भारतीय लष्कराच्या 'ऑपरेशन महादेव'ला यश! पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड हाशिम मुसासह तीन दहशतवादी ठार

    28-Jul-2025   
Total Views | 82


श्रीनगर : (Operation Mahadev)  जम्मू-काश्मीरमधील श्रीनगरमधील लिडवास येथे सोमवारी २८ जुलैला सैन्याने पहलगाम दहशतवादी हल्ल्याशी संबंधित ३ दहशतवाद्यांना ठार केले. भारतीय लष्कराच्या चिनार कॉर्प्सने या संदर्भात माहिती दिली. लष्कराने सांगितले की, ही कारवाई ऑपरेशन महादेव अंतर्गत करण्यात आली आहे. लष्काराने दिलेल्या माहितीनुसार या कारवाईत पहलगाम हल्ल्याचा सूत्रधार दहशतवादी हाशिम मुसा याचाही मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.

भारतीय सैन्य दहशतवाद्यांपर्यंत कसं पोहोचलं?

समोर आलेल्या माहितीनुसार, दाचीगामच्या सामान्य भागात एक संशयित दहशतवादी संदेश सापडला आणि या संदेशवहन उपकरणाचा वापर करणाऱ्याचा पहलगाम हल्ल्याशी संबंध असल्याचा संशय आहे. या माहितीनंतर, गेल्या दोन दिवसांत या प्रदेशात तपासकार्य आणि शोधमोहिमेसाठी अनेक लष्करी पथके तैनात करण्यात आली. सोमवारी सकाळी ११:३० वाजता, २४ राष्ट्रीय रायफल्स आणि ४ पीएआरएच्या संयुक्त पथकाने तीन दहशतवाद्यांना कारवाईदरम्यान कंठस्नान घातले. दुपारी १२:३७ वाजता, चिनार कॉर्प्सने सांगितले की जनरल एरिया लिडवासमध्ये दहशतवाद्यांशी चकमक झाली आणि एका तासापेक्षा कमी कालावधीत ड्रोन फुटेजमध्ये तीन मृतदेह दिसले, ज्यामुळे तीन दहशतवाद्यांचा खात्मा झाल्याची पुष्टी झाली.

हे दहशतवादी लष्कर-ए-तैयबा आणि जैश-ए-मोहम्मदच्या या दोन दहशतवादी संघटनांच्या संयुक्त मॉड्यूलमधील होते, जे गेल्या १४ दिवसांपासून सुरक्षा दलांच्या रडारवर होते. या गटात ५ ते ७ सदस्य असल्याचा अंदाज आहे. सोमवारी सकाळी या तिन्ही दहशतवाद्यांना लष्कराने शोधून काढले आणि त्यांना ठार केले. हे तिघेही जंगलात दाट झाडांनी वेढलेल्या एका झाडाखाली एका तात्पुरत्या खंदकात तळ ठोकून होते.



अनिशा डुंबरे

मुंबईतील पाटकर-वर्दे महाविद्यालयातून अर्थशास्त्र विषयातत पदवी. सध्या दै. मुंबई तरुण भारत मध्ये वेब उपसंपादक पदावर कार्यरत. लिखाण, वाचन आणि निवेदनाची विशेष आवड. मराठी साहित्य, इतिहास, राजकारण, आणि मनोरंजन विषयांत रस. महाविद्यालयीन काळात वक्तृत्व, कथाकथन, काव्यवाचन स्पर्धांमध्ये सहभाग आणि पारितोषिके.\
'मुंबई तरुण भारत'चं व्हॉट्सअप चॅनल फॉलो करा!
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121