खेळांच्या मैदानांवरही फ्रंट रनर...

    01-Jun-2025
Total Views |
खेळांच्या मैदानांवरही फ्रंट रनर...


भारताच्या भौगोलिक आणि सांस्कृतिक इतिहासात ईशान्य भारताचा वाटा फार मोठा आहे. तसेच भरीव योगदान ईशान्य भारताने देशाच्या क्रीडा क्षेत्रातही दिले आहे. विविध क्रीडा प्रकारांमध्ये ईशान्य भारतातील अनेक खेळाडू देशाचा नावलौकिक वाढवत असतात. ईशान्य भारतातील क्रीडा संस्कृतीचा घेतलेला आढावा...


"ईशान्य भारत म्हणजे बायो-इकोनॉमी, चहा उद्योग, पेट्रोलियम, क्रीडा आणि पर्यटनाचे एक केंद्र आहे,” असे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नवी दिल्लीत आयोजित ‘रायझिंग नॉर्थ-ईस्ट इन्व्हेस्टर्स समिट’मध्ये म्हटले.  देशाच्या ईशान्य भागात गुंतवणूक आकर्षित करण्याच्या उद्देशाने आयोजित या परिषदेत देशातील अनेक नामांकित उद्योजक, व्यापारी आणि गुंतवणूकदार उपस्थित होते. "एकेकाळी ईशान्य भारतालाा केवळ ‘फ्रंटियर रीजन’ म्हटले जात असेे. आज तो विकासाचा ‘फ्रंट रनर’ बनला आहे,” असेही पंतप्रधान मोदींनी म्हटले. उद्योगपती जिथे जिथे आपली गुंतवणूक करतात, तिथे तिथे युवकांना नोकरी-धंद्यांच्या जोडीनेच खेळांमध्येही संधी मिळते. उद्योगपती जेव्हा खेळाडूंना आपल्या कंपनीत नोकरी देतात, तेव्हा त्या खेळाडूच्या प्रसिद्धी बरोबरच त्यांच्या अस्थापनाचीही प्रसिद्धी होत असल्याचे आपण बघतो.


देशाचा ईशान्य भाग हा विविध जनजातीबहुल क्षेत्र म्हणून प्रामुख्याने ओळखले जातो. भिन्नभिन्न संस्कृती, परंपरा आणि कला फक्त ईशान्य भारताचेच प्रतिनिधित्व करत असतात असे नव्हे, तर जगभरात भारतीय वारसा, संस्कृती, परंपरा, कला आणि क्रीडा यांचेही प्रतिनिधित्व ते करत आले आहेत. हे क्षेत्र म्हणजे अरुणाचल प्रदेश, आसाम, मणिपूर, मेघालय, मिझोराम, नागालॅण्ड, त्रिपुरा आणि सिक्कीम अशा आठ राज्यांचा तो एक समूह आहे. ‘अष्टलक्ष्मी’ या नावाने ओळखली जाणारी ही सगळीच क्षेत्र फक्त आपल्या प्राकृतिक सुंदरतेसाठी ओळखली जातात असे नव्हे, तर आपली अनोखी जनजातीय संस्कृती, लोककला, उत्सव यांची वैशिष्टयांचे दर्शनही ते घडवतात.


प्रत्येक जनजाती समाज आपापली परंपरा, भाषा, पोशाख यांतून, त्यांची सांस्कृतिक अस्मिता जोपासतात. इथे २०० हून अधिक जनजाती आढळून येतात. त्यातील प्रत्येकाची स्वतंत्र ओळख, रीतीरिवाज, लोककथा आढळतात. ही क्षेत्रे उत्सव आणि प्राकृतिक सुंदरता यासाठीच प्रसिद्ध आहेत. ईशान्य भारताची भौगोलिक संरचना त्या क्षेत्राला अधिकच वैशिष्ट्यपूर्ण बनवते. घनदाट आरण्ये, उंच डोंगर, खोल दर्या, नदी-नाले हे सारेच, या जनजाती समाजाच्या जीवनशैलीला प्रभावित करतात. बहुतेक जनजाती पर्वत आणि जंगलात निवास करतात.



या ईशान्येकडील राज्यांचा क्रीडा इतिहासही वाखाणण्यासारखाच आहे, प्राचीनही आहे. अनेकजण जाणत असतील की, मणिपूरमध्ये गेल्या कित्येक शतकांपासून खेळला जाणारा ‘पोलो’ हा खेळ, आजही तितयाच आवडीने खेळला जातो. ईशान्येकडील राज्यांतील विविध जनजातीय समाजात असे अनेक क्रीडाप्रकार आहेत की, जे खेळून त्यांनी देशविदेशांत आपले नाव मोठे केले आहेच तसेच, देशाचा झेंडा फडकावला आहे. आपण सगळे मेरी कॉमचे नाव ऐकत आलो आहोत. तिच्यासारख्या ईशान्य राज्यांतील अनेकांनी देशाचे नाव उज्ज्वल केले आहे.



भारताला पर्यटनाच्या बरोबरीने खेळातही ईशान्य राज्यातील लोकांनी प्रसिद्धी मिळवून दिली. तेथील मातीचा गुणच असा आहे की, त्या मातीचा साधेपणा आणि कठोरताच खेळाडूंना मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या मजबूत बनवत आली आहे.तिकडचे पारंपरिक खेळ आजही खेड्यापाड्यांत खेळले जातात आणि त्यात सहभाग घेऊन, क्रीडापटू घडतात. हेच खेळाडू पुढे आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताचा गौरव वाढवतात.


ईशान्येकडील राज्य म्हणजे अरुणाचल प्रदेश, आसाम, मणिपूर, मेघालय, मिझोराम, नागालॅण्ड, त्रिपुरा आणि सिक्कीम अशा अष्टलक्ष्मींतील आठ क्षेत्रांत, विविध पारंपरिक खेळ बघायला मिळतात. हे खेळ्अ स्थानिक संस्कृती, उत्सव आणि जीवनशैलीशीही जोडलेले आढळतात.



आता आपण या आठही राज्यांचा क्रीडा इतिहास क्रमाक्रमाने जाणून घेऊ :



१) आसाममधील जनजातीय संरचना विविधतापूर्ण आहे. आसामात बोडो, मिशिंग, कार्बी, राभा, सोनोवाल कचारी, लालुंग, गारो, दिमासा या जनजाती आहेत. त्या समाजातील पारंपरिक खेळाचे मुख्य उदाहरण म्हणून ‘दौंध बिओ’ या क्रीडाप्रकाराचे नाव घेता येईल. त्यात दोन संघात गतिमान असा वेगवान खेळ खेळला जातो. तसेच, कबड्डी आणि विटी दांडूसारखे खेळ तिकडच्याही ग्रामीण भागात लोकप्रिय आहेत.



२) मणिपूरमधील जनजातीय समाजात मैतेई, नागा आणि कुकी-चीन हे समाज आढळतात. मैतेई समाजाचे नृत्य आणि संगीत देशभरात प्रसिद्ध आहे. ‘थांगता’ ही मार्शल आर्ट आणि पारंपरिक नृत्य रासलीला यासाठी ते प्रसिद्ध आहेत. नागा आणि कुकी हे जनजाती समाज पर्वतीय क्षेत्रात राहतात. मणिपूरचा सर्वांत लोकप्रिय पारंपरिक क्रीडाप्रकार आहे ‘सगोल कांगजेई.’ ज्याला आधुनिक ‘पोलो’चा जनक मानले जाते. येथील लोक पूर्वांपार घोडेस्वारीच्या या खेळात रुची दाखवत आले आहेत. याच राज्यातून पोलोचा आंतरराष्ट्रीय प्रवास प्रारंभ झाला. ‘थांगता’ आणि ‘सरित सडक’ हे मणिपूरचे पारंपरिक मार्शल आर्ट आहेत; ज्यात शारीरिक क्षमता, लयबद्धता आणि मानसिक संतुलन महत्त्वपूर्ण असते. शस्त्रविरहित मार्शल आर्टचा ‘सरित सडक’ हा एक प्रकार मणिपूरचे विशेष आहे. ‘रग्बी’सारखा असलेल्या ‘यूबी लकप्पी’ या मणिपूरच्या खेळात, नारळाचा आणि नारळाच्या तेलाचा उपयोग रग्बीचा चेंडू म्हणून करण्यात येतो. मुख्यतः उत्सवांमध्ये हा धार्मिक महत्त्व असलेला क्रीडाप्रकार खेळला जातो.


३) मेघालयमध्ये खासी, जैंतिया, गारो, हजोंग, कोच, राभा या प्रमुख जनजाती आहेत. मेघालयात जठरा आणि वायीपर हे खेळ, दोन समाजातील परस्पर सहकार्य आणि संतुलन वाढवण्यात मदत करतात. तेथील धनुर्विद्या खूपच प्रसिद्ध आहे. ‘तोर्शीला’ नावाच्या खेळामध्ये दैनंदिन जीवनातील कार्यक्षमता प्रतिबिंबित होते.



४) मिझोरमची जनजातीय संरचनाही अद्वितीय आहे. लुशेई, राल्ते, हमार, पैहते, पावी (या पोई) असा जनजातीय समाज येथे राहतो. लुशेई हा मिझोरमचा प्रमुख जनजाती समाज असून राजनीती, संस्कृती आणि सामाजिक व्यवस्थेत तो मोठी भूमिका पार पाडतो. साक्षरतेच्या बाबतीत केरळ पाठोपाठ भारतात दुसरा क्रमांक लागणार्या मिझोरममध्ये, गावांतर्गत होणारे फुटबॉलचे सामने प्रसिद्ध आहेत. कित्ताल आणि सुपैकसारखे खेळ मिझोरमच्या ग्रामीण भागात खेळले जातात. यामध्ये शारीरिक लवचिकता आणि जलदपणाची चाचणी होते.



५) नागालॅण्डमध्ये नागा समुदायाच्या अनेक उपजाती आहेत. अंगामी, मियो, सिमा, च्यांग कोम आणि झेलीयांग या त्यातील काही प्रमुख उपजाती. नागालँड मधील जनजाती समुदाय आपले शौर्य आणि युद्धकौशल्यासाठी प्रसिद्ध आहे. त्यांच्या ‘हॉर्नबिल’ महोत्सवात रंगीबेरंगी परंपरांचे दर्शन घडते. हा सोहळा बघायला देशविदेशातील पर्यटक गर्दी करतात. नागालॅण्डमध्ये युवकांना शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त ठेवणारे खो-खो आणि सेसेसारखे पारंपरिक खेळही लोकप्रिय आहेत. हे खेळ सामुदायिक एकात्मतेची भावनाही निर्माण करण्यास मदत करतात. ताकद, संतुलन आणि कौशल्यावर आधारित असलेली नागा कुस्तीही प्रसिद्ध आहे.



६) अरुणाचल प्रदेशात आपातानी जनजातीचा डिलो नावाचा आणि मिश्मी जनजातीचा कट्टा फायटिंग हे खेळ, गावाकडील जत्रांमध्ये बघायला मिळतात. बोंग खेळाच्या स्थानिक स्पर्धा उंच पर्वतीय प्रदेशात खेळल्या जातात. तिथे ऑसिजनची कमतरता असूनही, अनेक खेळाडू त्या स्पर्धेत पूर्ण उत्साहाने सहभागी होतात.



७) त्रिपुरात मुकना आणि थंगूर हे मल्लविद्येवर आधारित खेळ स्थानिक युवकांत लोकप्रिय आहेत. बांबा आणि नटुआ यांसारखे खेळही तिथे आवडीने खेळले जातात.



८) सिक्कीममध्ये नेपाळी, बुटीया आणि लेपच्या हे समुदाय प्रमुख असून, त्यातील लेपच्या समुदायाला सिक्कीमचे मूलनिवासी म्हणून ओळखले जाते. लेपच्या हे प्रकृती पूजेवर विश्वास ठेवतात. सिक्कीमबरोबरच पश्चिम बंगाल, नेपाळ आणि भूतानच्या काही भागांतही लेप्चा लोक त्यांची बोली बोलतात. बुटीया समुदायावर तिबेटी संस्कृतीचा प्रभाव आहे. त्यांचे पारंपरिक वस्त्र, आभूषण, भोजन तिबेटी शैलीचेच असते. ब्रिटिशांनी सिक्कीमला, चीन आणि नेपाळविरुद्ध बफर स्टेट म्हणून पाहिले होते. १९७५ मध्ये सिक्कीमचे भारताशी विलनीकरण झाल्याच्या निमित्ताने, दरवर्षी दि. १६ मे रोजीचा हा दिवस ’सिक्कीम दिन’ म्हणून साजरा केला जातो. त्याच्या ५०व्या वर्धापन दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सिक्कीमच्या लोकांना शुभेच्छा दिल्या आहेत.



भारत आणि चीन यांच्यात सॅण्डविच झालेले आणि अनेकदा भूतान आणि नेपाळसोबत जमिनीवरून संघर्ष होत असल्याने, प्रथम दोन्ही राज्यांमध्ये अर्ध-औपचारिक संबंध निर्माण झाले. ब्रिटिशांनी सिक्कीमला चीन आणि नेपाळविरुद्ध ‘बफर स्टेट’ म्हणून पाहिले. सिक्कीममध्ये याक शर्यती आणि थॉज नावाचा खेळ, पारंपरिक उत्सवाचा एक भाग म्हणून खेळले जातात. भौगोलिक उंची आणि तेथील हवामान, खेळाडूंची मानसिक आणि शारीरिक क्षमतेची जणू चाचणीच घेतात.



कठोर परिश्रम आणि शिस्तबद्ध जीवनशैली, येथील लोकांची मानसिक दृढता वृद्धिंगत करते. खेळाला अत्यावश्यक असलेल्या या गोष्टींना तेथील लोक फार महत्त्व देतात.



वनवासी (जनजाती) कल्याण आश्रमाच्या खेलकूद आयामाची धुरा, अखिल भारतीय खेलकूद प्रमुख फूल छिरी लेप्चा हे सांभाळत आहेत. लेप्चा या नावाबरोबरच, भारताचा माजी कर्णधार आणि फुटबॉल दिग्गज बायचुंग भुतिया याचे नावही तोंडी येते. या दोन व्यक्तींची आठवण या ईशान्येकडील राज्यांच्या क्रीडा क्षेत्राबाबत येते, तशी अजून काही खेळांच्या मैदानांवरही ’फ्रंट रनर’ व्यक्तींच्या नावांचा उल्लेख करावासा वाटतो.


मांगते चुंगनेजंग मेरी कोम, बॉसिंगपटू

साइखोम मीराबाई चानू, भारोत्तोलन

लवलीना बोरगोहेन, हौशी मुष्टियोद्धा 


जेरेमी लाल रुंगा, मेरी कोम आणि विजेंद्र सिंगनंतर ऑलिम्पिकमध्ये भारतासाठी मुष्टीयुद्धात पदक मिळवणारी तिसरी भारतीय.

नयनमोनी सैकीया, आंतरराष्ट्रीय लॉन बॉल खेळाडू.

क्षेत्रीयमायुम थोयबा सिंग, इंफाळ, मणिपूरचा हॉकी संघातील ऑलिम्पियन.

लैश्राम सरिता देवी-मणिपूरमधील भारतीय बॉसर.

 लाईटवेट वर्गात ती राष्ट्रीय विजेती आणि माजी विश्वविजेतीही आहे.



अशी मोठी यादीच या ईशान्येच्या राज्यांतील विविध क्रीडापटूंची निघू शकेल. भारतीय क्रीडाविश्वात अधिकाधिक खेळांच्या मैदानांवरही या ’फ्रंट रनर’ची जणू राष्ट्रीय संघात सहभागी होण्यास अहमहमिका लागताना दिसेल आणि त्यायोगे भारत क्रीडाविश्वात अग्रेसर झालेला दिसेल हे नक्की!
इति|



श्रीपाद पेंडसे
(लेखक माजी खेलकूद आयाम प्रमुख, पश्चिम महाराष्ट्र प्रांत, जनजाती कल्याण आश्रम आणि माजी हॉकीपटू आहेत.)
९४२२०३१७०४