विधानभवनाच्या मंदिरात येऊन दादागिरी करणे लोकशाहीला शोभणारे नाही! मंत्री उदय सामंत यांची प्रतिक्रिया

    18-Jul-2025
Total Views |

-minister-uday-samants-reaction
 
मुंबई : विधानभवनाच्या मंदिरात येऊन दादागिरी करणे लोकशाहीला शोभणारे नाही, अशी प्रतिक्रिया मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे. आ. गोपीचंद पडळकर आणि आ. जितेंद्र आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या हाणामारीवर त्यांनी ही प्रतिक्रिया दिली.
 
 
मंत्री उदय सामंत म्हणाले की, "काल विधानसभेच्या परिसरात झालेल्या मारामारीचा मी निषेध करतो. कोण कुठल्या पक्षाचा आहे यापेक्षा विधानसभेचा परिसर पवित्र आहे. ज्या सुरक्षारक्षकाने ही मारामारी थांबवली त्याला जेव्हा आम्ही भेटलो तेव्हा त्याने सभागृहाचा उल्लेख मंदिर असा केला. त्यामुळे या मंदिरात येऊन दादागिरी करणे लोकशाहीला शोभणारे नाही. त्यामुळे कालच्या प्रसंगाचा मी जाहीरपणे निषेध करतो," असे ते म्हणाले.
 
अधिवेशनात गर्दी कमी असावी!
 
"आज मी विधानसभेत आणि विधान परिषदेत याबाबत स्पष्ट भूमिका मांडली. भविष्यात अशी प्रवृत्ती वाढल्यास देशात महाराष्ट्र विधानमंडळाची प्रतिमा डागाळू शकते, अशी भूमिका मी स्पष्ट केली. त्यामुळे कालच्या प्रसंगाचे कुणीही समर्थन करू शकत नाही. विधानभवनाचे कामकाज महाराष्ट्राच्या हितासाठी होते असते. त्यामुळे सभागृहात आलेल्या सदस्यांना चांगल्या पद्धतीने काम करायला मिळावे यासाठी प्रत्येक अधिवेशनात गर्दी कमी असली पाहिजे," असेही मंत्री उदय सामंत यांनी यावेळी स्पष्ट केले.