25 हजारांहून अधिक महिलांचा जीवन आधार

    12-Oct-2022   
Total Views |
 
Ashwini Boraste
 
 
 
‘एकीचं बळ एकट्याला सिद्ध करता येत नाही. म्हणूनच समाजाला सहकाराची नितांत आवश्यकता आहे. त्यामुळेच सहकारातून आणि सहकार्यातून स्वतःच्या भोवतालचं जग बदलण्याची जिद्द बाळगून नाशिक जिल्हा महिला व बचतगट विकास सह. पतसंस्था जन्माला आली. पुढे ‘जिजाऊ महिला सेवाभावी संस्था’ आणि ‘जिजाऊ महिला बचत गट बाजार’ या संस्थाही अश्विनीताई बोरस्ते यांच्या प्रयत्नातून कार्यरत आल्या. याद्वारे 1,052 बचतगटांच्या माध्यमातून 25 हजारांहून अधिक महिलांना रोजगाराची संधी उपलब्ध झाली आहे. अशा या संस्थाच्या समाजकार्याविषयी...
 
 
 
नाशिकच्या निफाड तालुक्यातील ओझर गावी 1971 साली अश्विनीताई बोरस्ते यांचा जन्म झाला. वडील ’एचएएल’ या विमाननिर्मिती कारखान्यात नोकरीला, तर आई सहकार क्षेत्रात कार्यरत होती. बागायतदार संघाबरोबच रेणुका सहकारी पतसंस्थेवर अश्विनी यांच्या आई संचालक म्हणून काम पाहत होत्या. समाजकारणासह शेतीदेखील सुरूच होती. अश्विनी यांचे आजोबाही पोलीस पाटील होते. त्यांना भेटायला अनेक वारकरी संप्रदायाची लोकं येत असतात. त्यामुळे अश्विनीताईंवरही वारकरी संप्रदायाचा प्रभाव पडला. ‘गोखले एज्युकेशन सोसायटी’च्या ‘एचएएल हायस्कूल’मध्ये त्यांचे बारावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण झाले. माहेरच्या वंदना राजाराम गवळी अर्थात अश्विनीताई अतिशय कडक शिस्त असलेल्या कुटुंबात लहानांच्या मोठ्या झाल्या. शाळेमध्ये अभ्यासात त्या हुशार होत्या. शालेय वयात त्यांनी भरतनाट्यम, भरतकाम शिकून घेतले.
 
 
तीन नाटकांमध्येही काम केले. सायकल चालवण्याच्या सवयीमुळे त्यांची उंची घरात मोठी होती. त्यामुळे घरातून लग्नासाठी तगादा होताच. इयत्ता बारावीची परीक्षा दिल्यानंतर त्या 1988 साली अशोक बोरस्ते यांच्याशी विवाहबद्ध झाल्या. विशेष म्हणजे, अशोक बोरस्ते हे त्यांच्या गावातील पहिले इंजिनिअर होते. नाशिकला स्थायिक झाल्यानंतर अश्विनीताईंना अनेक प्रश्नांचा सामना करावा लागत होता. पती उच्चशिक्षित मात्र स्वतः ताई बारावी उत्तीर्ण होत्या. त्यामुळे लोकांना उत्तरे देताना त्यांना खजिल वाटत असे. त्यामुळे त्यांनी पुढे शिकण्याचा निर्णय घेतला. पती अशोक यांनीही त्यांना परवानगी दिली.
ओझर येथील ‘माधवराव बोरस्ते महाविद्यालया’त त्यांनी ‘बीए’साठी प्रवेश घेतला. घर संसार, मुलांचे संगोपन आणि शिक्षण अशी त्यांची तारेवरची कसरत सुरू होती. ‘बीए’नंतर त्यांनी एक वर्षांचा ‘कॉम्प्युटर मॅनेजमेंट’चा कोर्स केला.
 
 
शिक्षण घेऊनही त्यांना नोकरी करणे शक्य होत नव्हते. परंतु, त्यांच्या सासूबाईंनी मोठ्या कष्टाने अशोक यांना शिक्षित केले होते. त्यावेळी गरिबीचे चटके सहन करून त्यांनी मुलाला ‘इंजिनिअर’ केले होते. त्यामुळे आईला जसे कष्ट सहन करावे लागले, तसे समाजातील अनेक महिला आर्थिक विवंचनेत असून त्यांना कष्ट, अडचणी सहन कराव्या लागत आहे. त्यामुळे अशा महिलांसाठी काम करण्याचा सल्ला देत स्वतःची ओळख निर्माण करण्याचा सल्ला अशोक यांनी ताईंना दिला. घरातून प्रोत्साहन मिळाल्याने ताईंनी काहीतरी वेगळे करण्याचा ध्यास घेतला आणि लवकरच ती संधी त्यांच्यासाठी चालून आली.
लवकर लग्न करून दिल्याने स्वतःचं असं काही करता आलं नाही, असे अश्विनीताई आईला सांगत. तेव्हा आईने त्यांच्यासमोर रेणुका महिला पतसंस्थेच्या संचालकपदाची निवडणूक लढविण्याचा प्रस्ताव ठेवला. संचालक पद काय, सहकार म्हणजे काय असं ताईंना काहीही माहिती नव्हते. सहकाराचा गंध नसला, तरीही त्यांनी सहकार क्षेत्रात पाऊल ठेवण्याचा निर्णय घेतला.
 
 
 
 Ashwini Boraste
 
 
 
आईसोबतच विविध बैठकांना त्या हजेरी लावू लागल्या आणि सहकार क्षेत्र त्यांना उमजत गेले. निवडणूक जिंकून त्या संचालक झाल्या. परंतु, महाराष्ट्र शासनाचा 1960’चा कायदा आणि बाकीच्या महिला सहकारी संस्था आणि कुटिरोद्योग यांचा स्वतंत्र अभ्यास करणे गरजेचे आहे, असे त्यांना जाणवले. त्यामुळे त्यांनी ‘डिप्लोमा इन को-ऑपरेटिव्ह मॅनेजमेंट’साठी प्रवेश घेतला. पहिल्या वर्षी त्या संचालक, दुसर्‍या वर्षी ‘व्हाईस चेअरमन’ आणि तिसर्‍या वर्षी त्या संस्थेच्या अध्यक्ष झाल्या. दोन-तीन वर्षे अध्यक्षपद सांभाळल्यानंतर त्यांना अनेक नव्या गोष्टी शिकता आल्या. नवे अनुभव मिळाले. याचदरम्यान रेणुका महिला पतसंस्थेतील कामामुळे ताईंना माध्यमातून मोठी प्रसिद्धी मिळत होती. सुरुवातीला पतसंस्थेसमोर अनेक अडचणी होत्या. कर्जवसुलीचे धोरण, महिलांना बँकिंगचे प्रशिक्षण आणि जनजागृती यासाठी त्यांनी अनेक उपक्रम राबविण्यास सुरुवात केली. महिलांसाठी रक्तदान शिबीर, ‘हिमोग्लोबीन’ तपासणी शिबीर, महिलांना एकत्र आणणे, सहकाराचे महत्त्व सांगणार्‍या कार्यशाळा आयोजित करण्यात आल्या. यावेळी ताई ‘सिटी बस’ने ये-जा करून संस्थेच्या कार्यालयात पोहोचत. महिला सभासदांना आर्थिक गोष्टी समजावणे, कर्ज कसे घ्यावे, त्याची परतफेड कशी करावी, कर्जातून उद्योग-व्यवसाय कसे सुरू करायला हवे, उद्योगातून कुटुंबाला हातभार कसा लावता येईल, यासाठी संस्थेतर्फे प्रयत्न करण्यात आले.
 
 
 
याचदरम्यान, माजी खासदार वसंतराव पवार आणि माजी गृहमंत्री आर. आर.पाटील यांच्याशी त्यांची भेट झाली. त्यावेळी महिला सक्षमीकरणासाठी बचत गटाची योजना महाराष्ट्र शासनाकडून राबविली जात असल्याचे त्यांना समजले. ती योजना नाशिक जिल्ह्यात आपण राबविली, तर जिल्ह्यातील अनेक महिलांना मदत होऊ शकते, असा विचार ताईंनी केला. आधीच सहकार क्षेत्रात असल्याने त्यांना हे काम तसे सोपे होते. त्यामुळे त्यांनी अभ्यास केल्यानंतर अखेर नाशिक जिल्हा महिला व बचतगट विकास सहकारी पतसंस्था मर्यादित या नावाने 2003 साली संस्था स्थापन केली. एकाच ठिकाणी लक्ष देता यावे, यासाठी त्यांनी रेणुका पतसंस्थेचा कारभार सहकार्‍यांना सोपवला. आणि त्या पूर्ण वेळ त्यांच्या नव्या संस्थेसाठी देऊ लागल्या. संस्थेच्या स्थापनेनंतर सुरू झाला एक अनोखा प्रवास.
 
 
 
‘सहकार संसारस्य सौरभम(सार्वभौम) सनातन’ असे संस्थेचे ब्रीदवाक्य ठेवण्यात आले. नाशिक जिल्हा कार्यक्षेत्र असलेली संस्था 13 तालुक्यांत काम करते. महिलांनीच महिला बचगटाच्या कामासाठी स्थापलेली ही नाशिकमधील एकमेव संस्था आहे. अनेक महिलांना बँक, पतसंस्था कशी असते, खातेदार झाले म्हणजे काय करायचे, बचतगट म्हणजे काय, त्याची बांधणी कशी करायची आणि त्यातून रोजगारनिर्मिती कशी करायची, या सगळ्या प्रश्नांची माहिती संस्थेने महिलांना देण्यास सुरुवात केली. नाशिक जिल्ह्यातील स्थलांतरित महिला, अनेक महिला कामगार यांना बँकेत कागदपत्रांची विचारणा व्हायची. त्यावेळी त्यांना संस्थेने मदत केली. जुजबी कागदपत्रांच्या आधारे खाते उघडून दिले.
 
 
 
संस्थेतर्फे बचतगटांची बांधणी सुरू झाली. धुणीभांडी, स्वयंपाकाची कामे करणार्‍या महिलांचा ‘शिवम् महिला स्वयं साहाय्यता बचतगट’ हा संस्थेचा पहिला बचतगट ठरला. 30 बचतगट, 700 महिलांचा सहभाग आणि भांडवल अशा अनेक पात्रता पूर्ण केल्यानंतर संस्थेची नोंदणी होणार होती. त्यामुळे अश्विनीताईंनी प्रचंड मेहनत घेतली. या सगळ्या पात्रता पूर्ण करायला त्यांना आठ ते नऊ महिने लागले. त्यावेळी पतसंस्था बुडण्याच्या प्रचंड अफवा होत्या. त्यामुळे त्यांच्यासमोर संस्थेचे काम करताना मोठ्या अडचणी होत्या. परंतु, नाशिक, निफाड, दिंडोरी, नांदगाव, सिन्नर, चांदवड, येवला अशा अनेक तालुक्यांमध्ये संस्थेतर्फे बचतगट सुरू झाले. बचतगटाचे शास्त्रोक्त शिक्षण दिले जाऊ लागले. कष्टकरी महिलांच्या मुलींना शाळेत जाण्यासाठी 50 सायकलचे वाटप करण्यात आले. रोजगारनिर्मिती सुरू झाली. लोणची, पापड बनविण्यास सुरूवात झाली.
 
 
 
फूडलायसन्स, पॅकिंग याविषयी माहिती देण्यासाठी आणखी दोन संस्थांची सुरुवात झाली. 2004 साली ‘जिजाऊ महिला सेवाभावी संस्था’ स्थापन झाली. महिलांची सेवाभावी संस्था असावी, महिलांनी समाजासाठी सेवाभाव ठेवावा म्हणून ‘जिजाऊ सेवाभावी संस्था’ ही कार्यरत झाली. ‘जिजाऊ महिला सेवाभावी संस्थे’तर्फे मेळावे, गटसंघटन, प्रशिक्षण,सामाजिक उपक्रम यांसह शैक्षणिक सहली, व्याख्याने/परिसंवाद, पर्यावरण, शिक्षण, ‘अ‍ॅक्शन ग्रुप’, सांस्कृतिक कार्यक्रम- दहीहंडी, सांजपाडवा, वीज, पाणी, टेलिफोन बील, घरपट्टी भरण्याची सुविधा उपलब्ध करून दिली जाते.
 
 
महिला सभासद वाढत गेले आणि संस्थेचा व्याप वाढला. महिला सभासदांनी तयार केलेले उत्पादन विकायचे कसे, असा प्रश्न उभा राहिला. त्यामुळे त्यासाठी 2006 साली ‘जिजाऊ महिला मार्केर्टिंग’ अर्थात ‘जिजाऊ महिला बचत गट बाजार संस्थे’ची सुरुवात झाली. याअंतर्गत नावीन्यपूर्ण उत्पादने, व्यापार आणि सेवा तीन व्यासपीठांच्या अंतर्गत दिवाळी फराळ, उन्हाळी पदार्थ, ‘प्रोसेसिंग’ पदार्थ असे 50 पदार्थ तयार करून ‘जे. एम. मार्केटिंग’च्या अंतर्गत विक्री व विविध सेवा देण्यास सुरूवात झाली. सध्या त्यांची उत्पादने भारतासह अमेरिका, दुबई, ऑस्ट्रेलिया, ब्राझील, इंग्लंड या देशांमध्येही जातात. आर्थिक सक्षमीकरण होत असताना असंख्य महिलांना एकत्र आणून साक्षरता अभियान, कुपोषण, भ्रूणहत्या, दारूबंदी याविषयी जागृती निर्माण करून सामाजिक उपक्रमाचा टप्पा गाठला. याही पुढे जाऊन स्वयंरोजगाराचे प्रशिक्षण देऊन स्त्रियांना उद्योजकीय सबलीकरणास प्रवृत्त केले जाते. उदा. पापड, लोणचे, जेवणाचे डबे, काही गृहोपयोगी वस्तूंचे निर्माणही केले जाते. हे करताना त्यांना आर्थिक सहकार्य त्यांनी केलेल्या उत्पादनांची विक्रीची व्यवस्था व्हावी यासाठी ‘जिजाऊ महिला बचतगट बाजारा’ची संकल्पना पुढे आली आणि त्याचा फायदा आज अनेक सदस्यांना होत आहे.
 
 
 
पुढे 2007 आणि 2012 साली अश्विनीताई बोरस्ते नाशिक महापालिकेवर नगरसेविका म्हणून निवडून आल्या. यानंतर ताईंच्या तिन्ही संस्थांची कामे जोमाने सुरू होती. पुढे 2017 साली पराजयानंतर त्यांनी पूर्णवेळ समाजकारणासाठी देण्यास सुरूवात केली. संस्थेत अनेक बदल करत त्यांनी संस्थेचा व्याप वाढवला. नवनवीन संकल्पना महिलांसमोर ठेवल्या आणि राबवल्यादेखील. ताईंना या कार्यामध्ये शंकुतला गवळी, विनायकदादा पाटील, आर. आर. पाटील यांसह प्रो. युनूस, नीलिमा मिश्रा यांचेही सहकार्य तथा मार्गदर्शन मिळाले. त्यांनी ‘एम.फील’चे शिक्षणही पूर्ण केले आहे. त्यांनी अनेक आंतरराष्ट्रीय परिषदांनाही हजेरी लावली आहे. सध्या अश्विनीताईंच्या मेहनतीच्या जोरावर त्या 1,052 बचतगटांचे काम सांभाळत असून त्याअंतर्गत 25 हजारांहून अधिक महिलांच्या हाताला काम मिळाले आहे. सध्या संस्थेचा वार्षिक ‘टर्नओव्हर’ कोट्यवधींच्या घरात आहे.
 
 
 
महिलांना स्वतःला ओळखता आले पाहिजे
 
 
महिलांना स्वतःला ओळखता आले पाहिजे. अन्यायाविरोधात आवाज उठवला पाहिजे. एक महिला शिकली, तर संपूर्ण घर शिक्षित होते. समाज हा समूहाला मिळालेला अर्थ आहे. प्रत्येक संस्थेचा उपक्रम स्वयंसिद्ध जागृती आहेच, पण त्याचबरोबर स्त्रीने स्वतः कमवून आर्थिकतेचा गोवर्धन उचलावा आणि आनंदाची समाधानाची संजीवनी मिळवावी, हा संस्थेचा मुख्य उद्देश आहे. समाज अशा उपक्रमांनी नक्कीच बदलू शकतो.
 
 
- अश्विनी बोरस्ते, संस्थेच्या संस्थापक-अध्यक्षा
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

पवन बोरस्ते

सध्या दै. मुंबई तरुण भारत वृत्तपत्रामध्ये उपसंपादक म्हणून कार्यरत. मागील 9 वर्षांपासून पत्रकारितेत सक्रिय. स्वा. सावरकरांच्या जन्मभूमीत वास्तव्य. पुणे विद्यापीठातून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. राजकारण, मराठी साहित्य आणि जनसंपर्क वृद्धीत विशेष रुची.