भारतीय कला, नाट्य आणि संगीत क्षेत्रामध्ये अनेक संस्था आपापले योगदान देत असतात, पण काही संस्था अशा असतात ज्या केवळ संस्था राहात नाहीत, त्या चळवळ बनतात! ‘बालगंधर्व कला अकादमी’ ही अशीच एक सांस्कृतिक चळवळ आहे, जी रंगभूमीवर नव्याने इतिहास रचत आहे.
किशोर कुमार यांनी 2011 साली ‘बालगंधर्व’ या संस्थेचे बीज रुजवले. त्यामुळे कलाकारांना अभिजात माय मराठीचा झेंडा अभिमानाने फडकावणारं एक प्रतिष्ठित व्यासपीठ मिळालं. पाश्चिमात्य संस्कृतीच्या प्रभावामुळे होत चाललेले भारतीय पारंपरिक कला उत्सव आणि संस्कृतीचे नुकसान आणि दुर्लक्ष यांपासून लोककला संस्कृतीस पुनर्जीवित करणे हे संस्थेचे प्रमुख उद्दिष्ट होते. यापूर्वी संस्थेने ‘आजादी का अमृतमहोत्सवा’निमित्त सांस्कृतिक कार्य संचालनालय संचालित ‘पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी’ यांच्या सहकार्याने नाट्य प्रशिक्षण कार्यशाळेचे भव्य आयोजन केले होते. सदर कार्य हे बहुतांशी वेळा निशुल्क तसेच अल्प दरात केले जात असून एक उत्तम कला संस्कृती महाराष्ट्रासह देशामध्ये पुनर्स्थापित व्हावी, अशाच इच्छा आणि संकल्पनेने अकादमी कार्यरत आहे.
खरे तर ‘बालगंधर्व’ हे नावच भारतीय रंगभूमीवरील गौरवशाली परंपरेचं प्रतीक आहे. याच नावाला सार्थ ठरवत ‘बालगंधर्व कला अकादमी’ आज मराठी आणि भारतीय रंगभूमीला नवसंजीवनी देत आहे. अभिनय, नृत्य, संगीत, लेखन आणि दिग्दर्शन अशा विविध कलाशाखांमधून विद्यार्थ्यांना घडवत ही संस्था फक्त कलाकार नाही, तर संस्कृतीचे संवाहक घडवते. बालगंधर्व अकादमीचे वैशिष्ट्य म्हणजे परंपरेशी नातं तोडत न जाता, तिचा पुनर्जन्म घडवणं. येथे शास्त्रीय नृत्य, संगीत, नाट्य आणि लोककला शिकवली जातेच, पण त्यासोबतच विद्यार्थ्यांना कॅमेरा अॅक्टिंग, फिल्म लेखन, स्टेज मॅनेजमेंट, ऑडिशन टेक्निक, लाईव्ह परफॉर्मन्स स्किल्स, क्रिएटिव्ह रायटिंग यांसारख्या आधुनिक कौशल्यांचंही प्रशिक्षण दिलं जातं.
या संस्थेने आजपर्यंत 500 पेक्षा अधिक कलाकारांना रंगभूमी, चित्रपट, टीव्ही आणि वेब सिरिजसारख्या क्षेत्रांमध्ये संधी मिळवून दिली आहे. कलावंत घडतो, तेव्हा एका कलाकाराचा जन्म होतो पण संवेदनशील कलाकार घडतो, तेव्हा एक समाज घडतो. याच विचारातून ‘बालगंधर्व कला अकादमी’ने विविध सामाजिक उपक्रमांतून बाल आणि महिला कलावंतांसाठी सक्षमता केंद्र, शिष्यवृत्ती, थेट स्क्रिनिंग ऑडिशन्स, मानसिक आरोग्यसत्रे यांची सुरुवात केली आहे. संस्थेने अनेक ऐतिहासिक नाटकांचा पुनर्प्रयोग, अभंग गायन संध्या, शास्त्रीय संगीत मैफिली, भारतनाट्यम-कथक नृत्य कार्यक्रम आणि संवेदना आधारित रंगप्रयोग सादर करून रसिकांच्या मनात घरही केलं आहे. संस्था आता महाराष्ट्रापुरती मर्यादित राहिलेली नाही. आंतरराष्ट्रीय रंगमंचावर आपल्या विद्यार्थ्यांनी भारताची ओळख ठळकपणे निर्माण केली आहे. जपान, अमेरिका, युके, श्रीलंका आणि नेपाळ येथे संस्थेच्या कलावंतांनी सादर केलेले प्रयोग कौतुकास्पद ठरले.
बालगंधर्व, एक दालन नव्या संस्कृतीचं : पुढचा टप्पा, एक डिजिटल क्रांती : 2025 पासून अकादमी ऑनलाईन कोर्सेस, डिजिटल थिएटर फेस्टिवल्स, व्हर्च्युअल परफॉर्मन्स यांचीही सुरुवात करत आहे. यामुळे भारतभरातील विशेषतः ग्रामीण व दुर्लक्षित भागातील कलावंतांनाही हे शिक्षण मिळणार आहे. शेवटी एवढंच, ‘बालगंधर्व कला अकादमी’ ही एक संस्था नाही, तर कला आणि संस्कृतीच्या पुनर्जन्माची चळवळ आहे. जीवनातल्या रंगमंचावर तुमचंही एक पात्र आहे, ते सजवा, उभारा आणि जगवा. ‘बालगंधर्व अकादमी’च्या रुपाने रंगभूमीवर नवा इतिहास घडतोय आणि तुम्ही त्याचा भाग होऊ शकता.
- निशांत जाधव