अधारणीय शारीरिक वेगाचे महत्त्व तसेच ते रोखल्यास निर्माण होणारे धोके हानीकारकच. त्यामुळे अशा वेगांना अथबा त्याच्या संवेदनांना न रोखण्याचा सल्लाच आयुर्वेद देत असते. या लेखामध्ये जांभई या अशाच एका अधारणीय शारीरिक वेगाविषयी जाणून घेऊया...
मनुष्य शरीर हे एक वेल ऑइल्ड मशीनसारखे अविरत कार्यरत असते. शरीरातील विविध संस्था (जसे श्वसन संस्था, पचन संस्था इत्यादी) एकमेकांच्या कार्याला पूरक, असेच स्वतःचे कार्य करीत असतात. मनुष्याच्या शारीरिक, भावनिक, मानसिक कार्यामध्ये एक नियमितता असते. एक पॅर्टन आहे, ते रँडमाईझ नाही. या नियमिततेला एक लयबद्धता असते, जैविक चक्र असते. त्या त्या वेळेत झोप येणे, भूक लागणे, मासिक पाळी इत्यादी सर्व लयबद्ध पद्धतीने घडत असते. या नियमिततेमुळे शरीराला कधी काय करायचे आहे, किती प्रमाणात व कसे हे माहीत पडते आणि आरोग्य जतन केले जाते. शरीराचे अचूक काम घडवून आणण्यासाठी, शरीरातील नैसर्गिक क्रिया विशिष्ट कालावधीने, अंतराने वारंवार घडत असतात. यातूनच शारीरिक व मानसिक वेगांची उत्पती होते. शारीरिक वेगांचे धारण करायचे नसते. हे वेग म्हणजे शरीरातील टाकाऊ घटक, अनावश्यक घटकांचे शरीरातून निष्कासन करणे आहे. या उलट मानसिक वेगांना रोखायचे असते, त्यांचे वारंवार प्रकटीकरण स्वास्थ्य रक्षणासाठी पूरक नाही.
शारिरीक वेगांचे धारण करू नये, ते रोखू नये असे आयुर्वेद शास्त्र सांगते. आयुर्वेदाचे केवळ रोग बरा करणे एवढेच ध्येय नाही, तर स्वस्थ व्यक्तीचे स्वास्थ राखणे हे पहिले व महत्त्वाचे ध्येय आहे. याचबरोबर ऋतुनुरूप वारंवार होणारे रोग यांचेही समूळ उच्चाटण करणे, या शास्त्राद्वारे सहज शक्य होते. पुन्हा व्याधी होऊ नये, म्हणून अपूनर्भव चिकित्सा देखील सांगितली आहे. थोडक्यात काय, तर प्रिव्हेंटिव्ह, क्युरेटिव्ह बरोबरच रिज्युव्हेंटिव्ह अशा पद्धतीची चिकित्सा प्रणाली म्हणजे आयुर्वेद होय. या सर्व बाजूंवर कार्य करताना केवळ आभ्यंतर औषधोपचार (ओरल मेडिसीन) पुरेसे नसतात. उत्तम आहार, शांत झोप व ब्रह्मचर्येचे पालन (या त्रयींना त्रयोपस्तंभ अशी संज्ञा आहे. ज्याच्यावर आरोग्य अवलंबून आहे, असे हे तीन स्तंभ म्हणजे खांब आहेत.) याने आरोग्य टिकविणे अधिक सुलभ होते.
शारीरिक वेगांचे धारण करणे हे आरोग्यासाठी बाधक आहे. शरीरातील टाकाऊ घटक जर शरीरात अति काळासाठी आणि वारंवार साठविला गेला, तर त्याने विविध आजार ओढावू शकतात. काही आजार तात्कालिक स्वरूपाचे असतात, तर काही चिरकारी स्वरूपाचे. आयुर्वेद चिकित्सा पद्धतीमधील एक पायरी महत्त्वाची आहे, ती म्हणजे निदान परिवर्जन. याचाच अर्थ ज्या कारणाने, हेतूने आजार झाला आहे ते कारण दूर करणे, त्यापासून लांब राहणे. जर शारीरिक वेगांचे धारण केल्यामुळे रोग झाला असेल, तर सर्वांत आधी तो वेग रोखण्याची सवय त्या व्यक्तीला सोडावी लागेल. तेव्हा त्या आजारापासून, त्रासापासून संपूर्ण आराम मिळू शकतो. केवळ पील पॉपिंग म्हणजे औषधे घेतल्यास तात्पुरता आराम पडल्याचा आभास निर्माण नक्की होतो. पण, त्या त्रासाची मुळे अधिक खोल रुतून तो आजार जास्त चिरकारी होत जातो.
मागील सात लेखांमधून याच अधारणीय वेगांबद्दल आपण वाचत आहोत. एकूण 13 शारीरिक अधारणीय वेग सांगितले आहे. त्यातील शौच वेग, मूत्रवेग, अधोवाताचा वेग, शिंक येण्याची प्रवृत्ती, भुकेची संवेदना, तहान लागल्याची संवेदना, झोप, खोकला, अश्रू, उल्टी आणि ढेकर येणे (स्वाभाविकतः काही पेय, चूर्ण पिऊन ढेकर काढणे नव्हे) या वेगांबद्दल आधीच्या लेखांमधून वाचले असेल. अशाच एका अधारणीय शारीरिक वेगाबद्दल ज्याचे शरीरातून जर निष्कासन झाले नाही, तर विविध रोग संभावू शकतात त्याबद्दल वाचूया. ती संवेदना म्हणजे जृम्भा (जांभई धरुपळपस).
माणूस कंटाळला की त्याला जांभई येते. माणूस अतिकष्ट करून दमला की, त्याला वरचेवर जांभई येते. झोप आली असता झोपलो नाही, तर जांभयांची श्रुंखलाच सुरू होते. एवढचे काय इतर कोणी जांभई देत असेल, तर त्यांची जांभई बघूनसुद्धा जांभई येते. मानसिक ताण जास्त असल्यासही जांभया जास्त येतात. थोडक्यात काय, तर जांभया कधी येतील, किती येतील, याचा काही भरवसा नाही. जांभई येण्यापूर्वी मोठा श्वास आत घेतला जातो आणि जोराने तोंडावाटे श्वास सोडता सोडता जांभई येते, बरेचदा डोळेही पाणावतात. यामुळे शरीरात ऑक्सिजनचे प्राण तात्पुरते वाढविले जाते आणि कार्बन डायऑक्साईडचे शरीरातून निष्कासन केले जाते.
अति जांभया काही वेळेस झोपेच्या तक्रारींमुळे अधिक येतात. ’स्लीप अॅप्नीया’ या प्रकारच्या व्याधीत, रात्री झोपेत श्वास कमी पडतो आणि गुदमरल्यासारखे वाटू लागल्याने शांत झोप लागत नाही.तसेच, अन्य कारणांनीही झोप कमी झाली, उशिरा लागली, तुटक-तुटक झोप लागली, जागरण झाले, तरी सकाळी जांभया खूप येतात. अभ्यास अधिक झाला, तरी जांभया येऊ लागतात. म्हणजे ऑक्सिजनची कमतरता चटकन भरून काढण्यासाठी जांभई हा उपाय होऊ शकतो आणि त्याचबरोबर ताजेतवाने वाटण्यासाठी, दक्षता वाढविण्यासाठीही याचा अवलंब शरीर करत असते. मानसिक चिंता, भीती, अॅन्झायटी असतेवेळी स्वाभाविकतः श्वासोच्छवास कमी होत असतो. यामुळे ऑक्सिजनचे प्रमाणही थोडे कमी होते.दीर्घश्वसनाने ऑक्सिजनचे प्रमाण शरीरात वाढविता येते पण, कार्बन डायऑक्साईडला एका झटक्यात साध्या प्रमाणात आणण्याचे काम जांभईनेच साध्य होते.
ज्या कारणांनी अतिरिक्त प्रमाणात जांभया येत असतील, त्या कारणांना दूर केल्याने जांभया येणे कमी होते, त्याचे प्रमाण आटोक्यात येते. झोपेच्या तक्रारींवर पादाभ्यंग (तळव्यांना तेलाचा मसाज) सर्वांग अभ्यंग, शिरोधारा इत्यादी चिकित्सेचा उत्तम परिणाम होतो. दीर्घ श्वसन व समुपदेशनाने मानसिक ताण, चिंता कमी करण्यास मदत होते. या उपायांसाठी तज्ज्ञ वैद्यांचे मार्गदर्शन घेणे अत्यंत गरजेचे आहे, स्वतःहून प्रयोग करत बसू नये. जांभई या शारीरिक वेगाची संवेदना रोखू नये. कारण, यामध्ये वाताचा जोर असतो. जर या वाताच्या स्वाभाविक गतीला अडविले, तर मुख, कर्ण (कान) व नासा (नाक) या अवयवांमध्ये विकृती निर्माण होऊ शकते. नाकातून रक्तस्राव, चक्कर येणे, कान दुखणे व क्वचित कानाच्या पडद्याला इजाही होऊ शकते. तसेच, नेत्राचे (डोळ्यांचा) काही तक्रारी उत्पन्न होऊ शकतात. अश्रू प्रवाह थांंबविल्याने (बराच काळ, बरेचदा) डोळ्यातील ताण वाढून दृष्टीवर त्याचा परिणाम होऊ शकतो. जांभई देतेवेळी मानेच्या शिराही ताठरतात. मानेचे स्थायूही ताणले गेल्याने, यामध्येही दुखापत होऊ शकते. मान जखडणे, मानेचे मणके दुखणे इत्यादी तक्रारी उत्पन्न होतात. जांभईमधील वायूची गती व जोर यावर विविध लक्षणांची तीव्रता ठरते. अति जोर असल्यास लक्षणे ही तीव्र स्वरूपाची व चिरकारी स्वरूपाची असू शकतात. क्वचित प्रसंगी कायमचा अपायदेखील घडवू शकतात. जांभई ही संवेदना निर्माण होता होता मध्येच रोखल्यास, त्याचा परिणाम तीव्र स्वरूपाचा असू शकतो. मन्या (मानेचे) व क्वचित सर्वांगामध्ये कंप (कापरं) निर्माण होऊ शकते आणि तीव्र स्वरूपामध्ये मस्तिष्कामध्ये अनिष्ट परिणाम उत्पन्न होऊ शकतात. हे सर्व टाळता येऊ शकते आणि म्हणून शारीरिक वेगांचे वारंवार व प्रदीर्घ काळापर्यंत धारण शरीरास व मनास बाधाकर आहे. (क्रमशः)