आंबोलीतून कोळ्याच्या नव्या प्रजातीचा शोध; अभ्यासक हेमंत ओगलेंच्या नावे नामकरण

    01-Apr-2022
Total Views | 195

spider


 

मुंबई (प्रतिनिधी) - सह्याद्रीमधील जैवविविधतेचा हाॅटस्पाॅट मानल्या जाणाऱ्या आंबोलीमधून कोळ्याच्या नव्या प्रजातीचा शोध लावण्यात आला आहे. 'ट्रॅपडोर' कोळ्याची ही नवी प्रजात 'कॉनोथीले' या कुळातील आहे. या कोळ्याचे नामकरण 'कॉनोथीले ओगलेई' असे करण्यात आले असून 'काॅनोथीले' कुळातील ही सहावी प्रजात आहे.


 
'ट्रॅपडोर' कोळी हे त्यांच्या एका विशिष्ट प्रकारच्या घर बनवण्याच्या गुणधर्मामुळे ओळखले जातात. हे कोळी जमिनीमध्ये बीळ बनवतात. हे बीळ एका दाराच्या सहाय्याने बंद केलेले असते. दारावर दगड, माती, पालापाचोळा इत्यादी पसरून ते लपवले जाते, जेणेकरून हा सापळा सहजासहजी नजरेत पडत नाही. दाराबाहेर हा कोळी आपले चिकट जाळे पसरून ठेवतो. जेव्हा एखादे भक्ष्य जाळ्यावर जाते. तेव्हा बीळाच्या आत दबा धरून बसलेल्या कोळ्याला जाळ्याचे कंपने जाणवतात आणि तो दरवाज्यातून बाहेर येऊन भक्ष्यावर झड़प घालतात. या अनपेक्षित हल्ल्यातून सुटणे भक्ष्याला सहज शक्य नसते. अशी स्वभाववैशिष्ट असणाऱ्या ट्रॅपडोर कोळ्याची नवी प्रजात राज्यातील तरुण संशोधकांनी उलगडली आहे.

 

 

जीवशात्रज्ञ राजेश सानप, स्वप्नील पवार, अक्षय खांडेकर आणि अनुराधा जोगळेकर यांनी ही प्रजात शोधून काढली आहे. याविषयीचे वृत्त मंगळवारी 'आर्थ्रोपोडा सिलेक्ट' या संशोधन पत्रिकेमध्ये प्रकाशित करण्यात आले. २०१६ साली आंबोलीमधील सर्वेक्षणादरम्यान आम्हाला ही प्रजाती सर्वप्रथम सापडल्याची माहिती संशोधक स्वप्निल पवार यांनी दिली. मातीत बीळ तयार करुन हा कोळी राहत असल्याने तो सहसा नजरेस पडत नसल्याचे त्यांनी सांगितले. गेल्या सहा वर्षांपासून या प्रजातीच्या नाविन्याबाबत संशोधन सुरू होते. गुणसूत्र चाचणी आणि बाह्यांगाचे परिक्षण करुन ही प्रजात विज्ञानाकरिता नवीन असल्याचे उलगडले. आंबोलीतील स्थानिक आणि वन्यजीव अभ्यासक हेमंत ओगले यांच्या नावे या प्रजातीचे नामकरण कॉनोथीले ओगलेई असे करण्यात आले आहे. आंबोलीमध्ये करत असलेल्या संवर्धन कार्याविषयीच्या योगदानाबद्दल या प्रजातीला ओगलेंचे नाव देण्यात आले आहे.


आंबोलीतील २२ वी प्रजात
सावंतवाडी तालुक्यात ५ हजार ६१९ हे. क्षेत्रावर आंबोली गाव विस्तारले आहे. या गावाचा परिसर जैवविविधतेचा हाॅटस्पाॅट आहे. कारण, उत्तर आणि मध्य पश्चिम घाटाला जोडणारा हा भाग असल्याने याठिकाणी दक्षिण भारतातील प्रजाती आढळतात. त्यामुळे इथली जैवविविधता समृद्ध आहे. एवढ्या छोट्याश्या भागातून २००५ पासून २१ प्रजातीचा शोध लागला आहे. यामध्ये साप, उभयचर, खेकडे, कोळी आणि विंचवाच्या प्रजातीबरोबरच गोड्या पाण्यातील माशाचाही समावेश आहे. आता कॉनोथीले ओगलेई ही कोळ्याची प्रजात आंबोलीमध्ये सापडलेली २२ वी जीव प्रजात आहे.


अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121