हिंदी सक्तीविरोधात ठाकरे बंधूंचा एकत्रित मोर्चा! राज ठाकरेंचा राऊतांना फोन; काय चर्चा झाली?
27-Jun-2025
Total Views |
मुंबई : हिंदी भाषा सक्तीविरोधात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे येत्या ६ आणि ७ जुलै रोजी वेगवेगळा मोर्चा काढणार होते. परंतू, आता ५ जुलै रोजी दोन्ही ठाकरे बंधू एकत्रित मोर्चा काढणार असल्याचे संजय राऊतांनी सांगितले आहे. यासंदर्भात त्यांना राज ठाकरेंचा फोन आल्याचेही त्यांनी सांगितले.
हिंदी सक्ती आणि त्रिभाषा सूत्राविरोधात मनसे प्रमुख राज ठाकरे यांचा ५ जुलैला तर उद्धव ठाकरेंचा ७ जुलैला मोर्चा होता. याबद्दल बोलताना संजय राऊत म्हणाले की, "मला राज ठाकरेंचा फोन आला. उद्धव ठाकरेंनी ७ तारखेला आंदोलन करण्याचे ठरवले आणि मी ६ तारखेची घोषणा केली आहे. मराठी माणसं आणि मराठी भाषेसाठी दोन वेगळे मोर्चे निघणे हे बरं दिसत नाही. एकत्र आंदोलन झाल्यास त्याचा जास्त प्रभाव पडेल आणि मराठी भाषिकांना त्याचा आनंद होईल, असे राज ठाकरे म्हणाले."
महाराष्ट्रतील शाळांत हिंदी सक्ती विरोधात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल! जय महाराष्ट्र! pic.twitter.com/A8ATq2ra0k
"त्यानंतर मी उद्धव ठाकरेंशी याविषयी चर्चा केली. यावर कोणतेही आढेवेढे न घेता उद्धव ठाकरे म्हणाले की, मराठी माणसाचे ऐक्य दिसणे गरजेचे आहे. आपण सगळे मराठी माणसं मराठी भाषेसाठी एकत्र आहोत ही माझी भूमिका आहे. माझ्या मनात वेगळा मोर्चा काढण्याची कोणतीही भूमिका नाही. ६ तारखेला आषाढी एकादशी आहे. राज्यभरात आषाढीचा उत्सव असतो. आपल्या आंदोलनाला मराठी माणसापर्यंत पोहोचवणे कठीण जाईल. त्यामुळे आपण ७ तारीख ठरवली. एकत्र आंदोलन करणार असू तर माझी त्यासंदर्भात काहीही अडचण नाही. आपण त्यांच्याशी चर्चा करू. ७ तारखेला त्यांनी आमच्या मोर्चात सहभागी व्हावं किंवा त्यांनी ५ तारखेला एकत्र आंदोलन करावं, असे उद्धव ठाकरेंनी सांगितलं," असे संजय राऊत म्हणाले.
राऊत पुढे म्हणाले की, "त्यानंतर मी राज ठाकरेंशी चर्चा केली. त्यांनी तात्काळ त्याला होकार दिला. त्यांच्या सहकाऱ्यांशी त्यांनी चर्चा केली आणि त्यांचा परत फोन आला. हा मोर्चा ५ तारखेला करू आणि आपण सगळे त्यात सहभागी होऊ, असं राज ठाकरे म्हणाले. हा राजकीय अजेंड्याशिवाय मोर्चा असेल. मराठी भाषा हा एकच अजेंडा, कोणताही झेंडा नाही. मराठी भाषिक म्हणून आपण सहभागी होऊ. त्याला उद्धव ठाकरे यांनी मान्यता दिली. त्यामुळे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचा ५ तारखेला मोर्चा निघणार आहे," असेही संजय राऊतांनी सांगितले.