हिंदू अस्मितेच्या जागृतीसाठी झपाटलेली संस्था म्हणजे नवी मुंबईची ‘सेवाभावी सामाजिक संस्था’, तसेच ‘स्वराज्य मावळा प्रतिष्ठान.’ या संस्था म्हणजे राष्ट्रनिष्ठा, हिंदू संस्कृतीरक्षण आणि सामाजिक समरसतेचा संगम. ‘घर-घर जिजाऊ’पासून गडकिल्ल्यांच्या सन्मानापर्यंत ते स्वसंरक्षण प्रशिक्षणांपासून रक्तदान मोहिमांपर्यंत संस्थेचे कार्य विस्तारित आहे. या संस्था म्हणजे नव्या पिढीतील मावळ्यांची हिंदुत्वाशी निष्ठावान बांधिलकी. या संस्थांनी मिळून केलेल्या उपक्रमांचा आढावा घेणारा हा लेख...
वाभावी सामाजिक संस्था’ किंवा ‘स्वराज्य मावळा प्रतिष्ठान.’ हे नाव उच्चारले की डोळ्यांसमोर उभा राहतो, तो हिंदवी स्वराज्याच्या प्रेरणेने झपाटलेला एक दृढनिश्चयी लढा. ही संस्था केवळ समाजकार्य करणारी संघटना नाही, तर ती विचारांची चळवळ आहे. हिंदू संस्कृतीचे रक्षण, राष्ट्रहिताची जाणीव, आणि सामाजिक समरसतेचा मूलभूत ध्यास घेऊन तळागाळात रुजलेली अशी एक चळवळ, जी संघटनात्मक शिस्त, वैचारिक दृढता आणि कृतिशील राष्ट्रीयता या त्रिसूत्रीवर उभी आहे.
या चळवळीचा पाया हे केवळ स्वराज्याचे स्वप्न नाही, तर ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल यांसारख्या संघटनांनी दीर्घकाळ दिलेल्या प्रशिक्षण व संस्कारांचा ठसा आहे. या प्रेरणास्थानांतील विचार, राष्ट्रसेवेसाठी दिली जाणारी निस्वार्थ वृत्ती, समाजरक्षणाचा निर्धार आणि हिंदुत्वाच्या अस्मितेसाठी आवश्यक असलेली लढाऊ मानसिकता यांचा थेट परिणाम संस्थेच्या कार्यपद्धतीत दिसतो. संस्थेचे अध्यक्ष गुरुनाथ मुंबईकर हे स्वतः विश्व हिंदू परिषद व बजरंग दल यांअंतर्गत प्रशिक्षण शिबिरातून घडलेले कार्यकर्ते आहेत. त्यांच्या संघटन दृष्टिकोनामागे केवळ अनुभव नाही, तर गाभ्यापासून जागवलेली वैचारिक निष्ठा आहे. त्यांच्याबरोबर हिंदुत्व विचारांचे व्यापक आकलन, कायदेशीर प्रक्रिया आणि सामाजिक प्रश्नांच्या विविध अंगांना जोडणारे एक समाजशील व्यक्तिमत्त्व म्हणजे सल्लागार समिती प्रमुख संजय उलवेकर.
असो. दोन्ही संघटनांच्या माध्यमातून किशोरवयीन मुलींच्या, महिलांच्या संरक्षणासाठी अनेक उपक्रम राबवले जातात. संघटनात्मक पातळीवर घडवलेली ही तयारी आजच्या काळात किती आवश्यक आहे, हे ‘घर-घर जिजाऊ’ या अभियानातून स्पष्ट होते. ‘लव्ह जिहाद’सारख्या विकृत आणि धोरणात्मक आक्रमणांमुळे समाजाच्या खोल गाभ्यावर होणार्या परिणामांची जाणीव घेऊन संस्थेने एक वैचारिक आणि कृतिशील लढा उभारला आहे. गावोगाव, गल्लीबोळांत जाऊन स्वयंसेवक महिला, युवक आणि पालकांमध्ये जागृती करतात. हा लढा केवळ तोंडी सल्ल्यापुरता नाही. आजवर अशा अनेक पीडित मुलींसाठी संस्थेने न्याययंत्रणेसमोर जाऊन मदत केली आहे, पोलीस प्रशासनाशी समन्वय साधून सुरक्षा उपलब्ध करून दिली आणि कायद्याचा आधार घेऊन त्यांच्या पुनर्वसनाची जबाबदारी घेतली आहे.
या लढ्याला गती दिली, ती स्वसंरक्षण प्रशिक्षणाच्या कार्यातून. स्त्रियांनी दुर्बलतेचा शिक्का झुगारून आत्मरक्षणासाठी सज्ज व्हावे, यासाठी संस्थेने लाठीकाठी, दांडपट्टा, तलवार, नानचाकू, तसेच निशस्त्र तंत्रशास्त्र यांचे प्रशिक्षण सुसंगत आणि वैज्ञानिक पद्धतीने सुरू केले आहे. प्रतीक्षा मुंबईकर या संस्थाध्यक्षांच्या कन्या स्वतः प्रशिक्षक आहेत आणि त्यांनी आजवर 400 हून अधिक विद्यार्थिनींना प्रशिक्षण दिले आहे. हे प्रशिक्षण केवळ शारीरिक बळ देणारे नाही, तर मानसिक बळ देणारे, संस्कार देणारे आणि राष्ट्ररक्षणाच्या प्रेरणेने चालवलेले आहे. संस्थेच्या कामात ऐतिहासिक जाणिवा व संस्कृतीप्रति आदर हीदेखील महत्त्वाची भूमिका बजावतात. गडकिल्ले हे केवळ इतिहासाचे अवशेष नाहीत, तर आपल्या स्वातंत्र्याच्या संघर्षाची जिवंत साक्ष आहेत, ही भावना बाळगता संस्थेने रायगड, तोरणा, सिंधुदुर्ग यांसारख्या किल्ल्यांवर ‘गडकिल्ले स्वच्छता मोहिमा’ राबवल्या. ही स्वच्छता ही केवळ पर्यावरणीय दृष्टीने नव्हे, तर ऐतिहासिक सन्मानाचे पुनरुज्जीवन मानून केली जाते. किल्ल्यांवर पोवाडे, युद्धकथांचे सादरीकरण, शिवरायांचे विचार सांगणार्या गोष्टी, ढोल-ताशांचा गजर यांतून निर्माण होतो तो एक नवा शिवराय, नव्या पिढीत जागा होणारी शौर्यसंपन्न अस्मिता. या चळवळीचा सामाजिक पैलूही तितकाच खोलवर आहे. नैसर्गिक किंवा मानवनिर्मिती कोणतीही आपत्ती असूदे, संस्थेचे कार्यकर्ते तत्काळ मदतीसाठी सज्ज असतात. रक्तदान शिबिरे, अन्नछत्र, पाणीवाटप अशा कृतींतून त्यांनी हजारो गरजूंना मदत केली आहे. तसेच सण-उत्सवांच्या निमित्तानेही संस्था सामाजिक समरसता वाढवते. आदिवासी पाड्यांवर फराळवाटप, मकर संक्रांतीला तिळगुळ, गुढीपाडव्याला एकात्मतेचा उत्सव या सर्वांमधून ‘वसुधैव कुटुम्बकम्’ ही तत्त्वज्ञानशील भावना प्रकट होते.
या सर्व कार्यांचा केंद्रबिंदू ठरते ते नवी मुंबईत उभारलेले श्री छत्रपती शिवाजी महाराज मंदिर. हे मंदिर म्हणजे केवळ धार्मिक भावनेचे स्थळ नाही, तर राष्ट्रभक्ती, विचारमंथन आणि नेतृत्वशिक्षणाचे एक सामाजिक गुरुकुल आहे. येथे होणार्या नियमित शिववंदना, युवकांसाठी व्याख्याने आणि नेतृत्व कार्यशाळा हे आधुनिक भारतासाठी हिंदुत्वाची समृद्धता, सामाजिक जबाबदारी आणि राष्ट्रसेवा या संकल्पनांचा संगम घडवतात. संस्थेची संघटन रचना ‘सेल अॅण्ड विंग’ या मॉडेलवर आधारित आहे. गावागावांत दहा ते 15 स्वयंसेवकांचे ‘मावळा गट’ कार्यरत असून, शहरात विविध क्षेत्रांतील तज्ज्ञांची तांत्रिक समिती काम पाहते. ही रचना केवळ शिस्तबद्ध नाही, तर लवचिकही आहे, ज्यामुळे कोणत्याही आपत्तीच्या क्षणी संस्था वेळ न दवडता मदतीसाठी उभी राहते. संजय उलवेकर यांच्या संपर्कजाळ्यामुळे पत्रकार, वकील, मानसोपचारतज्ज्ञ, वैद्यकीय अधिकारी, इतिहासकार व सामाजिक क्षेत्रातील विचारवंत, संस्थांशी जोडले गेले आहेत, ज्यामुळे प्रत्येक अभियानाला व्यावसायिक बैठक मिळते. या सर्व उपक्रमांमागे उभी आहे ती एक वैचारिक प्रेरणा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने देशात निर्माण केलेली राष्ट्रनिष्ठ कार्यकर्त्यांची फळी, ‘विश्व हिंदू परिषदे’ने हिंदू समाजाच्या रक्षणासाठी घेतलेला ध्यास आणि ‘बजरंग दला’ने साकारलेली रक्षकांची भूमिका. सेवाभावी सामाजिक संस्था ही या सर्व प्रेरणांचा एक परिणामकारक अविष्कार आहे. एक समर्पित, शिस्तबद्ध आणि राष्ट्रभक्त कार्यकर्त्यांची फळी.त्यामुळेच ‘आपण जिजाऊ घडवली, तर शिवाजी जन्मेल,’ हे वाक्य संस्थेसाठी फक्त घोषवाक्य नाही, तर हेच संस्थेचे जीवनमूल्य आहे. प्रत्येक गडावर चढताना, प्रत्येक तलवारीचा ध्वनी ऐकवताना, प्रत्येक रक्तदान शिबिरात नोंदणी करताना आणि प्रत्येक घरात जाऊन स्वसंरक्षणाचा संदेश पोहोचवताना सेवाभावी संस्थेचे कार्यकर्ते हे आधुनिक काळातील मावळेच आहेत. हे वास्तव अखंड, अखंडित आणि अत्यंत आश्वासक आहे.
- सागर देवरे