‘लेट्स इमॅजिन टुगेदर’ या आमच्या संस्थेतर्फे गेली सात वर्षे आम्ही सातत्याने जि. प. शाळांना शैक्षणिक सहकार्य करत आहोत. वाडा आणि विक्रमगडच्या प्रत्येक भेटीत नेहमीच वेगवेगळे अनुभव येतात. मुलांशी बोलताना, त्यांचे अनुभव ऐकताना त्यातून आपणच नकळत खूप काही शिकून जातो. शाळा सुरू झाल्यावर यावेळच्या जून महिन्याच्या भेटीतही आलेल्या अनुभवांचा हा मागोवा...
तुसे शाळेच्या वर्गातील मुलं कुतूहलाने, उत्सुकतेने ओमकार दादाकडे टक लावून बघत होती. ओमकार दादा गिफ्ट पॅकेटमधून एक एक साहित्य बाहेर काढत होता. वह्या, पेन्सिल, रब्बर, पट्टी, पेन, रंगीत खडू मुलांच्या चेहर्यावरचे आनंदाचे भाव, डोळ्यांतील चमक खूप काही सांगत होते. आता आपल्याकडे अभ्यास करायला वही आहे, पेन्सिल आहे. केवढा तो आनंद तुसेच्या शिक्षिका शर्मिला ताई म्हणाल्या, “शाळा सुरू झाली, त्यादिवशी फार थोड्या मुलांकडे वही होती, पण तुम्ही मात्र चार-पाच दिवसांतच मुलांच्या हातात हे सगळं साहित्य देता. आजपासून आता मुलं अभ्यासाला लागतील.” गेल्या काही वर्षांपासून आम्ही शाळा सुरू होताना मुलांच्या हातात शैक्षणिक साहित्य मिळावे म्हणून प्रयत्नशील असतो. त्यासाठी ‘मॉर्गन स्टॅनले’तील कर्मचार्यांच्या सहयोगाने जून महिन्यात शाळा सुरू झाली की, आठवड्याभरात शैक्षणिक साहित्य आम्ही मुलांच्या हातात पोहोचवतो. यावेळीही वाड्यातील तुसे शाळेला भेट दिली, तेव्हाचा हा अनुभव.
या खेपेत विक्रमगड आणि वाडा मिळून जवळपास नऊ शाळांना प्रत्यक्ष भेट द्यायची होती, तर काही शाळांमध्ये इतर शाळा सहभागी होणार होत्या. कारण जवळपास 21 शाळांचे साहित्य घेऊन आमच्या दोन गाड्या आणि टेम्पो मुंबईवरून निघाले होते. त्यात पावसाचे दिवस आणि रस्त्याची अवस्था तर काही बघायलाच नको. पाली फाट्याला मॅजिका घेऊन संजय भाऊ जवळपास एक तास आधीपासून आमची वाटत बघत होते. एक गाडी विक्रमगडला जाणार होती, तर दुसरी गाडी वाड्याला. वाड्यातील शाळांचे सामान टेम्पोतून संजू भाऊंच्या मॅजिकमध्ये ठेवायचे होते. आजूबाजूला उभ्या असलेल्या काही लोकांनी आम्हाला ओळखलं आणि चौकशी केली. ओमकार, जितू आणि ‘मॉर्गन स्टॅनले’चे कर्मचारी प्रतिनिधी वाड्याला निघाले. टेम्पो, मी, मिहीर, भूषण, योगेश, श्री आणि उत्साही बाल प्रतिनिधी विवान असे आम्ही सगळे बोरसे पाड्याला निघालो. सकाळपासून बोरसे पाड्यातील भईर सर आमच्या संपर्कात होतेच. बोरसे पाड्यात तर मुलांनी फुलांच्या पाकळ्यांच्या वर्षाव करून आमचं जंगी स्वागत केलं. किती बोलू आणि काय काय मज्जा सांगू, असं मुलांचं झालं होतं. सगळ्यांच्या हातात छान छान गिफ्ट पॅकिंग केलेलं साहित्य मिळाल्यामुळे सगळेच खुश होते.
बोरसे पाडा शाळा म्हणजे कार्तिकची भेट. प्रत्येक भेटीत त्याच्याकडून काहीतरी नवीन ऐकायला मिळतं. आता मोठा झालाय. हल्ली काय करतोस, विचारल्यावर कार्तिकने सिक्सरच मारली. कार्तिक म्हणाला, “आता कार्टून नाही बघत. आता मी मोठ्ठा झालो. आता मी सिनेमा बघतो, हॉलीवूडचा ” बरं एवढं सांगून कार्तिक थांबला नाही, तर त्याने सिनेमांची नावेही सांगितली. चौथीतल्या कार्तिकची समज आणि विचार करण्याची क्षमता वाखाणण्याजोगी आहे. कार्तिकला हॉलिवूड आणि बॉलिवूड यातील फरक माहीत आहे. वेळेअभावी कार्तिकशी जास्त गप्पा मारता आल्या नाहीत. एक गाडी आणि टेम्पो मोह मुद्रकला निघाले. तिकडे मोरेश्वर ठाकरे सरांच्या रडे पाडा शाळेतील मुलंही जमली होती. मी, श्री आणि टोपले पाडा शाळेचा साहित्याचा बॉक्स असे आम्ही मॅजिकमध्ये बसून निघालो. टोपले पाड्याच्या या एका बॉक्सने मात्र टेम्पो, इनोव्हा, मॅजिका, कार अशा सगळ्या वाहनांतून प्रवास केला. टोपले पाडा ही योगेश भुसार सरांची छोटीशी शाळा. आता त्यांच्या सोबत अजून एक शिक्षिका आहेत. त्याआधी एकशिक्षकी शाळा होती. लहान वयातच वडिलांचे छत्र हरवलेला पियुष नेहमीच आत्मविश्वासाने आणि जिद्दीने बोलतो. सरांशी चर्चा करून आम्ही निघालो. त्यानंतर आम्ही सगळे सुकसाळेमध्ये जमलो. तिकडे नरोत्तम भोये आणि बाकी आठ शाळांचे शिक्षक आमची वाट पाहात होते. सगळ्या शाळांना भेट देणे शक्य होत नाही, म्हणून काही मुलं आणि काही शिक्षक एका शाळेत जमतात. नारायण भोये सर, सचिन सर सगळेच जमले होते.
तर दुसरीकडे वाड्यात ओमकार आणि टीम कशिवाली, तुसे, वडवली, मोज शाळा करून मोज शाळेत थांबली होती. आता एकच शाळा राहिली होती, ती म्हणजे वाड्यातील रानावनातील वरई बुद्रुकची शाळा. मोजमध्ये आम्ही पोहोचेपर्यंत दुपारचे 4 वाजले होते. पावसाचे दिवस त्यामुळं निरसडी पायवाट, बेसुमार वाढलेले गवत, छोटे छोटे पाण्याचे ओहोळ, त्यावर ओंडक्यांचे साकव सगळं पार करून वरई बुद्रुक शाळेत पोहोचलो. या शाळेच्या गुरुजींच्या आणि मुलांच्या जिद्दीला मनापासून सलाम! कारण कायमच असंख्य अडचणींना सामोरं जात शिकवायला लागत आहे आणि शिकायला लागत आहे. या शाळेतील दुर्गाची गोष्ट म्हणजे तिची शिकण्याची जिद्द आणि समज अचंबित करण्यासारखी आहे. आपल्या पालकांना मदत करण्यासाठी म्हणून उन्हाळ्याच्या सुटीत त्यांच्यासोबत विटा उचलण्याचे काम तिने केलं. रोज 500 विटा उचलल्या, तर 200 रुपये मिळतात आणि तेही कंत्राटदाराने अजून दिलेच नाहीत. दुर्गा तिच्या भाषेत तिची कहाणी सांगत होती. खेळण्या-बागडण्याच्या वयातही, सहावीत शिकणार्या दुर्गाला आपल्या परिवाराच्या आर्थिक परिस्थितीची जाणीव आहे आणि त्यासाठी ती धडपड करते. दुर्गाचे शिक्षण थांबू नये, यासाठी काय काय करता येईल, या विचारातच वरई बुद्रुकवरून निघालो. प्रत्येक भेटीत येणारे काही अनुभव अस्वस्थ करून जातात, तर काही अनुभव आनंद देऊन जातात.
“पूर्णिमा ताई, तुमची संस्था वेळेत शैक्षणिक साहित्य आम्हा शिक्षकांना आणि मुलांना देते. त्यामुळे आता अभ्यासात अडचण येत नाही,” अशी प्रतिक्रिया सगळ्याच शिक्षकांची. शनिवारचा दिवस म्हणजे शाळा खरं तर अर्ध्या दिवसाने सुटते, पण मुलं मात्र आमची वाट बघत शाळेत थांबतात. आमच्याशी मनमोकळ्या गप्पा मारतात. गेल्या सात वर्षांतील आमच्या सातत्याच्या भेटींमुळे आता आमचं आणि त्यांचं एक सुंदर नातं तयार झालं आहे. आपण बोलतो ती भाषा मराठी भाषा आणि त्यांची बोली भाषा खरं तर वेगळी. त्यांचे शब्द, त्याचा अर्थ, संदर्भ कळायला वेळ लागतो. पण, आता अनुभवाने त्यांची भाषा कळायला लागली आहे. त्या सगळ्याच भाषेत अभ्यासक्रम असणं कठीण आहे. पण, त्या भाषाही लुप्त होऊ नयेत, यासाठी प्रयत्न व्हायला हवा. या मुलांच्या अंतर्मनाची भाषा, व्यक्त होण्याची भाषा समजून आणि उमजून घ्यायला हवी आणि हेच खर्या अर्थाने समजले, तर शिकूया आणि शिकवूयाही!
- पूर्णिमा नार्वेकर