मुंबई, स्थानिक स्वराज्य संस्थांचा बिगुल वाजला असताना, शरद पवारांनी अचानक प्रदेशाध्यक्ष बदलल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. ७ वर्षे एकहाती पक्ष सांभाळणाऱ्या जयंत पाटलांनी अचानक राजीनामा द्यावा आणि तो शरद पवारांनी स्वीकारावा, इतक्यापुरती ही घटना मर्यादीत नाही. त्यामुळे हा राजीनामा खरोखरच स्वेच्छेने दिला गेला की पक्षातील गटबाजीमुळे त्यांना हटवण्यात आले, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. दुसरीकडे, शशिकांत शिंदे यांच्या गळ्यात प्रदेशाध्यक्ष पदाची माळ पडली असली, तरी रोहित पवार आणि समर्थकांत भलती नाराजी पसरल्याचे चित्र आहे.
लोकसभा निवडणुकीतील मर्यादित यशानंतर विधानसभेला शरद पवार गटाची कामगिरी समाधानकारक ठरली नाही. मराठवाडा आणि विदर्भात पक्ष वाढवण्यात जयंत पाटील कमी पडल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला. या पार्श्वभूमीवर पक्षात अस्वस्थता वाढली होती. काही महिन्यांपासून नेतृत्व बदलाची चर्चा सुरू होतीच. शरद पवार यांनी पक्षात ‘भाकरी फिरवली’ अशी चर्चा असली, तरी जयंत पाटील यांना बाजूला सारण्यामागे केवळ निवडणुकीतील अपयश नव्हे, तर अंतर्गत राजकारणाचीही छाया दिसते.
७ वर्षे टिकवलेली खुर्ची गेल्याच्या दुःखात जयंत पाटील पुरते भावून झाले. मंगळवारी शशिकांत शिंदे यांच्या निवडीचा प्रस्ताव मांडताना भावनिक भाषण करत त्यांनी आपली बाजू मांडली. "मी २ हजार ६३३ दिवस एकही सुट्टी न घेता प्रदेशाध्यक्षपद सांभाळलं. साहेबांशी २५ वर्षांची निष्ठा राखली. माझे सगळे सहकारी गेले, तरी मी साहेबांसोबत एकनिष्ठ रहाण्याचा निर्णय घेतला. दोन खासदार असलेला भाजप मोठा होऊ शकतो, तर १० आमदार असलेला आपला पक्ष मोठा का होऊ शकत नाही?" असे म्हणत जयंत पाटील यांनी नव्या अध्यक्षांच्या निवडीचा प्रस्ताव मांडला. त्यानंतर, शशिकांत शिंदे यांच्या नावाची घोषणा शरद पवार यांनी केली.
शशिकांत शिंदेंसमोर तगडे आव्हान- सातत्यपूर्ण पराभवामुळे बॅकफूटवर गेलेल्या शशिकांत शिंदे यांच्यासाठी ही नामी संधी असली, तरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ येत असताना पक्षाला पुन्हा उभे करण्याचे मोठे आव्हान असणार आहे. त्याचवेळी जयंत पाटील यांच्या समर्थकांचा असंतोष, रोहित पवार यांची धडपड आणि पक्षातील गटबाजी यामुळे त्यांचे काम सोपे नसेल.
- जयंत पाटील यांचा अनुभव आणि पक्षाशी असलेली निष्ठा लक्षात घेता, त्यांच्या अचानक बाजूला होण्यामुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. ते दुसऱ्या पक्षात गेले, तर शरद पवार गटासाठी तो मोठा धक्का ठरू शकतो.
- एकंदरीत, सध्या पक्षासमोर स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका, गटांतटांमध्ये समन्वय आणि नव्या नेतृत्वाला स्थैर्य देण्याचे आव्हान आहे. शिंदेंच्या नेतृत्वाला यश मिळेल की नाही, आणि जयंत पाटील पुढे काय भूमिका घेतात, यावरच शरद पवार गटाचा पुढचा प्रवास ठरणार आहे.