येत्या १५ दिवसांत कोकणात ‘एम टू एम’ रो रो सेवा सुरू करणार- मंत्री नितेश राणे;
- तारापूरमध्ये जागतिक दर्जाचे मत्स्यालय उभारणार
18-Jul-2025
Total Views | 15
मुंबई: कोकणातील प्रवास सुलभ करण्यासाठी येत्या १५ दिवसांत ‘एम टू एम’ रो रो सेवा सुरू केली जाईल, अशी माहिती मत्स्योत्पादन आणि बंदरे मंत्री नितेश राणे यांनी शुक्रवारी विधानपरिषदेत दिली. सागरी सुरक्षेसाठी कठोर उपाययोजनांमुळे राज्यातील मत्स्योत्पादनात तीन हजार मेट्रिक टन वाढ झाल्याचे त्यांनी सांगितले.
नियम २६० अंतर्गत मांडलेल्या प्रस्तावाला उत्तर देताना नितेश राणे म्हणाले की, सागरी सुरक्षा आणि मत्स्योत्पादन वाढीवर शासनाचे विशेष लक्ष आहे. गेल्या आठ महिन्यांत गस्ती नौकांद्वारे १ हजार १६५, ड्रोनद्वारे १ हजार ८०३ आणि पावसाळी मासेमारी उल्लंघनाच्या ३६ प्रकरणांत कारवाई झाली आहे. महाराष्ट्र हे मासेमारीला १०० टक्के कृषी दर्जा देणारे देशातील पहिले राज्य आहे.
कोकणातील प्रवास सुलभ करण्यासाठी ‘एम टू एम’ रो रो सेवा १५ दिवसांत सुरू होईल.
मिरकरवाडा, रत्नागिरी येथे २२ कोटी रुपयांची विकासकामे सुरू आहेत, तर तारापूर येथे ३५० कोटी रुपये खर्चून जागतिक दर्जाचे मत्स्यालय उभारले जाणार आहे. रोजगार निर्मितीसाठी वाढवण बंदरात कुशल मनुष्यबळ तयार करण्याकरिता सामंजस्य करार झाला असून, ‘आय टी आय’मध्ये यासंबंधी प्रशिक्षण अभ्यासक्रम सुरू होणार असल्याचेही राणे यांनी सांगितले.