विधानभवनात यापुढे मंत्री, आमदार, शासकीय कर्मचारी वगळता कोणालाही प्रवेश नाही!
- विधानसभा अध्यक्षांचा निर्णय; आ. पडळकर आणि आव्हाडांना दिली समज
18-Jul-2025
Total Views | 8
मुंबई: विधानभवनात गुरुवारी झालेल्या हाणामारीच्या गंभीर घटनेनंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी कठोर निर्णय घेतला आहे. यापुढे मंत्री, आमदार आणि शासकीय कर्मचारी वगळता कोणालाही विधानभवन परिसरात प्रवेश मिळणार नाही. या घटनेत आमदार गोपीचंद पडळकर आणि जितेंद्र आव्हाड यांच्याशी संबंधित व्यक्तींचा समावेश असल्याने दोघांना सभागृहात खेद व्यक्त करण्याचे आदेश देण्यात आले. तसेच, या प्रकरणी मरीन ड्राइव्ह पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शुक्रवारी सभागृहात सांगितले की, मुख्य सुरक्षा अधिकाऱ्यांनी सादर केलेल्या अहवालानुसार, दि. १७ जुलै २०२५ रोजी विधानभवन परिसरात दोन अभ्यागतांमध्ये हाणामारी झाली. यामध्ये नितीन देशमुख यांनी स्वतःला आमदार जितेंद्र आव्हाड यांचा कार्यकर्ता, तर सर्जेराव टकले यांनी गोपीचंद पडळकर यांचा मावस भाऊ असल्याचे सांगितले. सुरक्षा पथकाने तात्काळ हस्तक्षेप करून दोघांना ताब्यात घेतले. या प्रकरणी ६ ते ७ अनोळखी व्यक्तींविरुद्ध मरीन ड्राइव्ह पोलीस ठाण्यात फौजदारी कारवाई सुरू आहे.
अध्यक्षांनी स्पष्ट केले की, “ही घटना सभागृहाची प्रतिष्ठा मलिन करणारी आहे आणि यामुळे विशेषाधिकार भंग झाला आहे. अधिकृत प्रवेशिका नसताना हे अभ्यागत विधानभवनात कसे आले? अशा घटना यापूर्वी कधीही घडल्या नाहीत.” त्यांनी आमदारांना सूचना दिली की, कोणत्याही अनाहूत व्यक्तींना विधानभवन परिसरात आणू नये. तसेच, अभ्यागतांच्या वर्तनाची जबाबदारी संबंधित आमदारांवर निश्चित केली जाईल. “लोकशाहीचे मंदिर असलेल्या विधिमंडळाच्या परंपरा राखणे ही सर्व सदस्यांची जबाबदारी आहे,” असेही ते म्हणाले. अध्यक्षांनी घोषणा केली की, यापुढे विधानभवनात केवळ मंत्री, आमदार आणि शासकीय कर्मचारी यांनाच प्रवेश मिळेल. मंत्र्यांनी खात्याशी संबंधित चर्चेसाठी मंत्रालयातील दालनाचा वापर करावा, अशी सूचनाही त्यांनी दिली.
मुख्यमंत्र्यांचा संताप
गुरुवारी विधानसभेत झालेल्या राड्याप्रकरणी विधानसभा अध्यक्षांनी आमदार गोपीचंद पडळकर आणि जितेंद्र आव्हाड यांना सभागृहात खेद व्यक्त करण्यास सांगितले. मात्र, आव्हाड यांनी यावेळी त्यांना आलेल्या धमकीचा उल्लेख केला. त्यावर सत्ताधारी आमदारांनी आव्हाडांना रोखले आणि मूळ विषयावर बोलण्यास सांगितले. त्यानंतर विरोधी बाकांवरील आमदार म्हणाले, आव्हाडांना बोलू द्या, त्यांचे बोलणे थांबवू नका.
यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले, काल इथे जे काही झाले, त्यामुळे केवळ एका माणसाची प्रतिष्ठा गेली नाही. संपूर्ण सभागृहाच्या प्रतिष्ठेला गालबोट लागले आहे. हे काही बरे नाही. आज बाहेर एकट्या पडळकरला किंवा आव्हाडांना शिव्या पडत नाहीत. आपल्या सर्वांनाच शिव्या पडत आहे. लोक म्हणतायत की सगळे आमदार माजलेत", अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी नाराजी व्यक्त केली.