कालचक्राचा प्रवास (लेखांक-4)

    20-Nov-2022   
Total Views |
kalachakra


जीवनाचे असे कोणतेही क्षेत्र नाही, ज्या क्षेत्रात हिमालयाची उंची गाठणारे आपल्या महाराष्ट्रात झाले नाहीत. ही सर्व क्षेत्रे आपली वाट बघत आहेत. महाराष्ट्राच्या अशा विषारी, सामाजिक वातावरणात गुदमरून जायचे की, नवे नेतृत्व उभे करून नव्या वाटा शोधायच्या, या निर्णयाच्या चौकात आपण उभे आहोत.


मागचा लेख लिहीत असताना नेहमीप्रमाणे जातवाद्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा विषय जातवादाचा केला. त्यांना आपण सुधारू शकत नाही. त्यांच्या वटवटीला उत्तर देण्यातही काही अर्थ नाही. त्यांनी ठरवून ठेवलेले आहे की, महाराजांच्या आडोशाने ब्राह्मण विद्वेषाचे राजकारण करायचे. ते त्यांना मनसोक्त करू द्यावे. आपण सर्वांनी मात्र छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श जीवनात उतरविण्याचा प्रयत्न करीत राहिले पाहिजे.

छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे स्वधर्म, स्वदेश, स्वजन, (म्हणजे संपूर्ण समाज) यांच्या रक्षणाचा विडा उचललेला महान पुरूष. शिवाजी महाराज थोर मातृ-पितृभक्त होते. तेवढेच देवभक्त होते. सर्व साधुसंतांचा ते सन्मान करीत. त्यांनी समर्थांची जात पाहिली नाही की, तुकारामांची जात पाहिली. त्यांचा यथोचित आदर केला. मुसलमानांचा मुसलमान म्हणून द्वेष केला नाही. परंतु, आक्रमक इस्लामला त्यांनी रोखून धरले. माता-भगिनींचा सन्मान केला. त्यांच्या नावाने टाहो फोडणारे जातवादी यातील काहीही घेत नाहीत. मतबँका निर्माण करण्यासाठी त्यांना छत्रपती शिवाजी महाराज हवे आहेत.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या कालखंडात काय घडले, हे सप्रमाण सांगणे इतिहासकारांचे काम आहे. सभेत तोंडपाटिलकी करणार्‍यांचे हे काम नव्हे. इतिहासातील प्रेते उकरून काढून कलह करणे कधीच शहाणपणाचे नसते. आपल्याला महाराजांचा आदर्श प्रत्यक्ष जीवनात आणण्यासाठी जगले पाहिजे. एका छोट्या जहागिरीचे रूपांतर त्यांनी कैक कोटी उत्पन्न देणार्‍या राज्यात केले. मोगलांकडे त्यांना नोकरी मिळू शकत होती. परक्यांचे चाकर बनून आपल्याच लोकांना ठार करण्याचे काम महाराजांनी स्वप्नातही केले नाही. महाराजांचे नाव घेऊन, डोक्यावर गोल टोपी घालून, दाढ्या कुरवाळणारे, छत्रपतींचे वंशज नाहीत.


संसदीय लोकशाहीने मतपेट्यांचे राजकारण सुरू केले. सत्तेसाठी अनेक पक्ष उभे राहतात. मते गोळा करण्यासाठी जातभावनेला आवाहन करतात. आमच्यावर कसा अन्याय झाला आहे, यांची कथानके तयार करतात आणि जे नुकतेच वयात आलेले तरूण आणि तरूणी आहेत, ते याला बळी पडतात. हे वय भावनाशील असते. विचारांवर भावना भारी ठरतात. मग जसजसे वय वाढत जाते तसतसे तरुणांना आकलन व्हायला लागते की, आपल्याला चुकीच्या मार्गाने नेले आहे. खोट्या आकांक्षा आणि खोटी आश्वासने आपल्याला देण्यात आलेली आहेत. यासाठी मागील लेखात जे म्हटले की, आपण सर्वांनी भगवान गौतम बुद्धांच्या उपदेशाचे अनुसरण केले पाहिजे. आपला मार्ग आपण शोधला पाहिजे.

आपण सभोवताली नजर टाकली, तर आपल्याला हे लक्षात येईल की, आपले कर्तृत्व फुलविण्यासाठी असंख्य संधी वाट पाहत आहेत. आपल्या राज्यघटनेने स्त्री आणि पुरूष यांना समान संधी दिलेली आहे. स्त्री आणि पुरूष यांना कायद्याचे समान संरक्षण दिलेले आहे. समाजातील दुर्बळ घटकांनाही कायद्याचे संरक्षण दिलेले आहे. याचे अनेक कायदे झालेले आहेत. असंख्य प्रकारच्या शासकीय योजना आहेत. फालतू भाषणे ऐकण्यापेक्षा आपण ‘नेट’वर गेलो, तर या सर्वांची माहिती आपल्याला मिळेल. आपले स्वकर्तृत्व फुलविण्यासाठी हजारो वाटा आणि हजारो संधी आहेत, ही गोष्ट लक्षात येईल. महाराजांनी फार मोठी महत्त्वाकांक्षा बाळगली आणि आजच्या भाषेत सांगायचे झाले तर ते लाखो लोकांना रोजगार देणारे झाले. प्रत्येक जण शिवाजी महाराज होऊ शकत नाही हे जरी खरे असले, तरी त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून प्रत्येक जण जगू शकतो, हेदेखील खरे आहे.

महाराष्ट्राचा विचार केला, तर मराठी माणूस उद्योग आणि व्यापारात दिसत नाही, ही ओरड मी शालेय जीवनापासून ऐकतो आहे. हे असं झालं की, अंधार आहे - अंधार आहे असं सतत म्हणत राहायचे, पण अंधार दूर करण्याचा प्रयत्न करायचा नाही. एक दिवा लावला, तर अंधार संपतो. प्रत्येकाला दिवा बनण्यापासून कोणी रोखले आहे, कशाला निरर्थक सत्तेच्या राजकारणात आपली शक्ती वाया घालविता, सत्तेवर बसणारे एका मर्यादेपलीकडे प्रत्येकाला समृद्ध करू शकत नाहीत. काही कर्तृत्वान असतील, तर ते थोडेबहुत काम करतात आणि बाकीचे सर्व अलिबागला प्लॉट घेण्यात किंवा नाशिक, बारामतीत वैभव निर्माण करण्यात शक्ती वापरतात. आपण मात्र ज्या ठिकाणी आहोत त्याच ठिकाणी राहतो.

मागील लेखात आपण म्हटले की, आपले वय दहा हजार वर्षे आहे. एक मार्ग आपण विकसित केलेला आहे. या मार्गाची अनेक वैशिष्ट्ये आहेत. आपली जगण्याची पद्धती समन्वयाची आहे. वेगवेगळ्या विचारधारेत चांगले आणि आजच्या उपयोगाचे काय आहे, ते आपण घेत जातो. त्याचे उत्तम उदाहरण म्हणजे ‘हिंदू’ हा शब्द आहे. एक प्रेषित आपण स्वीकारत नाही. एक ग्रंथ प्रमाण मानत नाही. एक आचारपद्धती आपण स्वीकारत नाही. काही अंशी आपण जैन असतो, खूपशा प्रमाणात बौद्ध असतो, शीखही असतो आणि आर्य समाजीदेखील असतो. अहिंसेचे तत्त्व जैन विचारधारेतून आपण घेतले आहे. मानवसेवेची शिकवण भगवान गौतम बुद्धांकडून घेतली आहे. जशास तसे उत्तर देण्याची शिकवण शीख संप्रदायाची आहे आणि आर्य समाजाने आपली दृष्टी वेद-उपनिषदांकडे वळविली आहे. यासाठी कोणाचाही द्वेष न करता आपण जगले पाहिजे. मोठ्या प्रमाणात तसे जगतही असतो. परंतु, ते विचारपूर्वक जगले पाहिजे.

भारतात जन्मलेले सगळे महापुरुष आपले आहेत. कुणालाही वगळून जगता येणार नाही. भूतकाळात फार दूर न जाता स्वातंत्र्याच्या पंचाहत्तरीचा विचार केला, तर संविधान सभेचे सर्व सभासद हे राज्यघटनेचे मातापिता आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर राज्यघटनेचे शिल्पकार आहेत. पहिले पंतप्रधान पं. नेहरू महान लोकशाहीवादी होते. इंदिरा गांधी शूर आणि कणखर होत्या. राजीव गांधी यांनी नियतीने लादलेले कर्तव्य पार पाडले. स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी देशासाठी किती त्याग करावा लागतो, याचा आदर्श उभा केला. सुभाषचंद्र बोस यांनी देशासाठी रक्त सांडावे लागते. हे स्वत:चे रक्त सांडून आपल्याला शिकविले आहे. या गेल्या 75 वर्षांतील देशातील महान शास्त्रज्ञ, महान खेळाडू, महान अभिनेते, महान संगीतकार, गायक, हे सर्व आपले आहेत. प्रत्येकाने आपापल्या परिने देशाची सांस्कृतिक वाढ केली आहे. देशाला मोठे केले आहे. आपण सर्व त्यांचे वारस आहोत.

महाराष्ट्राचे राजकीय आणि सामाजिक वातावरण प्रमाणाबाहेर कलुषित झालेले आहे, हे आपण सर्वजण जाणतो. हे वातावरण विशिष्ट पक्षांच्या नेत्यांनी आणि त्यांच्या चेल्यांनी खराब करून टाकलेले आहे. त्याचा काही ना काही परिणाम आपल्या सर्वांवर होत असतो. एका मूलभूत प्रश्नाचा आपण विचार करूया. कोणत्याही राजनेत्याला शक्ती कुठून प्राप्त होते? श्रीकृष्ण, बजरंगबली, कालिमाता, या देवता स्वयंभू शक्तिशाली होत्या. मनुष्ययोनीत कोणताही मनुष्य स्वयंभू शक्तीशाली नसतो. त्याला जनतेतून शक्ती प्राप्त होते. समाज त्याला शक्ती देतो. म्हणून सर्वशक्तीचा उगम जनता आहे, असे लोकशाहीत आपण म्हणतो. हे 100 टक्के खरे असते. कोणत्या राजनेत्याला किती शक्ती द्यायची आणि किती काळासाठी द्यायची? याचा निर्णय समाजाने करावा लागतो. जर चुकीचा निर्णय केला, तर हिटलर, स्टॅलिन, मुसोलिनी, सद्दाम हुसेन निर्माण होतात. आणि योग्य निर्णय केला तर चर्चिल, केनेडी, नेहरू निर्माण होतात. महाराष्ट्रातील सगळे तोंडाळ राजनेते हे आपण निर्माण केलेले आहेत, हे लक्षात घ्यायला पाहिजे. आपल्यावतीने बोलण्याचा आव ते आणतात, पण ते काही खरं नसतं.

आपण शिवराळपणा करतो का? कुणाला चुतिया, गाढव, डुक्कर, विकाऊ, अशा शिव्या देतो का? घरात मुलाने जर शिवी दिली, तर आईचा किंवा बाबाचा रट्टा खावा लागतो. ही आपली संस्कृती आहे. आपण ज्यांना शक्ती देतो, ते जर उद्दाम झाले तर त्यांना शक्तिहीनही केले पाहिजे आणि ते आपणच करू शकतो. समाजरूपाने आपण फार शक्तिशाली आहोत. महाराष्ट्राची परंपरा फार मोठी आहे. विश्वकल्याणाचे पसायदान मागणारे ज्ञानेश्वर महाराष्ट्राचे. ज्ञानेश्वर ते गाडगेबाबा ही महान संतपरंपरा महाराष्ट्राची. महात्मा ज्योतिराव फुले ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर ही महाराष्ट्राची समाजसुधारकांची परंपरा. रानडे, गोखले, टिळक, यशवंतराव चव्हाण, एस. एम. जोशी, गोपीनाथराव मुंडे, बाळासाहेब ठाकरे, अशी महाराष्ट्राची राजकीय परंपरा आहे.


भास्करबुवा बखले ते पं. भीमसेन जोशी ही शास्त्रीय संगीताची परंपरा आहे. बालगंधर्व ते काशिनाथ घाणेकर ही महाराष्ट्राची नाट्यपरंपरा आहे. इतिहासाचार्य वि. का. राजवाडे ते शेषराव मोरे इतिहासकार आणि समीक्षकांची परंपरा आहे. जीवनाचे असे कोणतेही क्षेत्र नाही, ज्या क्षेत्रात हिमालयाची उंची गाठणारे आपल्या महाराष्ट्रात झाले नाहीत. ही सर्व क्षेत्रे आपली वाट बघत आहेत. महाराष्ट्राच्या अशा विषारी, सामाजिक वातावरणात गुदमरून जायचे की, नवे नेतृत्व उभे करून नव्या वाटा शोधायच्या, या निर्णयाच्या चौकात आपण उभे आहोत.


आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.