हिंदुत्व + विकास = योगी सरकार

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    11-Mar-2022   
Total Views |

Yogi
 
 
‘तरुण पिढी हिंदुत्वाचे राजकारण कधीही मान्य करणार नाही,’ हा आणि अशा प्रकारचा समजही आता खोटा ठरला आहे. कारण, योगी आदित्यनाथ यांनी हिंदुत्वास दिलेली विकासाची जोड. योगींचा विजय हा भावनिक मुद्द्यांवर मिळविलेला विजय नाही. त्यामागे राज्याच्या चौफेर विकासाचा मजबूत पाया आहे. त्यामुळेच देशात आता ‘हिंदुत्वासह विकास’ हा फॉर्म्युला प्रस्थापित झाला आहे.
“पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सुशासन आणि विकासाच्या राजकारणास उत्तर प्रदेशासह उत्तराखंड, मणिपूर आणि गोव्याच्या जनतेने स्वीकारले आहे. उत्तर प्रदेशात आता विकासाच्या राजकारणाचे नवे पर्व सुरू होत आहे. महत्त्वाचे म्हणजे उत्तर प्रदेशातील जनतेने अफवांचे राजकारण करणार्‍या पक्षांना पूर्णपणे नाकारले आहे.” उत्तर प्रदेशात दणदणीत विजय मिळविल्यानंतर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ बोलत होते. त्यांच्या बोलण्यातून भाजपचे यापुढील राजकारण कसे असेल, हे स्पष्ट झाले आहे. यापुढील काळात देशातल्या प्रत्येक राज्यामधील राजकीय संस्कृतीमध्ये आमूलाग्र बदल होणार आहेत. ‘विकासकेंद्री राजकारण आणि त्याला हिंदुत्वाची जोड’ हा फॉर्म्युला यशस्वी होऊ शकतो, हे प्रथम गुजरातमध्ये आणि आता उत्तर प्रदेशात सिद्ध झाले आहे. त्यामुळे आता देशाच्या राजकारणामध्ये हिंदुत्व हे निर्विवादपणे केंद्रस्थानी आले आहे.
 
 
उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक ही भाजपसाठी महत्त्वाची होतीच. मात्र, त्याहीपेक्षा जास्त देशातील विरोधी पक्षांसाठी ही निवडणूक महत्त्वाची होती. कारण, यापूर्वी २०१७ साली भाजपने ३१२ जागांसह बहुमताने सत्ता प्राप्त केली होती. त्यानंतर उत्तर प्रदेशात योगी आदित्यनाथ यांच्या हाती राज्याची सूत्रे आल्यानंतर भाजपवर टीकेची झोड उठविण्यात आली होती. योगी आदित्यनाथ यांचे मठाधिश असणे या मुद्द्यावरून भाजपची यथेच्छ खिल्ली उडविण्यात आली होती. त्याचप्रमाणे आता उत्तर प्रदेशात हिंसेचे थैमान सुरू होईल, राज्यात जातीय दंगली सुरू होतील,अशी भीती जनतेच्या मनात निर्माण करण्यासाठी काँग्रेसप्रणित ‘इकोसिस्टीम’ पूर्ण क्षमतेने काम करीत होती. कृषी सुधारणा कायद्यांवरून दिल्लीच्या सीमांवर बसविण्यात आलेले आंदोलनही अलगदपणे उत्तर प्रदेशच्या अंगणात सरकविण्यात आले होते. त्यानंतर कोरोना संसर्गामध्ये तर उत्तर प्रदेशला बदनाम करण्याची सुनियोजित मोहीमच राबविण्यात आली. त्यामुळे आता उत्तर प्रदेशात भाजपचा पराभव आणि पर्यायाने हिंदुत्वास बदनाम करणे सोपे होईल, असा विचार होता. कारण, योगी आदित्यनाथ यांची कार्यशैली पाहाता ते आता दीर्घकाळ भारतीय राजकारणामध्ये महत्त्वाची भूमिका बजावतील, असे सिद्ध झाले होते. त्यामुळे योगी सरकारला पराभूत करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात आले. दिल्लीच्या सीमांवरचे शेतकरी आंदोलन, तर जणू भाजपचा पराभव करण्याचा पासवर्डच आहे, असा समज निर्माण करण्यात आला होता.
 
 
प्रामुख्याने पश्चिम उत्तर प्रदेशात भाजपला मोठा फटका बसावा, अशा प्रकारचा प्रचार करण्यात आला. त्यासाठी राकेश टिकैतसारख्या कथित जनाधार असलेल्या व्यक्तीस सक्रिय करण्यात आले. त्यानंतर काँग्रेसने राष्ट्रीय महासचिव प्रियांका गांधी-वाड्रा यांना जवळपास दोन वर्षांपासून तेथे सक्रिय केले. दुसरीकडे अखिलेश यादव यांनीही मोठ्या प्रमाणात वातावरण निर्मिती केली होती. मात्र, हे सर्व होत असताना योगी आदित्यनाथ आपल्या पद्धतीने राज्यात काम करीत होते. निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होण्यापूर्वीच त्यांचे प्रत्येक मतदारसंघाचे दौरे पूर्ण झाले होते. त्यामुळे राज्यातील जनतेचा नेमका मूड काय, याची त्यांना व्यवस्थित जाणीव झाली होती. त्यानुसार भाजपने मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना केंद्रस्थानी ठेवूनच रणनीती आखली. त्यामुळे अखिलेश यादव यांचे आवडते मुस्लीम-यादव समीकरण असो की, ‘ब्राह्मण विरूद्ध ठाकूर’ असा जातीय संघर्ष उभा करण्याचा काँग्रेसचा प्रयत्न असो; ते पूर्णपणे उद्ध्वस्त करण्यात भाजपला यश आले. त्यात भाजपने पूर्णपणे विकासकेंद्री मुद्द्यांवर प्रचार केला, त्यामुळे कायदा व सुव्यवस्था, आर्थिक विकास, रोजगार या मुद्द्यांवर जनतेने आपले मत दिल्याचे स्पष्ट झाले आहे.
 
 
हिंदुत्वाविषयी न्यूनगंड नसणारे योगी...
 
 
योगी आदित्यनाथ यांचे स्थान आता राष्ट्रीय राजकारणामध्ये आता मजबूत झाले आहे. त्याच्या व्यक्तिमत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे ते मनात कोणताही किंतु न ठेवता बिनधास्तपणे हिंदुत्वाचे राजकारण करतात. त्यांना भगवी वस्त्रे परिधान करण्याची लाज वाटत नाही, ते अगदी सहजपणे मंदिरात जाऊन पूजाअर्चा करतात आणि मथुरेमध्येही अयोध्येप्रमाणेच भव्य श्रीकृष्ण मंदिराची उभारणी करायची असल्याचे सहजपणे सांगतात. हिंदुत्व हा मुद्दा लाज वाटण्याचा नसून तो अभिमानाचा आहे, हा विश्वास योगी आदित्यनाथ यांनी सिद्ध केले आहे. त्यामुळे हिंदुत्व म्हणजे काहीतरी पुराणमतवादी संकल्पना आहे, तरुण पिढी हिंदुत्वाचे राजकारण कधीही मान्य करणार नाही हा आणि अशा प्रकारचा समजही आता खोटा ठरला आहे. कारण, योगी आदित्यनाथ यांनी हिंदुत्वास दिलेली विकासाची जोड! योगींचा विजय हा भावनिक मुद्द्यांवर मिळविलेला विजय नाही. त्यामागे राज्याच्या चौफेर विकासाचा मजबूत पाया त्यामागे आहे. त्यामुळेच देशात आता हिंदुत्वासह विकास हा फॉर्म्युला प्रस्थापित झाला आहे.
 
 
भारताच्या विकासाचे नवे इंजिन - उत्तर प्रदेश
 
 
उत्तर प्रदेशला ‘बिमारू’ राज्यांच्या यादीतून बाहेर काढून गुंतवणूकस्नेही राज्य बनविण्यामध्ये योगी आदित्यनाथ यांनी विशेष रस घेतला आहे. त्याविषयी विवेक व्यासपीठ संचलित ‘पॉलिसी अ‍ॅडव्होकसी रिसर्च सेंटर’ने सविस्तर अभ्यास केला आहे. त्यामध्ये योगी आदित्यनाथ यांनी केलेले प्रयत्न अधोरेखित झाले आहेत.
 
 
योगी आदित्यनाथ यांनी कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती सुधारली. त्यासोबतच राज्यात गुंतवणूकस्नेही वातावरण निर्माण करण्यासाठी ‘सिंगल विंडो क्लियरन्स’ व्यवस्था लागू केली. त्यामुळे उत्तर प्रदेशात आज लालफितशाहीचा अडथळा राहिलेला नाही. कायदा व सुव्यवस्था सुधारल्यामुळे गुंतवणूकदारांना राज्याविषयी विश्वास निर्माण झाला आहे.
 
 
प्रशासकीय प्रमुख सुधारणांमुळे राज्याच्या सकल राज्य देशांतर्गत उत्पादन (जीएसडीपी) आणि इतर प्रमुख निर्देशकांमध्ये सुधारणा झाली. राज्याचा ‘जीएसडीपी’ २०११-१२ मध्ये ६,३७,७८९ कोटी रुपयांवरून (२०२०-२१ मध्ये १९,४०,५२७ कोटी रुपयांपर्यंत वाढला आहे. त्यामुळे आज उत्तर प्रदेशची अर्थव्यवस्था ही देशातील दुसरी सर्वांत मोठी अर्थव्यवस्था झाली आहे. राज्यात दळणवळणाच्या सुविधांमध्येही वेगवान प्रगती होत आहे. द्रुतगती मार्गाच्या बांधकामाच्या बाबतीत, उत्तर प्रदेशात भारतात प्रथम क्रमांकावर आहे आणि ’एक्स्प्रेस-वे प्रदेश’ ची सोब्रीकेट मिळवली आहे. २०१७ पर्यंत दोन एक्सप्रेस-वे होते. राज्य सरकारने सध्या, संपूर्ण उत्तर प्रदेशला जोडण्यासाठी पूर्वांचल एक्सप्रेस-वे (दि. १६ नोव्हेंबर, २०२१ रोजी उद्घाटन झालेला), गोरखपूर लिंक एक्सप्रेस-वे, बुंदेलखंड एक्सप्रेस-वे आणि गंगा एक्सप्रेस-वे असे चार नवीन प्रकल्प प्रस्तावित केले आहेत. हे एक्सप्रेस-वे राज्याच्या व्यापार अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी जवळजवळ सर्व प्रमुख आंतरराज्यीय आणि आंतरराज्य नोड्सना जोडणारे मजबूत कनेक्टिव्हिटी नेटवर्क तयार करून महत्त्वपूर्ण आणि धोरणात्मक भूमिका बजावणार आहेत. शिवाय, हे एक्स्प्रेस-वे राज्याच्या स्वदेशी वस्तूंच्या विक्रीमध्ये वाढीव उत्पादकता आणि नवीन बाजारपेठेच्या संधींद्वारे मोठे परिवर्तन घडवून आणतील.
 
 
सध्या उत्तर प्रदेशात नऊ विमानतळ कार्यरत आहेत. यापैकी, सहा देशांतर्गत विमानतळ आणि तीन आंतरराष्ट्रीय विमानतळे आहेत, म्हणजे लखनौ येथील चौधरी चरणसिंग आंतरराष्ट्रीय विमानतळ, वाराणसी येथील लाल बहादूर शास्त्री विमानतळ आणि कुशीनगर आंतरराष्ट्रीय विमानतळ. अयोध्या येथील आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि जेवर येथील नोएडा आंतरराष्ट्रीय विमानतळाचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर पाच आंतरराष्ट्रीय विमानतळ असलेले भारतातील एकमेव राज्य ठरणार आहे. विमानतळांसोबतच, प्रयागराज, वाराणसी आणि हल्दिया बंदरांना जोडणारे चार-लेन आणि सहा पदरी राष्ट्रीय महामार्ग आणि राष्ट्रीय जलमार्ग-१ देखील राज्याच्या विकासाला हातभार लावत आहेत. शिवाय, राज्यभरातील प्रमुख शहरांमधील बहु-शहर मेट्रो रेल्वे प्रकल्पांचा विकास राज्यातील पायाभूत सुविधांना बळकटी देत आहे आणि सर्वसमावेशक सामाजिक-आर्थिक विकासाला गती मिळत आहे.
 
 
साधारणपणे दक्षिण भारतीय राज्यांच्या तुलनेत उत्तर भारतातील बहुतांश राज्ये सामाजिक-आर्थिक वाढ आणि विकासाच्या बाबतीत मागे आहेत, असे मानले जात होते. मात्र, उत्तर प्रदेशने हा समज खोटा ठरविला आहे. कृती-केंद्रित धोरणात्मक सुधारणांचा मार्ग चोखाळत राज्याच्या आर्थिक विकासात क्रांतिकारक आणि प्रगतीशील बदल घडवून आणण्यासाठी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी प्रामाणिक प्रयत्न केले आहेत. त्यामुळेच आज देशातील एक गुंतवणूकस्नेही आणि वेगवान विकास करणारे राज्य म्हणून उत्तर प्रदेश उदायास आले आहे.
 
 
@@AUTHORINFO_V1@@