आधुनिक युद्धगाथेतील ‘ड्रोन’पर्व

    02-Jun-2025   
Total Views |
आधुनिक युद्धगाथेतील ‘ड्रोन’पर्व

युक्रेनने रशियाच्या बॉम्बर्सवर ड्रोनचा हल्ला केला. यात रशियाचे मोठेच नुकसान झाले. ड्रोनचा वापर युद्धात किती घातक ठरू शकतो, याचे दर्शन याआधीही अनेकदा झाले होते. युक्रेनच्या हल्ल्यानंतर त्याचा प्रभाव अधिक अधोरेखित झाला. युक्रेनने केलेल्या हल्ल्याने सारेच जग आज स्तब्ध आहे. आधुनिक युद्धातील ‘ड्रोन’पर्वाची ही खरी सुरुवात आहे...


युक्रेनने ट्रक आणि ड्रोनच्या सहाय्याने ‘ट्रोजन-हॉर्स रणनीती’चा वापर करून रशियावर मोठा हल्ला केला. हा हल्ला संपूर्ण जगासाठीच धोयाचा इशारा आहे. रविवारी युक्रेनने रशियाच्या पाच वेगवेगळ्या भागांत अनेक ‘एफपीव्ही’ ड्रोनने हल्ला केला. ड्रोनच्या आलेल्या झुंडीने रशियाच्या चार मोठ्या आणि महत्त्वाच्या हवाईतळांचे बरेच नुकसान केले. हे ड्रोन रशियाच्या आत सहा हजार किमीपर्यंत हल्ला करू शकतात. युक्रेनची गुप्तचर संस्था ‘एसबीयू’ गेल्या दीड वर्षांपासून या हल्ल्याची तयारी करत होती.

जगप्रसिद्ध ग्रीक मिथक कथा ‘ट्रोजन हॉर्स’पासून प्रेरणा घेऊन, युक्रेनने हे ड्रोन रशियामध्ये पाठवले. रशियाचे हवाई संरक्षण अतिशय मजबूत असून ते सहजासहजी भेदणे शय नाही. परिणामी, अशा परिस्थितीत सीमावर्ती भागातून मोठ्या संख्येने ड्रोन रशियच्या एअरबेसवर पाठवणे कठीण होऊ शकते, याची युक्रेनला पूर्ण जाणीव होती. अशा परिस्थितीत युक्रेनियच्या गुप्तचर संस्थेने, रशियाच्या पाच वेगवेगळ्या प्रांतांत रस्त्याने मोठ्या संख्येने नागरी ट्रक पाठवले. या युक्रेनियच्या ट्रकमध्ये फॉल्स सीलिंग तयार करण्यात आले होते. युक्रेनने या फॉल्स सीलिंगमध्ये हे ड्रोन लपवले. हे ड्रोन बॉम्ब आणि इतर स्फोटक पदार्थांनी सुसज्ज होते. सीमा पोलिसांना फसवून युक्रेनने हे ट्रक घेतले आणि रशियाच्या चार मोयाच्या एअरबेसजवळ उभे केले. त्यानंतर, रिमोटद्वारे दूरूनच ट्रकच्या सीलिंग उघडून, झुंड ड्रोनने रशियच्या एअरबेसवर उभ्या असलेल्या स्ट्रॅटेजिक बॉम्बर्सवर हल्ला केला. या ड्रोन हल्ल्यात अण्वस्त्रे वाहून नेण्यास सक्षम असलेली रशियाची विमाने, जळून राख झाली. पाच वेगवेगळ्या रशियन एअरबेसवर समान मोडस ऑपरेंडी वापरून हल्ला करण्यात आला. युक्रेनने या ऑपरेशनला ‘स्पायडर-वेब’ असे नाव दिले आहे.

युक्रेनच्या या हल्ल्यात पाच लष्करी हवाईतळांचे नुकसान झाल्याचे रशियाने स्वतः मान्य केले. हे हवाईतळ मुर्मन्स्क, इर्कुत्स्क, इव्हानोवो, रियाझान आणि अमूर प्रदेशात आहेत. रशियाचे म्हणणे आहे की, इव्हानोवो, रियाझान आणि अमूर येथे येणारे सर्व ‘एफपीव्ही’ (फर्स्ट पर्सन व्ह्यू) ड्रोन थांबवण्यात आले होते. परंतु, मुर्मन्स्क आणि इर्कुत्स्कमध्ये अनेक विमानांचे नुकसान झाले. या हल्ल्यांमध्ये कोणताही सैनिक जखमी किंवा मृत्युमुखी पडलेला नाही, असा दावा रशियाने केला आहे. या हल्ल्यानंतर रशियाने काही लोकांना अटकही केली. या हल्ल्यादरम्यान युक्रेनने रशियाच्या अणु पाणबुडीतळाजवळही हल्ला केला. याशिवाय, युक्रेनने कुर्स्क आणि ब्रायन्स्क भागातही बॉम्ब टाकून, रशियाचा रेल्वे पूलही उद्ध्वस्त केला. यामुळे रशियात रेल्वेचे दोन मोठे अपघातही झाले.

युक्रेन रशियासोबतच्या युद्धाच्या चौथ्या वर्षांत प्रवेश करत असताना आणि दि. २ जून रोजी इस्तंबूलमध्ये रशिया आणि युक्रेन यांच्यातील शांतता चर्चेच्या दुसर्या फेरीच्या आधी हे हल्ले झाले आहेत. आकार, व्याप्ती आणि गुंतागुंतीच्या बाबतीत युक्रेनने जगातील सर्वांत मोठ्या हल्ल्यांपैकी एक हल्ला केला आहे. ज्यामध्ये ओलेन्या, मुर्मन्स्क आणि इर्कुत्स्क आणि सायबेरियातील दोन हवाईतळांना लक्ष्य केलेे, जे सहा हजार किमीपेक्षा जास्त अंतरावर आणि तीन टाईम झोनमध्ये आहेत. हे हल्ले अॅडमिरल विल्यम मॅकरेव्हनच्या विशेष ऑपरेशन्सच्या सिद्धांताशी जुळतात. तो सिद्धांत म्हणजे योग्य नियोजन, काळजीपूर्वक लपवलेली शस्त्रे, उत्तम सराव आणि वेगवान कृती.

रशिया-युक्रेन युद्ध हे प्रामुख्याने रशिया आणि ‘नाटो’मधील युद्ध असल्याचे, विविध तज्ज्ञांनी वेळोवेळी सांगितले आहे. युक्रेनचे सैनिक पाश्चात्य देशांनी पुरवलेल्या शस्त्रे आणि दळणवळण उपकरणांचा वापर करून लढत असल्याचेही स्पष्ट झाले आहे. रशियासाठी हे संवेदनशील मुद्दे आहेत, त्यामुळेच रशियाने युरोपमधील ‘नाटो’तळांवर आणि दारूगोळा डेपोवर हल्ला करण्याची धमकी दिली आहे. तथापि, ऑपरेशन ‘स्पायडर वेब’मध्ये युक्रेनने असे स्पष्ट केले आहे की, हे हल्ले ‘नाटो’/पश्चिमी समर्थनाशिवाय स्वतःहून केले गेले. अध्यक्ष व्होल्दोमीर झेलेन्स्की यांनी ‘एस’वरील एका पोस्टमध्ये म्हटले आहे की, हे ऑपरेशन युक्रेनने स्वबळावर साध्य केले आहे. त्यामुळेच हल्ल्यात युक्रेनियन ड्रोनचा वापर करण्यात आला आणि युक्रेनियन सरकारने ताबडतोब त्याची जबाबदारी घेतली. लांब पल्ल्याच्या ‘टॉरस’ क्षेपणास्त्रांसारखी कोणतीही पाश्चात्य शस्त्रे वापरली गेली नाहीत. युक्रेनने उघड्यावर असलेल्या बॉम्बर्सना लक्ष्य करण्यासाठी, व्यावसायिकरित्या उपलब्ध असलेल्या उच्च-रिझोल्यूशन उपग्रह प्रतिमा वापरल्याचे चित्रही प्रसिद्ध केले.

चार वर्षांच्या संघर्षात रशियाने किमान एकदा तरी अण्वस्त्रे वापरण्याची धमकी दिली आहे. दि. १ जून रोजी झालेला मोठा हल्ला चिंताजनक असाच. कारण, त्यात रशियाच्या धोरणात्मक बॉम्बर ताफ्याला लक्ष्य करण्यात आले. याचा अर्थ असा की, युद्ध झाल्यास अण्वस्त्रे डागण्यासाठी रशियाकडे आता पूर्वीपेक्षा कमी विमाने आहेत. दि. १ जून रोजी युक्रेनने केलेल्या हल्ल्यांचा बदला घेण्याची धमकी रशियन अधिकार्यांनी दिली आहे. हल्ल्यांनंतर लगेचच दि. १ जून रोजी रशियाने युक्रेनवर ४०० हून अधिक ड्रोन डागले, त्याचप्रमाणे रशिया आता ‘ओरियन’ आणि ‘हायपरसॉनिक’ क्षेपणास्त्रांचा मुक्तहस्ते वापर करण्याचीही शयता आहे.

आता युद्धामध्ये ड्रोनपर्व सुरू झाल्याचे युक्रेनच्या या हल्ल्याने अधिक स्पष्ट केले आहे. तसे तर २०२२ सालच्या आधीही, आर्मेनिया-अजरबैजान संघर्षात याचे संकेत मिळाले होते. त्याचप्रमाणे सौदी अरेबियाच्या तेल शुद्धीकरण कारखान्यांवर हुथींनी केलेल्या हल्ल्यामध्येही, ड्रोनची उपयुक्तता स्पष्ट झाली होती. रशिया-युक्रेन युद्धाने ड्रोन युद्धाच्या एका नवीन युगाची सुरुवात केली, जिथे ड्रोनने मानवयुक्त लढाऊ विमानांपासून ते लहान शस्त्रांपर्यंत प्रत्येक प्लॅटफॉर्मची जागा घेतली आहे. नुकत्याच भारताने यशस्वीपणे पार पाडलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’मध्येही ड्रोनचा मोठ्या प्रमाणात वापर झाला होता. त्यामुळे आता युद्धांच्या कथानकांमध्ये ड्रोन प्रमुख भूमिकेत असणार, यात कोणतीही शंका नाही.