मार्क्सच्या प्रभावामुळे नेहरूंचे भारतीयत्वाकडे दुर्लक्ष – बलबीर पुंज - प्रशांत पोळ लिखित ‘खजाने की शोधयात्रा’ पुस्तकाचे प्रकाशन

    26-Jul-2025   
Total Views |

नवी दिल्ली :  पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यावर मार्क्सवादाचा आणि वसाहतवादाचा मोठा पगडा होता. त्यामुळे त्यांनी स्वातंत्र्यानंतरही भारतीयत्वाकडेस दुर्लक्ष केले. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदींमुळे त्यातून बाहेर पडण्याची प्रक्रिया गतीमान झाली, असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत बलबीर पुंज यांनी शनिवारी केले.

प्रशांत पोळ लिखित ‘खजाने की शोधयात्रा’ या पुस्तकाचे प्रकाशन प्रभात प्रकाशनातर्फे दिल्लीतील केशवकुंज या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यालयात झाले. प्रकाशन प्रज्ञा प्रवाहचे अ. भा. संयोजक जे. नंदकुमार आणि ज्येष्ठ विचारवंत बलबीर पुंज यांच्या हस्ते झाले. यावेळी रा. स्व. संघाचे सरकार्यवाह दत्तात्रेय होसबळे उपस्थित होते.

भारतीय समाज हा सनातन म्हणजेच सतत उत्क्रांत होणारा समाज आहे. मात्र, ही परंपरा परकीय आक्रमकांच्या सततच्या आक्रमणाने ही परंपरा खंडित झाली होती. इस्लामी आक्रमणासह अन्य आक्रमणांचा नेमका किती खोलवर परिणाम झाला, याचा सखोल अभ्यास आवश्यक आहे. अर्थात ही प्रक्रिया १९४७ पासूनच व्हायला हवी होती. मात्र, पं. जवाहरलाल नेहरू हे मार्क्सवाद आणि वसाहतवादाच्या मोठ्या प्रभावात होते. परिणामी स्वातंत्र्यानंतरही ही प्रक्रिया सुरू होऊ शकली नाही. अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान असताना या प्रक्रियेस सुरूवात झाली आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळापासून वसाहतवादाच्या प्रभावातून बाहेर पडण्याच्या प्रक्रियेस गती आली, असे बलबीर पुंज म्हणाले.

ज्ञान आणि भारत हे समानार्थी शब्द असल्याचे जे. नंदकुमार यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले, भारत या नावाचा उद्भव बघितल्यास त्याच्या मुळाशी ज्ञानच आहे. भारतीय भाषांचेही असेच महत्व आहे, म्हणूनच कोणतेही नाव देताना त्याचा अर्थ आणि उद्भव बघण्याची भारतीय परंपरा आहे. राम, कृष्ण यांची नावे ठरवतानाही तत्कालीन ऋषींनी मोठा विचार केला होता. त्यामुळे भारतीय ज्ञानपद्धतीचा सखोल अभ्यास काळाची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.

भारतीय ज्ञानपरंपरेच्या अभ्यासात तरुणांचा मोठा वाटा हवा, असे मत लेखक प्रशांत पोळ यांनी व्यक्त केले. भारतीयांनी विविध क्षेत्रात जे जे काम केले, त्याचे श्रेय मिळायलाच हवे.आपला इतिहास अतिशय गौरवशाली आहे, मात्र केवळ त्यातच अडकून राहणे योग्य नाही. आजही हे ज्ञान काळसुसंगत असून त्यामध्ये सातत्याने संशोधन करणे गरजेचे आहे, असेही ते म्हणाले.