आपल्या देशामध्ये अनेक राजे होऊन गेले परंतु 'लोकराजे' म्हणून प्रसिद्ध झाले ते राजर्षी छत्रपती शाहू महाराज. त्यांचे राज्य समाज परिवर्तनाला समर्पित होते. त्या काळात समाज परिवर्तनाला गती देण्याचे कार्य छत्रपती शाहू महाराजांनी केले. त्यांचे हे 151 वे जयंती वर्ष आहे. आजही त्यांचे कार्य आपणा सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. त्यांनी भटके विमुक्त समाजासाठी केलेल्या कार्याचा मागोवा घेण्याचा हा एक प्रयत्न.
छत्रपती शाहू महाराज यांचा जन्म 26 जून 1874 ला घाटगे घराण्यात कागल येथे झाला. त्यांचे संपूर्ण नाव यशवंत जयसिंगराव घाटगे होते. कोल्हापूर संस्थानचे राजे चौथे शिवाजी महाराज यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी आनंदीबाई यांनी यशवंतरावास दत्तक घेतले व त्यांचे शाहू असे नामकरण केले. 1894 मध्ये त्यांचा कोल्हापूर संस्थानचे राजे म्हणून राज्याभिषेक झाला त्यांनी पुढे 1922 पर्यंत मागास, बहुजन, भटके विमुक्त समाजाच्या उन्नतीसाठी कार्य केले व समाज परिवर्तनाला गती दिली. त्यांनी शिक्षण ,आरोग्य, क्रीडा, उद्योग, आर्थिक, सहकार, सामाजिक, क्षेत्रात भरीव कार्य केले म्हणून समाज त्यांना थोर समाजसुधारक व लोककल्याणकारी राजे असे संबोधतो. 1896 मध्ये प्लेगची साथ व दुष्काळग्रस्त परिस्थिती निर्माण झाली होती अशा स्थितीत सामान्य जनतेसाठी निराधार आश्रम, विहीर खणणे, स्वस्त धान्य दुकान सुरू करणे इत्यादी लोककल्याणकारी कार्ये राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी सुरू केली. राजे शाहू महाराज यांचे भटके विमुक्त समाजावर विशेष लक्ष व प्रेम होते. त्याच्या उन्नतीसाठी विविध उपक्रम, कार्य, योजना छ. शाहू महाराज यांनी सुरू केल्या. भटक्या विमुक्तां वरील जन्मजात गुन्हेगार हा शिक्का पुसण्यासाठी, गुन्हेगारी विश्वातून त्यांना बाहेर काढून प्रगतीपथावर आणण्यासाठी छत्रपती शाहू महाराजांनी कोल्हापूर संस्थानमध्ये लोकोत्तर कार्य केले.
*शैक्षणिक कार्य* छत्रपती शाहू महाराजांनी शिक्षणाच्या प्रचार प्रसाराचे महत्त्व ओळखले होते. त्यांनी भटके विमुक्त समाजा मध्ये परिवर्तन आणण्यासाठी शिक्षण हे एकमेव प्रभावी माध्यम आहे हे लक्षात घेऊन 1896 मध्ये येथे भटके विमुक्तांसाठी पहिली शाळा सुरू केली. त्यांनी डोंगरी, ग्रामीण व मागासलेल्या भागांमध्ये मुलींसाठी शाळा उघडल्या. भुदरगड सारख्या पहाडी भागात मागास समाजामधील मुलींसाठी शाळा सुरू केली. केवळ शाळा सुरू करून ते थांबले नाही तर प्रथमच मागास जातींसाठी वसतीगृहे सुरू केली .1919 मध्ये ढोर, चांभार मुलांसाठी वसतीगृह सुरू केले. 1920 मध्ये वंजारी समाज वसतीगृह नाशिक येथे सुरू केले. 1920 मध्ये सोमवंशीय आर्यक्षत्रिय वसतीगृह सुरू केले. मागास व बहुजन समाजातील मुला-मुलींनी शिक्षण घेऊन आपल्या समाजाचा विकास करावा हे त्यांचे विचार पुढील काळात सुद्धा प्रेरणादायी ठरले . 26 जुलै 1902 मध्ये राजर्षी शाहू महाराजांनी आपल्या संस्थानात मागासलेल्या जातींसाठी नोकरीमध्ये 50 टक्के राखीव ठेवण्याचा क्रांतिकारक जाहीरनामा प्रसिद्ध केला व तो लागू केला. हा निर्णय खऱ्या अर्थाने भटक्या विमुक्त जातींच्या विकासा साठी दिशादर्शक ठरला.
पारधी समाजासाठी कार्य
भटके -विमुक्त, पारधी समाजावर जन्मजात गुन्हेगार असा शिक्का ब्रिटिशांनी मारला व हा समाज कधीच बदलणार नाही अशी त्यांची धारणा झाली होती. छत्रपती शाहू महाराजांचा आपल्या समाज परिवर्तनाच्या कार्यावर पूर्ण विश्वास होता. त्यांनी आपल्या कार्यामधून ब्रिटिशांची ही धारणा फोल ठरवली. त्यांनी भटके विमुक्त समाजाच्या कलागुणांना ओळखून त्यांचा उपयोग त्यांचे जीवन बदलण्यासाठी केला.
सातारा जिल्ह्यामधील जनता एका वाघामुळे त्रस्त होती. त्या वाघाने अनेक व्यक्ती व पशूंचे बळी घेतले होते. छत्रपती शाहू महाराजांनी त्या वाघाला मारण्याची जवाबदारी पारधी समाजाला दिली . पारधी समाजाने त्या विश्वासास सार्थ ठरवून दाखविले व त्या वाघास ठार केले. या कामगिरीवर खुश होऊन छत्रपती शाहू महाराजांनी ती पहाडी पारधी समाजास बक्षीस म्हणून दिली व त्यांना तिथे स्थिरस्थावर केले .परिणामतः आज सुद्धा पारधी समाज ही घटना गौरवाने सांगतो व त्या स्थानी स्थिर जीवन जगतो आहे. पारधी समाजामध्ये समाज परिवर्तनाचे सफल प्रयोग छत्रपती शाहू महाराजांनी केले. त्यांनी फासे पारध्यांच्या प्रमुखास आपल्या निवासस्थानाच्या संरक्षणाची जबाबदारी दिली. नेमबाजी मध्ये पारधी समाजाचे जन्मजात गुण ओळखून त्यांच्या पुढार्यास महाराजांनी सोनतळी कॅम्पच्या खास पहाऱ्यावर नेमले. काही पारध्यांना पहाऱ्यावर नेमले, काही पारधी समाजातील लोकांना पोलीस खात्यात नेमले तर काहींना शिकारखाण्यात कुत्तेवान म्हणून नेमले, काहीना रस्ते खुदाई, घर बांधणी सारख्या कामावर ठेवले, काहींना राधानगरीच्या धरणाच्या बांधकामावर पाठवले. छत्रपती शाहू महाराजांची ही सर्व धडपड या समाजात परिवर्तन आणण्यासाठी होती व त्यांना त्यात यश सुद्धा आले. 5 मार्च 1920 ला फासेपारधी लोकांना आळणवाडी, ककनवाडी, महाल, रायबाग जमीन देण्याच्या आज्ञा दिल्या.31 ऑगस्ट 1912 मध्ये कोटीतीर्थाचे माळावर फासेपारधी यांच्या 23 कुटुंबासाठी झोपड्या बांधून घेण्यासाठी 1200 रुपये देण्याची आज्ञा छत्रपती शाहू महाराजांनी दिली. महाराजांनी पारधी व कंजारभाट समाजासाठी 600 एकर जागा बक्षीस म्हणून दिली. वडार समाजाला खाणी साठी जागा दिली. समाजाने ज्यांना गुन्हेगार म्हणून लांब ठेवले अशा भटक्या विमुक्त जातीला आपल्या मायेच्या छत्रछाये खाली त्यांनी आणले. आपल्या कृती मधून या समाजावर प्रेम व विश्वास दाखविला. ही सुद्धा हाडामासांची माणस आहे यांच्या सुद्धा बदल होऊ शकतो असा संदेश त्यांनी आपल्या कृतीमधून दिला. छत्रपती शाहू महाराज खऱ्या अर्थाने सामाजिक परिवर्तना चे जनक होते.
सामाजिक परिवर्तनाचे प्रयोग राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या ठायी या मागास समाजाबद्दल आपुलकी व कळकळ दिसून येते. ही कळकळ फक्त विचारात नसून ती कृतीमध्ये होती. 1871 च्या जन्मजात गुन्हेगार कायद्यामुळे भटक्या समाजातील 14 जातींना दररोज हजरी लावण्यास जावे लागत होते. 3 ऑगस्ट 1918 ला आदेश काढून या जातींना हजेरी लावण्याची पद्धत बंद करण्याची आज्ञा छत्रपती शाहू महाराजांनी दिली. त्यांनी भटके विमुक्त समाजात समाज परिवर्तन साठी वाघ्या - मुरळ प्रतिबंधक कायदा आणला तर 1917 मध्ये स्त्री पुनर्विवाह कायदा आणला. 1919 मध्ये आंतरजातीय विवाह कायदा आणला. कुठल्याही परिवर्तना ची सुरुवात आधी स्वतःपासून केली पाहिजे, आपले उदाहरण समाजा पुढे प्रस्तुत केले पाहिजे या उद्देशाने त्यांनी आपल्या जनक घराण्यातील चंद्रप्रभाबाई नावाच्या बहिणीचा विवाह धनगर घराण्यात करून दिला. छत्रपती शाहू महाराज अनेक जातींच्या सामाजिक स्थितीबद्दल चिंता करीत असे.मांग गारुडी समाजात योग्य बदल होण्यासाठी या समाजाची एक नियमावली तयार करावी असे छत्रपती शाहू महाराज यांना वाटायचे. त्यांनी मांग गारुडी समाजाची नियमावली बनवण्यासाठी या समाजाला प्रोत्साहित केले. त्यांच्या प्रेरणेने समाजाच्या तीन बैठकी झाल्या त्यामधील प्रथम बैठक हैदराबादला, दुसरी बैठक कोल्हापूरला व तिसरी बैठक पुणे येथे संपन्न झाली व त्यामधून मांग गारुडी समाजाची एक नियमावली तयार झाली याचे श्रेय छत्रपती शाहू महाराजांना जाते.भटके विमुक्त समाजात योग्य परिवर्तन व्हावे यासाठी महाराज आग्रही असायचे. त्यावेळी कंजारभाट समाजाला राज्यात इनामी जागा देऊन त्यांना स्थिरस्थावर केले.
राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचे मागास, बहुजन, भटके विमुक्त समाजातील सामाजिक परिवर्तनाचे कार्य आज सुद्धा संस्था, समाज, शासन, प्रशासन यांच्यासाठी दिशाबोध आहे. या समाजाला प्रेमाने जवळ केले, आपला बांधव म्हणून वागविले तर हा समाज सुद्धा आपल्या विकासाच्या मार्गावर मार्गक्रमण करू शकतो हे छत्रपती शाहू महाराजांनी आपल्या कार्यामधून अधोरेखित केले आहे. आज सुद्धा भटके विमुक्त समाजाच्या समस्या अगणित आहे, आज सुद्धा हा समाज मुख्य प्रवाहाच्या बाहेर आहे. आजही प्रशासन त्यांना गुन्हेगार याच चष्म्यातून बघते (1952 चा कायदा). आजही शासन- प्रशासनामध्ये या समाजाप्रती उदासीनता दिसते. यासाठी छत्रपती शाहू महाराजांच्या विचारांपासून प्रेरणा घेऊन कार्य केले तरच हा समाज प्रगतीपथावर वाटचाल करू शकेल.
राहुल चव्हाण
(महाराष्ट्र प्रांत प्रमुख
भटके विमुक्त विकास परिषद)
८१४९२०१२१४