‘चिकन्स नेक’: भारताचा एक, बांगलादेशचे दोन

    26-May-2025
Total Views |
‘चिकन्स नेक’: भारताचा एक, बांगलादेशचे दोन

बांगलादेशचे पंतप्रधान मोहम्मद युनूस यांची खुर्ची सध्या डळमळीत आहे. अशा अवस्थेतही त्यांचा भारताविषयीचा आकस कमी होत नाही. यासाठीच त्यांनी चीनचे सहकार्यही मागितले. चीनच्या दौर्‍यावर असताना त्यांनी ईशान्य भारताची कोंडी करण्याचा अप्रत्यक्ष इशाराच दिला होता. त्यानंतर आता आसामचे मुख्यमंत्री हिमंता सरमा यांनी त्याचा चांगलाच समाचार घेतला आहे.


बांगलादेशातील हंगामी सरकारचे प्रमुख मोहम्मद युनूस हे गेल्या मार्च महिन्यात चीनच्या दौर्‍यावर गेले असताना, त्यांनी ईशान्य भारत आणि उर्वरित भारत यांना जोडणार्‍या सिलिगुडी मार्गिकेचा उल्लेख केला. ईशान्य भारतास जोडणारा हा पट्टा ‘चिकन्स नेक’ म्हणून ओळखला जातो. हा भूभाग भारताच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असाच. बांगलादेशचे प्रमुख मोहम्मद युनूस यांनी आपल्या चीन भेटीत या भूभागाकडे चीनचे लक्ष वेधले. भारताचा ईशान्य भाग ‘लॅण्डलॉक्ड’ असून, आम्हीच (बांगलादेश) सागराचे रक्षणकर्ते आहोत, अशा आशयाचे वक्तव्य युनूस यांनी केले होते. बांगलादेशमध्ये सरकार बदलल्यानंतर तो देश चीनकडे अधिक झुकल्याचे दिसून येत आहे. चीनकडून विविध प्रकारची मदतही युनुस सरकारकडून घेतली जात आहे. तसेच, सिलिगुडी मार्गिकेलगत असलेले दुसर्‍या महायुद्ध काळातील एक जुने विमानतळ चीनच्या मदतीने पुन्हा सुरू करण्याचा बांगलादेशचा प्रयत्न आहे. ‘चिकन्स नेक’वर लक्ष ठेवण्याच्या दृष्टीने हे संभाव्य विमानतळ महत्त्वाचे मानला जाते. पण, बांगलादेशच्या या आगाऊपणाला आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्व सरमा यांनी जोरदार उत्तर दिले. बांगलादेशने आपल्या देशातील भूभागाची काळजी घ्यावी. बांगलादेशमध्ये एक सोडून दोन ‘चिकन्स नेक’ असल्याचे आसामच्या मुख्यमंत्र्यांनी लक्षात आणून दिले. या दोन्ही मार्गिका या सहजपणे भेद करण्यासारख्या आहेत, हेही आसामच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितले. ”जे भारतातील ‘चिकन्स नेक’वरून धमकावत असतात, त्यांनी आपल्या देशातील दोन ‘चिकन्स नेक’ लक्षात घ्याव्यात” असे हिमंत सरमा यांनी म्हटले. यापैकी एक उत्तर बांगलादेशमधील 80 किमी लांबीची मार्गिका आहे. दिनाजपूर ते दक्षिण गारो टेकड्यांपर्यंतचा हा महत्त्वाचा भूभाग आहे. या भागात काही घडल्यास संपूर्ण रंगपूर विभागाचा, उर्वरित बांगलादेशाशी संपर्क तुटू शकतो. तर दुसरा भूभाग म्हणजे चित्तगाँग मार्गिका. हा 28 किमीचा भूप्रदेश आहे. हा निमुळता पट्टा दक्षिण त्रिपुरापासून पुढे चित्तगाँग आणि ढाक्याला जोडणारा आहे. सिलिगुडी मार्गिकेपेक्षा हा पट्टा लहान आहे. केवळ बांगलादेशच्या लक्षात यावे म्हणून त्या देशात असलेल्या दोन ‘चिकन्स नेक’कडे आपण लक्ष वेधले आहे, असे आसामच्या मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे. बांगलादेशमधील युनूस सरकार भारताच्या विरोधात कारवाया करत आहे. ज्या बांगलादेशला स्वातंत्र्य मिळवून देण्यामध्ये भारताने महत्त्वाची भूमिका बजावली होती, त्याच बांगलादेशमधील विद्यमान नेतृत्व भारताशी कृतघ्नपणे वागताना दिसत आहे. पण, भारत या सर्वांना पुरून उरल्याशिवाय राहणार नाही.


इस्लामी संघटनेने पाकिस्तानला फटकारले

इंडोनेशियातील जकार्ता येथे अलीकडेच झालेल्या ‘इस्लामिक को-ऑपरेशन पार्लमेंटरी युनियन’ या संघटनेच्या बैठकीत, पाकिस्तानला काश्मीरचा मुद्दा आंतरराष्ट्रीय पातळीवर न्यायचा होता. पण, अन्य सदस्य राष्ट्रांनी पाकिस्तानला विरोध केल्याने पाकिस्तानचा हा प्रयत्न फसला. यानिमित्ताने राजनैतिक मुत्सद्देगिरीमध्ये भारताने पाकिस्तानवर कुरघोडी केल्याचे दिसून आले. तसेच, या संघटनेच्या सदस्यांचा भारतास वाढता पाठिंबा मिळत असल्याचेही यानिमित्ताने स्पष्ट झाले. काश्मीरच्या मुद्द्यावर पाकिस्तानला भारताच्या विरोधात जोरदार बाजू मांडायची होती. पण, इंडोनेशिया, इजिप्त आणि बहारीन या देशांनी पाकिस्तानच्या प्रस्तावाला विरोध केला. त्यामुळे अंतिम मसुद्यामध्येही या प्रस्तावाचा उल्लेख होऊ शकला नाही. पाकिस्तानचा प्रस्ताव नाकारण्यात यजमान इंडोनेशियाने महत्त्वाची भूमिका बजावली. “या संघटनेच्या व्यासपीठाचा उपयोग, सदस्य देशांचे व्यक्तिगत प्रश्न उपस्थित करण्यासाठी केला जाऊ नये,” असे इंडोनेशियाने म्हटले. इजिप्त आणि बहरीन या देशांनी त्यास पाठिंबा दिला. या संघटनेने जो अंतिम जाहीरनामा घोषित केला, त्यामध्ये पॅलेस्टाईन आणि गाझामधील परिस्थितीबद्दल निषेध करण्यात आला. पण, भारतासंदर्भात काहीही उल्लेख करण्यात आला नाही. काश्मीरसंदर्भात पाकिस्तान अन्य मुस्लीम देशांचा पाठिंबा मिळविण्याचा प्रयत्न करीत आहे. पण, असे प्रश्न या परिषदेमध्ये मांडू देण्यास काही सदस्य देश उत्सुक नाहीत. पाकिस्तानने काश्मीरचा मुद्दा या परिषदेत पहिल्यांदाच उपस्थित केलेला नाही. या आधीही पाकिस्तानला यावरून विरोधास तोंड द्यावे लागले होते. 2019 साली अबूधाबी येथे झालेल्या परिषदेस पाकिस्तानचा विरोध असतानाही, भारतास ‘सन्माननीय अतिथी’ म्हणून निमंत्रित करण्यात आले. जकार्ता परिषदेतही पाकिस्तानला असाच अनुभव आला. त्या परिषदेत काही सदस्य देशांनी भारताच्या बाजूने उभे राहण्याची किंवा तटस्थ राहण्याची भूमिका घेतली. अलीकडेच भारताने जे ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवले, त्या दरम्यान काही अपवाद वगळताच अनेक मुस्लीम देश पाकिस्तानच्या बाजूने नसल्याचे दिसून आले.

‘जमात-ए-इस्लामी’चे शेपूट वाकडे ते वाकडेच!

‘ऑपरेशन सिंदूर’नंतर भारताची बाजू मांडण्यासाठी, भारताने विविध देशांमध्ये संसद सदस्यांची शिष्टमंडळे पाठवली. पण, केरळमधील ‘जमात-ए-इस्लामी’ या संघटनेला हा निर्णय काही पसंत पडला नसावा. त्या शिष्टमंडळातील एकाचे नेतृत्व काँग्रेसचे खासदार शशी थरूर यांना दिल्याने, या संघटनेचा आणखी तिळपापड झाला. शशी थरूर यांच्याप्रमाणे ‘जमात-ए-इस्लामी’ने परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्यावरही टीका केली. थरूर हे ‘मूर्ख’ असून ते अपस्मार झालेले राष्ट्रवादी आहेत, अशी टीका ‘जमात-ए-इस्लामी’ने केली आहे. थरूर आणि परराष्ट्रमंत्री जयशंकर हे दोघेही केरळचे असल्याने, या संघटनेने त्या दोघांना लक्ष्य केले. परराष्ट्रमंत्री जयशंकर हे संघ परिवाराच्या विचारस खतपाणी घालत असल्याची टीका ‘जमात’ने केली आहे. “भारताने तुर्कस्तानबाबत जी कठोर भूमिका घेतली, ती राष्ट्रहिताची नाही,” असेही या संघटनेने म्हटले. ‘जमात-ए-इस्लामी’ या संघटनेशी संबंधित एका वाहिनीवरील चर्चेदरम्यान ही विखारी मते व्यक्त करण्यात आली. या चर्चेवेळी, थरूर हे आता भाजपच्या वाटेवर आहेत, ते एक मूर्ख आहेत, ते जगातील अत्यंत क्रूर व्यक्तिमत्त्व असल्याची मुक्ताफळेही उधळण्यात आली. त्याच कार्यक्रमात परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्यावरही टीका झाली. संघ परिवारास खूश करण्यासाठीच जयशंकर आंतरराष्ट्रीय ार्यक्रमात आणि आपल्या ‘एक्स’ समाजमाध्यमावरून भारतीय राष्ट्रवादासंदर्भात वक्तव्ये करीत आहेत, असे वादग्रस्त वक्तव्यही या कार्यक्रमातील सहभागी झालेल्या काहींनी केले. भारतीय जनता पक्षास राजकीय लाभ व्हावा म्हणूनच तुर्कस्तानला लक्ष्य केले जात असल्याचेही या कार्यक्रमात म्हटले गेले. मोदी सरकारने केलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’ कारवाईस संपूर्ण देश पाठिंबा देत असताना, आपल्याच देशातील काही मुस्लीम संघटना, काही पक्षांचे नेते त्यास कसा विरोध करीत आहेत, याची कल्पना यावरून यावी! अशा घटना पाहिल्या की ‘जमात-ए-इस्लामी’सारख्या संघटनांचे शेपूट कसे वाकडे ते वाकडेच आहे, असे म्हणता येईल.
ओडिशामध्ये ‘घरवापसी’!

ओडिशा राज्यातील सुंदरगढ या जिल्ह्यातील फुलझहर येथील चार वनवासी कुटुंबानी, पुन्हा सनातन धर्मामध्ये प्रवेश केला. ‘घरवापसी’चा हा कार्यक्रम ‘हिंदू जागरण मंच’ आणि संत हरी बाबा यांनी ‘विश्व हिंदू परिषद’ आणि ‘बजरंग दल’ यांच्या सहकार्याने आयोजित केला होता. या कार्यक्रमाच्या निमित्ताने कलश शोभायात्रा, यज्ञ यांचे आयोजन करण्यात आले.ख्रिश्चन मिशनर्‍यांच्या प्रभावाखाली येऊन या वनवासी बांधवांनी, ख्रिस्ती धर्माचा स्वीकार केला होता. काही प्रलोभने दाखवून या सर्वांचे धर्मांतर करण्यात आले होते. पण, या सर्वांना आपली चूक लक्षात आली आणि त्यांनी पुन्हा सनातन धर्मात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आणि त्यानुसार ‘घरवापसी’ केली. या कार्यक्रमात शेकडो ग्रामस्थ सहभागी झाले होते.