मुंबई : जागतिक पर्यावरण दिनासाठी सगळे जग सज्ज होत असताना मुंबईभर विस्तारलेल्या मेट्रो व मोनोरेलच्या स्थानकांवर ई-स्वॅप बॅटरी स्वॅपिंग स्टेशन्स सुरू करण्यासाठी महामुंबई मेट्रो ऑपरेशन्स कॉर्पोरेशन लि.ने (एमएमएमओसीएल) जपानच्या होंडा मोटर कंपनी लिमिटेडची उप कंपनी असलेल्या होंडा पॉवर पॅक एनर्जी इंडिया प्रा. लि.शी भागीदारी केली आहे. या हरित उपक्रमांतर्गत २५ मेट्रो स्थानके व ६ मोनो रेल स्थानकांच्या ठिकाणी होंडाचे हे ॲडव्हान्स्ड बॅटरी स्वॅपिंग तंत्रज्ञान बसविण्यात येईल. यातून एमएमएमओसीएलला तिकीटाव्यतिरिक्त सुमारे ₹३० लाखांचे उत्पन्न मिळणार आहे.
एमएमएमओसीएलच्या इलेक्ट्रिक वाहन धोरणांतर्गत उचलण्यात आलेले हे एक मोठे पाऊल असून, पर्यावरणस्नेही ऊर्जा उपाययोजना आणि स्मार्ट लास्ट-माईल कनेक्टिव्हिटीला चालना देण्यावर या धोरणामध्ये भर देण्यात आला आहे. एमएमआरडीएचे आयुक्त आणि महामुंबई मेट्रोचे अध्यक्ष, डॉ. संजय मुखर्जी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या एमएमएमओसीएलच्या २९व्या संचालक मंडळाच्या बैठकीत हे धोरण मंजूर करण्यात आले. "पहिले ई-स्वॅप केंद्र दहिसर पूर्व मेट्रो स्थानकावर कार्यान्वित झाले आहे आणि मुंबईत आणखी ३० ठिकाणी ही सुविधा वेगाने सुरू केली जात आहे, हे सांगताना मला अत्यंत आनंद होत आहे", अशी माहिती आयुक्त डॉ. संजय मुखर्जी यांनी दिली आहे.
होंडा ई-स्वॅप काय आहे?
होंडाचा ई-स्वॅप हा इलेक्ट्रिक दुचाकी व तीनचाकी वाहनांसाठी नेक्स्ट जनरेशन बॅटरी स्वॅपिंग प्लॅटफॉर्म आहे. या माध्यमातून वापरकर्त्यांना त्यांच्या चार्ज संपलेल्या बॅटरीच्या जागी होंडाची पूर्ण चार्ज केलेली मोबाइल पॉवर पॅक बॅटरी बसवता येते. चार्जिंगसाठी लागणारा वेळ, रेंजविषयी असलेली चिंता या महत्त्वाच्या समस्या या सिस्टीममुळे सोडविल्या जातात. त्यामुळे मुंबईतील दाट लोकवस्ती असलेल्या शहरात डिलिव्हरी करणाऱ्या व्यक्ती, दैनंदिन प्रवासी आणि फ्लीट ऑपरेटर्ससाठी ईव्ही स्विकारणे अधिक व्यावहारिक होते.
खालील ठिकाणी ई-स्वॅप बॅटरी स्वॅपिंग स्टेशन्स बसविण्यात येतील
१) मेट्रो ७ मार्गिका (लाल मार्गिका)
गुंदवली, मोगरा, जोगेश्वरी पूर्व, गोरेगाव पूर्व, आरे, दिंडोशी, कुरार, आकुर्ली, पोईसर, देवी पाडा, राष्ट्रीय उद्यान
२) मेट्रो २ए मार्गिका ( पिवळी मार्गिका)
दहिसर पूर्व, आनंद नगर, कांदरपाडा, एक्सर, बोरिवली पश्चिम, शिंपोली, कांदिवली पश्चिम, डहाणूकरवाडी, मालाड पश्चिम, लोअर मालाड, बांगूर नगर, ओशिवरा, लोअर ओशिवरा, अंधेरी पश्चिम
३) मोनोरेल स्थानके: संत गाडगे महाराज चौक, मिंट कॉलनी, नायगाव, वडाळा, फर्टिलायझर टाऊनशिप, चेंबूर
"महाराष्ट्रात इलेक्ट्रिक मोबिलिटीला चालना देण्यास आपले सरकार कटिबद्ध आहे. मेट्रो आणि मोनो रेल्वे स्थानकांजवळ उभारण्यात येणाऱ्या बॅटरी स्वॅपिंग स्टेशन्समुळे डिलिव्हरी कर्मचारी, रोज प्रवास करणारे नागरिक आणि फ्लीट ऑपरेटर यांना ईव्हीकडे वळण्यास मोठी चालना मिळणार आहे. जनहितासाठी स्मार्ट पायाभूत सुविधा आणि हरित तंत्रज्ञानाची कशा प्रकारे सांगड घातली जाऊ शकते, याचे हे उत्तम उदाहरण आहे."
- देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री
"हरित पायाभूत सुविधा ही चैन नाही, तर महाराष्ट्राच्या भविष्यासाठीची गरज आहे. मेट्रो स्थानकांवरील बॅटरी स्वॅपिंगसारख्या उपक्रमांच्या माध्यमातून आपण नागरिक आणि पर्यावरणाला प्राधान्य देणारी एकात्मिक आणि हवामान बदलाच्या आव्हानांशी जुळवून घेत त्यावर मात करणारी वाहतूक व्यवस्था उभारत आहोत. राज्याच्या ईव्ही मिशनला पुढे नेणारे हे महत्त्वाचे पाऊल उचलल्याबद्दल मी एमएमएमओसीएल आणि होंडाचे अभिनंदन करतो."
- एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री
"सार्वजनिक परिवहन व्यवस्थेत शाश्वत तंत्रज्ञान अंतर्भूत करणे हे आमचे ध्येय आहे. होंडाच्या ई:स्वॅप उपक्रमामुळे आणि आमच्या ईव्ही धोरणाच्या पाठबळामुळे आपण इलेक्ट्रिक वाहन वापरकर्त्यांना अधिक स्मार्ट पायाभूत सुविधा उपलब्ध करून देत आहोत, तसेच महाराष्ट्राच्या पर्यावरणस्नेही ऊर्जेच्या व हवामानविषयक उद्दिष्टांना बळकटी देत आहोत."
- रुबल अग्रवाल, व्यवस्थापकीय संचालक, एमएमएमओसीएल