तो अहंकार! या अहंकारामुळे माणसाचे अतोनात नुकसान होते. अनेक नाती, अनेक संबंध या ‘मी’पणामुळे तुटतात. आपल्या मनातील स्वतःबद्दलचा एक चुकीचा समज, तो खरंतर चुकीचा असूनही स्वतःला अतिशय योग्य व यशोचित वाटत असतो आणि हा समज म्हणजे स्वतःलाच स्वतःचे अतिमहत्त्वाचे (सेल्फ इम्पॉर्टटन्स) वाटतो. त्यामुळे स्वतःच्या स्वभावास उर्मटपणा, उद्धटपणा व स्वयंकेंद्रीतपणा येऊ लागतो. हा अहंकार आपल्या भोवती एक मायावी अदृश्य वलय तयार करत असतो. या वलयामुळे आपल्याला बाकी काहीही दृष्टीस पडत नाही व जिकडे तिकडे फक्त ‘मी’, ‘मी’ आणि ‘मी’च दिसत राहतो. या ‘मी’पणामुळे मग आपलेपणा निघून जातो राहतो. तो फक्त ‘अहं.’
अहंकारामुळे मग स्वतःपुरतेच विचार करण्याची कोती मनोवृत्ती वाढीला लागते आणि आत्मकेंद्रित विचारसरणीमुळे इतरांच्या भल्याबुर्याचा काहीही विचार न करता स्वतःला पाहिजे, त्या पद्धतीने व स्वतःला हवे तसे वागण्याची मनोवृत्ती वाढीला लागते. यात समोरच्याला काय वाटेल व कोणी दुखावले जाईल, याचा मागमूसही या अहंकारी लोकांना नसतो. इतिहासातील अजून एक उदाहरण या अहंकारासाठी आपल्या समोर येते व ते म्हणजे जर्मनीचा हुकूमशहा अॅडॉल्फ हिटलर याचे. हिटलर ने स्वतःच्या अहंकारी आणि अप्पलपोटे स्वभावाने संपूर्ण जगाला महायुद्धाच्या खाईत लोटले. त्यामुळे जगभरात किती विनाशकारी गोष्टी घडल्या. लाखो लोकांचे बळी या अहंकारामुळे गेले. जपानवर हिरोशिमा-नागासाकीवर अणुबॉम्ब पडला. संपूर्ण जग हादरुन गेले. म्हणजेच काय, तर हा अहंकार कधीही बांधणी करत नाही तर तोडतो. स्वाभिमान हा नेहमी सकारात्मक बांधणी करत असतो. अहंकार सदैव माणसाचे व त्यामुळे संपूर्ण समाजाचे नुकसानच करत असतो. सतत इतरांना पाण्यात पाहून स्वतः कसेही करून इतरांपेक्षा मोठे व्हायचे व तो मोठेपणा मिरवून दाखवायचा व तसे वागत राहायचे, अशा वृत्तीमुळे व विशेष काहीही नसताना स्वतःबद्दलचा खोटा समज असणे व स्वतःबद्दल स्वतःच मोठेपणा करत राहणे (Booster) म्हणजेच हा ‘मी’पणा किंवा अहंकार. म्हणूनच सर्व साहित्यात असे सांगून ठेवले आहे की, अहंकार हा निरोगीमनाचा सर्वात मोठा शत्रू आहे.
डॉ. मंदार पाटकर
(लेखक एमडी होमियोपॅथी आहेत.)