उपचाराला विशेषण लावले की त्याचे अनेक प्रकार निर्माण होतात. जसे की औषधोपचार, निसर्गोपचार, मंत्रोपचार, अध्यात्मोपचार इत्यादी त्याचप्रमाणे योगोपचार. दि. २१ जून रोजी आपण जागतिक योग दिन साजरा करणार आहोत. त्यानिमित्ताने योगोपचारांविषयी...
१९९०च्या दशकात केंद्र सरकारने काही नियमांनुसार इतर पॅथींना मान्यता दिली आणि त्यांना ’Alternative system of medicine (ASM)’ असे संबोधले. त्यामुळे आज आपण आयुर्वेद, युनानी चिकित्सा, निसर्गोपचार, चुंबकीय चिकित्सा इत्यादींची रुग्णालये पाहतो, तसेच योगोपचार देणारी केंद्रेही पाहायला मिळतात.
या सर्व उपचारपद्धतीचे वैशिष्ट्य म्हणजे, त्यांचा दुष्परिणाम होत नाही. जो होतो तो फायदाच. मात्र, यासाठी अनुभवसंपन्न आणि तज्ज्ञ व्यक्ती असणे अत्यावश्यक आहे. आजकाल थोडासा अभ्यास करून केवळ सर्टिफिकेट मिळवून काम सुरू करणार्यांची संख्या वाढत चालली आहे. त्यामुळे अपेक्षित परिणाम न मिळण्याचे प्रमाणही वाढले आहे.
उदाहरणार्थ, प्राणायामाचे अनेक प्रकार आहेत. विशिष्ट प्राणायाम करून विशिष्ट आजार बरे होतात, असे अनुभवसिद्ध तज्ज्ञांनी आपल्या ग्रंथांमध्ये लिहून ठेवले आहे. मात्र, कोणत्या प्राणायामाचे परिणाम शरीरात कुठे होतात, हे अनुभवातूनच समजते. त्या अनुभवाच्या आधारेच आजारानुसार योग्य प्राणायाम निवडून रुग्णाला तो शिकवणे, हे केवळ तज्ज्ञ व्यक्तीच करू शकते. म्हणूनच योगातील कोणतीही क्रिया पुस्तकात वाचून किंवा टीव्हीवर पाहून करू नये, असे वारंवार सांगितले जाते.
शरीराची रचना, पेशींची दिशा, नाड्यांचे वहन इत्यादी तपासून आजार नेमका कुठे आहे, त्यामुळे नाडीमध्ये कोणता बदल झाला आहे, हे लक्षात घेऊन त्यावर योग्य असा आसन आणि प्राणायामाचा अभ्यास आरंभ करावा लागतो. नंतर त्यात आवश्यक ते बदल करून शास्त्रोक्त पद्धतीने-स्थिती, गती, मती व क्रम सांभाळून-दिला गेलेला अभ्यास योगोपचार ठरतो. अशा अभ्यासाने अपेक्षित परिणाम साधता येतात.
प्रत्येक आजारात आहार, विहार आणि व्यायाम (शारीरिक हालचाल) यांचे महत्त्व असते. त्यामुळे योग्य आहाराचे पथ्य व विहाराच्या सवयी निश्चित करून त्यासाठी समुपदेशनाची जोड दिल्यास अधिक चांगले परिणाम मिळतात, असा अनुभव आहे.
‘सबके लिए एक दवा’ हे सूत्र योगोपचारात लागू पडत नाही.
प्रत्येक व्यक्तीची प्रकृती, मनःस्थिती, नाडीचे प्रकार, सवयी, व्यसने, जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन, कुटुंबातील वातावरण, इतर सदस्यांसोबतचे संबंध आणि सकारात्मकतेचा अभाव अशा सर्व बाबींचा विचार करून योगोपचार निश्चित केला जातो. यामध्ये ध्यानाचा प्रकार फार महत्त्वाचा ठरतो. अशा प्रकारचा योगोपचार गर्भधारणेपूर्वी व गर्भधारणेनंतरही अतिशय प्रभावी ठरतो, हेही सिद्ध झाले आहे.
यापुढील लेखांत रोग-व्याधींनुसार साधारणपणे योगोपचार चर्चिला जाईल. वाचकांनी विशिष्ट रोग-व्याधी लेखकाचे व्हॉट्सअॅपवर कळविल्यास, त्यांच्या नावाची गुप्तता बाळगून संबंधित व्याधीनुसार पुढील लेखात साधारणपणे तत्संबधी योगोपचाराचे वर्णन केले जाईल.
डॉ. गजानन जोग
(लेखक योगोपचारतज्ज्ञ, समुपदेशक आहेत.)
९७३००१४६६५