आरोग्यरक्षक व त्यांचे प्रकार

    02-Jun-2025
Total Views |
आरोग्यरक्षक व त्यांचे प्रकार

हल्लीच्या ऑनलाईन जमान्यात इंटरनेटवरुन एखाद्या आजाराची लक्षणे तपासण्यापासून ते औषधे शोधणे, ती ऑनलाईनच मागवणे यांसारखे प्रकार वाढलेले दिसतात. विशेषकरुन आजच्या तरुणपिढीचा कल हा असा ‘ऑनलाईन मेडिकेशन’कडे दिसून येतो. वैयक्तिक आणि एकूणच कौटुंबिक आरोग्यासाठी ही बाब निश्चितच चिंताजनक असून, त्याचे प्रसंगी दुष्परिणामही उद्भवू शकतात. ही बाब लक्षात घेता, प्रत्येकालाच आरोग्यरक्षक आणि त्यांच्या प्रकारांविषयी किमान प्राथमिक माहिती असणे ही काळाची गरज म्हणावी लागेल.


आपण पण देवाकडे नेहमी निरोगी काया, मन व बुद्धी मागतो. त्यासाठी आपल्यात उपजत माहिती असते. आईवडिलांकडून आणि समाजाकडून नैसर्गिकरित्या आपण स्वस्थ राहणे शिकत असतो. शाळेत गेल्यावर स्वास्थ्य जपण्यास आपले शिक्षक उचित माहिती पुरवतात.


आपण जसजसे मोठे होत जातो, कृत्रिमता व मार्केटिंगमुळे आपले हे उपजत गुण नष्ट होत जातात. किशोरावस्थेमध्ये आपल्या समवयस्क मित्रांकडून व आता इंटरनेटचे मायाजाल हे या दुःखद स्थितीचे कारण आहे. त्यामुळे आपण हे ओळखणे महत्त्वाचे आहे की, कोणत्या व्यक्तीकडून कसली माहिती घ्यावी. उदाहरणार्थ, भारतात क्रिकेट आणि आयपीएलचे वर्चस्व आहे, म्हणून क्रिकेट प्रशिक्षकाकडे पोहायला शिकले, तर बुडण्याची शयता नक्कीच वाढेल. त्यामुळे शास्त्रशुद्ध ज्ञान असलेल्या लोकांकडून माहिती घेणे आवश्यक आहे.


प्राथमिक शिक्षणापेक्षा प्राथमिक स्वास्थ्य अधिक महत्त्वाचे. त्यामुळे जसे बोर्डाची मान्यताप्राप्त शाळा आपण शोधतो, तसे परिषदेचे मान्यताप्राप्त चिकित्सकही आपल्याला ओळखता आले पाहिजे. चला तर मग आज आरोग्यरक्षणात कार्यरत लोकांबद्दल माहिती घेऊ. आरोग्यसेवेत दोन मुख्य शाखा आहेत. चिकित्सक व उपचारक.


चिकित्सक


चिकित्सकाला सामान्य जनता ‘मेडिकल डॉटर’ म्हणून ओळखते व ते ‘डॉ.’ उपसर्ग लावतात. त्यांचे कार्य रोग निदान करून उपचारासाठी योजना करणे असते. याला इंग्रजीत क्रमशः ‘डायग्नोसिस’ व ‘प्रिस्क्रिप्शन’ असे म्हणतात. हे कार्य करण्यास खूप पूर्वीपासून राष्ट्रीय पातळीवर वैधानिक नियंत्रक नियुक्त केले आहेत. ‘राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोग’ (एनएमसी) हे पूर्वी असलेल्या ‘भारतीय चिकित्सा परिषदे’ (एमसीआय)चे नवीन रूप आहे. ‘एमसीआय’ची राज्य पातळीवर कार्यालये असतात. उदा. ‘महाराष्ट्र आयुर्विज्ञान परिषद’ (एमएमसी). तिथे ‘एमबीबीएस’चे शिक्षण पूर्ण झाल्यावर चिकित्सकाची नोंदणी करण्यात येते. नोंदणीनंतर त्याला चिकित्सकाचे कार्य करण्यास अनुमती असते व पुढे दरवर्षी नवीन शैक्षणिक माहिती घेत अद्यतन राहावे लागते. दातांचे रोग निदान करणारे दंतचिकित्सक (बीडीएस) यांची नोंद ‘डीसीआय’मध्ये केली जाते. आयुर्वेद, यूनानी, सिद्ध, होमिओपॅथी व नैसर्गिक चिकित्सा पद्धतीतील चिकित्सकांची नोंद ‘आयुष’मध्ये केली जाते. त्यात नोंदणी केलेले वैद्य, हकीम, होमिओपॅथ, नॅचरोपॅथ व सोवा-ऋग्पा सिद्धा चिकित्सक स्वतःच्या प्रशिक्षणाप्रमाणे आरोग्यरक्षण करतात.


उपचारक


आता उपचारकाबाबत माहिती घेऊ. चिकित्सकाने निदान करून योजना बनविल्यावर लिहून दिलेले ‘प्रिस्क्रिप्शन’ ज्याच्याकडे देऊन आपण उपचार घेतो, त्याला ‘उपचारक’ म्हणतात. त्यात सर्वांत महत्त्वाचे आहेत, ‘स्वास्थ्य परिचर’ (नर्स) व ‘औषधनिर्माता’ (फार्मासिस्ट). त्यांच्या प्रशिक्षण व नोंदणीची जबाबदारी राष्ट्रीय पातळीवर ‘नर्सिंग व फार्मसी काऊन्सिल’कडे असते. त्याशिवाय, राष्ट्रीय पातळीवर पुनर्वसन उपचार देण्यास ‘भारतीय पुनर्वास परिषद’ (आरसीआय)सुद्धा कार्यरत आहे. मनोवैज्ञानिक, कृत्रिम अंग निर्माता, श्रवण वाणी उपचारक इत्यादि त्यातीलच नोंदणीकृत उपचारक असतात. काही राज्यांमध्ये पराचिकित्सा परिषद आहेत, ज्यांच्यामध्ये ऑप्टोमेट्रिस्ट, रेडिओग्राफर, लॅब टेनिशियन व अन्य उपचारकांची नोंदणी करण्यात येते. त्याशिवाय, आहारतज्ज्ञ, योगशिक्षक, सामाजिक कार्यकर्ता इत्यादि अनेक उपचारक आहेतच.


‘आरोग्यसेवा-राष्ट्रीय स्वास्थ्य नीति २०१७’प्रमाणे भारतीय स्वास्थ्य संकल्पनेत प्राथमिक स्वास्थ्यसेवा प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचली पाहिजे. त्याचे पाच प्रमुख घटक आहेत. स्वास्थ्यरक्षण, रोगप्रतिरोध, रोगउच्चाटन, रोग्याचे पुनर्वसन, उपशमन. स्वास्थ्यरक्षणासाठी आयुर्वेदात ‘स्वस्थ वृत्त’ विषय शिकविण्यात येतो, तर रोगप्रतिरोध करण्यास आधुनिक चिकित्सा शास्त्रात ‘सामुदायिक चिकित्सा’ विषय शिकवतात. रोगउच्चाटनास आयुर्विज्ञान व शल्यक्रिया या दोन विषयांशी निगडित विविध विषय शिकविण्यात येतात. सामान्य लोकांचा समज करून देण्यात आला आहे की, चिकित्सकाकडे गेल्यास सर्व रोगमुक्त होऊ शकतात. हा एक गोड गैरसमज आहे, ज्याचे उदाहरण आपणास स्वतःच्या किंवा शेजारच्या घरी येऊ शकते. काही रोग दीर्घकाळ किंवा आजीवन क्षति करून जातात. त्यांचे पुनर्वसन आवश्यक असते. त्यासाठी ‘पुनर्वसन चिकित्सा’ हा एक विषय आहे. याला ‘फिजिकल मेडिसिन अॅण्ड रिहॅबिलिटेशन’ (पीएमआर) असे म्हणतात. स्थायी किंवा अस्थायी क्षति झाल्यावर रुग्णाचा तपास करून त्याला पुन्हा जीवन जगणे शय तितके सोपे करून देण्यास या विषयात ‘प्रिस्क्रिप्शन’ दिले जाते. त्यामुळे ‘पीएमआर’चे ‘प्रिस्क्रिप्शन’ जरा अधिकच लांबलचक असते. त्यात औषधी व शल्यक्रिया, शिवाय पोषण, व्यायाम, दैनंदिन क्रिया, कृत्रिम अंग उपकरण, वातावरण, समाजनिर्मिती इत्यादींमध्ये बदल सांगितले जातात. ते कार्य करण्यास विविध उपचारकांसाठी त्यात माहिती दिलेली असते. त्याशिवाय, क्षति प्रमाणीकरण (यूडीआयडी किंवा दिव्यांगता प्रमाणपत्र) बनवणेसुद्धा या विषयात निहित असते. ‘एनएमसी’ विनियम दि. २९ ऑक्टोबर २०२० प्रमाणे हा विषय २०२१ पासून प्रवेश घेतलेल्या ‘एमबीबीएस’ छात्रांना शिकविणे अनिवार्य केले गेले आहे. हे छात्र या वर्षाअखेरीस शेवटची परीक्षा देऊन उत्तीर्ण होतील. तेव्हा आपण अपेक्षा करू शकू की, भविष्यात दिव्यांगता प्रमाणपत्र व पुनर्वसन चिकित्सेमधील माहिती घेतल्यामुळे प्राथमिक आरोग्यसेवा अधिक परिपूर्ण होऊ शकेल. ‘उपशमन’ या विषयास हात लावायला मात्र गीतेचा अभ्यास आवश्यक असल्याचे भासते. या विषयात ‘एमबीबीएस’नंतर तज्ज्ञ चिकित्साज्ञान घेता येते. पण, शाळेपासूनच गीतेचे धडे घेतल्यामुळे भारतीय छात्रांना हा विषय समजायलाही जड जाणार नाही, अशी आशा आहे.


चुकतंय कुठे?

आजकाल वाढत्या मार्केटिंगमुळे लोकांना चिकित्सकाचा सल्ला न घेता, उपचारकाकडे धाव घ्यायची सवय झाली आहे. डोकेदुखी, पोटदुखी, वजन वाढणे इत्यादींवर ते स्वतः फार्मासिस्टकडून औषधे घेऊन खातात. काही लोक विचित्र आहार, विहार, विचार यांना बळी पडतात. त्यात ब्यूटी प्रॉडट्स, प्रोटीन पावडर व जिमनॅशियम नावाचे नवीन खूळ आहेच, पण कंबरदुखी, सांधेदुखी इत्यादि असताना चिकित्सकाला न विचारता, शेकून घेणे, विचित्र व्यायाम व क्रिया करणे आरोग्यास अपायकारक ठरू शकते. थोडी इजा झाल्यावर रेडिओ ग्राफरकडून एस-रे, सीटी स्कॅनची मागणी करण्याच्या घाईगडबडीत ते माध्यमिक शाळेतील मारी युरी व विकिरणाचे घातक प्रभाव विसरून जातात. गर्भवतीने तर एस-रेच्या खोलीजवळ फिरकूही नये. निरर्थक रक्तचाचणी करून त्याचे रिपोर्ट जरी चिकित्सकाच्या लेखी महत्त्वपूर्ण नसले, तरी त्यातील काही विचित्र आकडे अशा लोकांना नेहमी त्रास देत राहतात.


‘डॉ.’ उपसर्ग असलेले सर्व लोक चिकित्सक नसतात. अर्थशास्त्रज्ञ, संगीतज्ज्ञ, कायदेतज्ज्ञ व उपचारकसुद्धा विविध विषयांत ‘डॉटरेट’ करून ‘डॉ.’ उपसर्गासोबत ‘पीएच.डी.’ हे प्रत्यय लावू शकतात. मात्र, त्यांची मेडिकल काऊन्सिल, ‘आयुष’, ‘डीसीआय’मधील नोंदणी नसते. ‘लाइब्रेट’, ‘यूरोफाय’सारखे ऑनलाईन मंच उपचारकांना ‘चिकित्सक’ या रूपात दाखवू शकतात. काही शासकीय व अशासकीय वेबसाईटसुद्धा उपचारकांना ‘चिकित्सक’ या रूपात प्रस्तुत करतात. ‘ब्लिंकिट’सारखे ऑनलाईन अॅप आता दहा मिनिटांत रुग्णवाहिका उपलब्ध करून देत आहे. तेव्हा आपल्याला हे नक्कीच माहिती असले पाहिजे की, आपत्कालीन स्थितीत नोंदणीकृत चिकित्सकाकडे गेल्यासच जीविताची हानी टळण्याची शयता वाढेल.


सुधारणा कशी करावी?


पहिले ‘चिकित्सक’ व नंतर ‘उपचारक’ हा क्रम लक्षात ठेवल्यास रोगनिवारण व आरोग्य जपणे शय होऊ शकेल. रोग्याने चिकित्सकाकडून निदान करून घेऊन विस्तृत ‘प्रिस्क्रिप्शन’ लिहून घ्यावे. त्यांच्या सल्ल्याप्रमाणेच उपचारकाकडे जावे. स्वस्थ व्यक्तीने आयुर्वेदिक चिकित्सकाकडून प्रकृतिपरीक्षण करून घ्यावे. त्यांच्या सल्ल्याप्रमाणेच आहारतज्ज्ञ व योगशिक्षकाकडून विशिष्ट प्रकार शिकून घ्यावे. चिकित्सकाची खात्री पटवून घेण्यासाठी क्लिनिकमध्ये प्रदर्शित मेडिकल काऊंसिल, ‘आयुष’, ‘डीसीआय’ नोंदणी क्रमांक नक्की तपासावा.


डॉ. गणेश जोशी
(लेखक एमबीबीएस, एमडी (पीएमआर), डीएनबी (पीएमआर), आरोग्य भारती, कोकण प्रांत आहेत.)