नवी दिल्ली, केरळमधील ३७ वर्षीय परिचारिका निमिषा प्रिया यांना आज, १६ जुलै रोजी देण्यात येणारी फाशी केंद्र सरकारच्या हस्तक्षेप आणि प्रयत्नांनंतर पुढे ढकलण्यात आल्याचे अधिकृत सूत्रांनी सांगितले आहे.
प्रकरणाच्या सुरुवातीपासूनच मदत करत असलेल्या केंद्र सरकारने मागील काही दिवसांत निमिषा प्रिया यांच्या कुटुंबाला दुसऱ्या पक्षासोबत परस्पर सहमतीने तोडगा काढण्यासाठी अधिक वेळ मिळावा, यासाठी विशेष प्रयत्न केले. प्रकरणातील संवेदनशीलता लक्षात घेऊनही भारतीय अधिकारी स्थानिक तुरुंग प्रशासन व सरकारी वकिलांच्या कार्यालयाशी सातत्याने संपर्कात होते. या प्रयत्नांमुळेच अखेर ही मुदतवाढ मिळवण्यात यश आले, असे अधिकृत सूत्रांनी सांगितले आहे.
या स्थगितीमुळे निमिषा प्रिया यांच्या कुटुंबाला आणि भारतीय अधिकाऱ्यांना परस्पर सहमतीने तोडगा काढण्यासाठी वाटाघाटी करण्यासाठी अतिरिक्त वेळ मिळाला आहे.
निमिषा प्रियावर २०१७ मध्ये तिचा येमेनी व्यावसायिक भागीदार तलाल अब्दो महदीची हत्या केल्याचा आरोप आहे. या प्रकरणात तिला २०२० मध्ये मृत्युदंडाची शिक्षा सुनावण्यात आली आणि २०२३ मध्ये तिचे अंतिम अपील फेटाळण्यात आले. तिच्या फाशीची तारीख १६ जुलै २०२५ निश्चित करण्यात आली. सध्या निमिषा येमेनची राजधानी साना येथील तुरुंगात आहे. अलीकडेच, निमिषा हिच्या मृत्युदंडाला स्थगिती देण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिकेवर सुनावणी झाली. सर्वोच्च न्यायालयात, सरकारच्या वतीने अॅटर्नी जनरल यांनी सांगितले की, भारत सरकार प्रियाला मदत करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे.