नवी दिल्ली : ‘ऑपरेशन सिंदूर’द्वारे भारताने भ्याडपणास पराक्रमाने उत्तर दिले आहे. भारताच्या सार्वभौमत्वावर, अखंडतेवर किंवा जनतेवर हल्ला करण्याचा प्रयत्न करतील, त्यांना भविष्यातही ठोस आणि निर्णायक उत्तर देण्यात येईल; असा इशारा देशाचे लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी शनिवारी शत्रूल दिला आहे. लडाखमधील द्रास येथे कारगिल विजय दिनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते.
पहलगाम येथे झालेला दहशतवादी हल्ला ही संपूर्ण देशासाठी एक खोल जखम होती. परंतु यावेळी भारताने केवळ दुःख न व्यक्त करता निर्णायक आणि पराक्रमी उत्तर देण्याचा निर्धार केला. याच निर्धारातून 'ऑपरेशन सिंदूर' राबवण्यात आले. या मोहिमेंतर्गत 6 ते 7 मेच्या रात्री भारतीय लष्कराने पाकिस्तान आणि पीओकेमध्ये स्थित नऊ दहशतवादी तळांवर अचूक हल्ला केला. विशेष म्हणजे, या कारवाईत एकाही निरपराध नागरिकाला इजा पोहोचली नाही. ही केवळ बदला घेण्याची कृती नव्हती, तर जगासमोर भारताचा स्पष्ट आणि कठोर संदेश होता की, दहशतवादाला मदत करणाऱ्यांना आता माफ केले जाणार नाही, असे लष्करप्रुख जनरल द्विवेदी म्हणाले.
पाकिस्तानकडून या कारवाईनंतर 7 ते 9 मे दरम्यान झालेल्या प्रत्युत्तरात्मक सैनिकी हालचालींवरही भारताने तोडीस तोड उत्तर दिले. जनरल पुढे द्विवेदी म्हणाले की, भारतीय लष्कराने अचूक आणि मोजून पावले टाकत प्रत्युत्तर दिल. विशेषतः भारताच्या आर्मी एअर डिफेन्सने अभेद्य भिंतीप्रमाणे कार्य केलं. "कोणताही ड्रोन वा क्षेपणास्त्र आमच्या संरक्षण यंत्रणेच्या आत प्रवेश करू शकले नाहीत. हे भारताच्या सामूहिक क्षमतेचे प्रतीक आहे. भारताची ही कारवाई एकात्मिक अप्रोचचा भाग होती. यामध्ये लष्कर, वायुदल, नौदल आणि इतर सर्व सरकारी यंत्रणा एकत्र येऊन समन्वयाने काम करत होत्या.," असा इशाराही त्यांनी दिला.
शत्रूस धडकी भरवणार लष्कराची ‘रुद्र ब्रिगेड’
भारतीय लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी कारगिल विजय दिवसाच्या निमित्ताने ‘रुद्र’ नावाच्या नव्या "सर्व-शस्त्र ब्रिगेड"ची घोषणा केली आहे. ही ब्रिगेड लष्कराच्या आधुनिकीकरण आणि एकत्रित युद्धतंत्राच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. ‘रुद्र ब्रिगेड’मध्ये इन्फन्ट्री, आर्टिलरी, एअर डिफेन्स, ड्रोन युनिट्स यांचा समावेश असून विविध प्रकारच्या लढाऊ क्षमतांना एकत्र आणण्यात आले आहे. प्रत्येक इन्फन्ट्री बटालियनमध्ये स्वतंत्र ड्रोन प्लाटून असतील, जे अत्याधुनिक पद्धतीने गुप्त माहिती मिळवण्यासाठी उपयुक्त ठरणार आहेत. आर्टिलरी युनिट्समध्ये ‘दिव्यास्त्र बॅटरी’ आणि ‘लोइटर म्युनिशन बॅटरी’च्या माध्यमातून लक्ष्यभेदक क्षमतांमध्ये मोठी वाढ झाली आहे. स्वदेशी क्षेपणास्त्र प्रणालींनी सुसज्ज अशी एअर डिफेन्स युनिट्स शत्रूच्या हवाई हल्ल्यांना त्वरित प्रत्युत्तर देऊ शकतात. ही ब्रिगेड सीमावर्ती भागांतील धोके ओळखून, पाकिस्तान आणि चीनच्या कारवायांना रोखण्यास सक्षम असेल.
विविध प्रतिक्रिया
· कारगिल विजय दिनानिमित्त, मातृभूमीसाठी आपले प्राण अर्पण करणाऱ्या शूर सैनिकांना श्रद्धांजली. हा दिवस आपल्या सैनिकांच्या असाधारण शौर्य, धैर्य आणि दृढनिश्चयाचे प्रतीक आहे. देशासाठी त्यांचे समर्पण आणि सर्वोच्च बलिदान नेहमीच देशवासीयांना प्रेरणा देत राहील, असे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी म्हटले आहे.
· पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कारगिल विजय दिवसानिमित्त देशवासियांना शुभेच्छा दिल्या. हा दिवस मातृभूमीच्या संरक्षणासाठी आपले जीवन अर्पण करणाऱ्या भारतमातेच्या वीर सुपुत्रांच्या अतुलनीय शौर्य आणि पराक्रमाची आठवण करून देतो, असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.
· कारगिल युद्धातील अत्यंत प्रतिकुल परिस्थितीत देशाच्या सन्मानाचे रक्षण करण्यासाठी भारतीय वीरांनी असाधारण शौर्य आणि धैर्य दाखवला होता. कारगिल युद्धातील भारतीय सशस्त्र दलांचे सर्वोच्च बलिदान आपल्या सशस्त्र दलांच्या अटल निर्धाराचे शाश्वत प्रतीक आहे. देश त्यांच्या सेवेचा कायम ऋणी राहील, असे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह म्हटले.