
संपूर्ण विश्वात प्राणवायू हा फक्त आणि फक्त वृक्षच निर्माण करतात आणि म्हणून आपण त्याचे महत्त्व जाणले पाहिजे. हे महत्त्व जाणण्यासाठी आणि दुसर्यांना सांगण्यासाठी निलयबाबू शाह जैन यांनी ‘हिरवांकुर फाऊंडेशन’ची स्थापना केली. प्रथमतः त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना त्यांनी या कार्यात सामील केले. त्यानंतर या कार्याचे महत्त्व त्यांनी मित्र, नातेवाईक, विद्यार्थी, शिक्षक आणि काही सामाजिक कार्यकर्त्यांना पटवून दिले. पाहता पाहता ‘हिरवांकुर’च्या छताखाली उभी राहिली पर्यावरणप्रेमींची एक सुंदर, मजबूत व भव्य साखळी. या लेखाद्वारे ‘हिरवांकुर फाऊंडेशन’च्या कार्याचा घेतलेला सविस्तर आढावा...
ईश्वराने आपल्याला या सुंदर पृथ्वीचे निर्माण करून सोबत पर्वत, नद्या, झाडे इत्यादी निःशुल्क भेट दिलेली आहे. हे सर्व आपल्याला मोफत मिळत असल्याने आपण त्याचे उपकार विसरतो. या जगात प्राणवायू हा फक्त आणि फक्त वृक्षच निर्माण करतात आणि म्हणून आपण त्याचे महत्त्व जाणले पाहिजे. हे महत्त्व जाणण्यासाठी आणि दुसर्यांना सांगण्यासाठी निलयबाबू शाह जैन यांनी 2021 साली ‘हिरवांकुर फाऊंडेशन’ची स्थापना केली. या कार्याचे महत्त्व त्यांनी आपल्या कुटुंबातील सदस्य, मित्र, नातेवाईक, विद्यार्थी, शिक्षक आणि काही सामाजिक कार्यकर्त्यांना पटवून दिले आणि ‘हिरवांकुर’च्या छताखाली उभी राहिली, पर्यावरणप्रेमींची एक सुंदर, मजबूत व भव्य साखळी.
आपण जेथे वृक्षारोपण करत आहोत, त्या वातावरणात वारा, पाऊस यांचा विचार करता कोणते वृक्ष लागू शकतात? सोबत वृक्षारोपण कोठे करावे, कसे करावे, केव्हा करावे, का करावे, जागा कशी निवडावी, दोन वृक्षांमध्ये अंतर किती असावे, कोणती खते द्यावी, केव्हा किती पाणी लागेल, वृक्ष स्वावलंबी होईपर्यंत त्यांची सुरक्षा कोण करेल, कशी करेल, सगळ्यांत महत्त्वाचा प्रश्न की आपण वृक्षारोपण करत असलेल्या वृक्षाचे महत्त्व आणि त्याची उपयुक्तता काय, भविष्यातील आर्थिक फायदा काय अशा अनेक प्रश्नांचा गांभीर्याने विचार-विनिमय व अभ्यास करण्यासाठी ‘हिरवांकुर’चे सदस्य एकत्र आले आणि खोलवर विचारमंथन करण्यात आले. त्यानंतर सामान्य माणसामध्ये वृक्षारोपणाचे खरे आयुर्वेदिक महत्त्व व सोबत त्यातून मोठे आर्थिक उत्पन्न मिळवू शकतो, हा विश्वास निर्माण करण्याचा प्रयत्न ‘हिरवांकुर’तर्फे सुरू करण्यात आला.
हिरवांकुर’च्या संस्थापकांनी विद्यार्थीदशेतूनच ‘हरितसंस्कार’द्वारे ‘हर घर किसान’ या संकल्पनेची निर्मिती केली. त्यासाठी एक मार्गदर्शिका तयार केली. त्याद्वारे विद्यार्थ्यांवर स्वच्छ हरित व जलयुक्त पर्यावरणाचे संस्कार करण्यासाठी शिक्षण मंडळाची परवानगी मागितली. शिक्षण मंडळाने तत्काळ व रीतसर लेखी परवानगी दिली. त्याप्रमाणे 2021 पासून नाशिक विभागाअंतर्गत येणार्या नाशिक, जळगाव, नंदुरबार, धुळे या जिल्ह्यांतील सुमारे 36 ठिकाणी मिळून सुमारे तीन हजार शाळांमध्ये पोहोचून लाखो विद्यार्थ्यांवर हरित संस्कार करण्याची सुरुवात झाली आहे. ही संकल्पना जोमाने सुरू असताना ऑगस्ट 2023 दरम्यान समाजातील सुशिक्षित वर्गाला सामील करण्यासाठी ‘वृक्ष दत्तक संकल्पने’चा उदय झाला.
या संकल्पनेत नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव व जालना येथील 32 न्यायालयांतील शेकडो सन्माननीय न्यायाधीश महोदय, हजारो विधिज्ञ (वकील) व सेवक वृंद यांनी दि. 26 जानेवारी व दि. 15 ऑगस्ट रोजी एकाचवेळी हजारो रोपे एका वर्षासाठी दत्तक म्हणून स्वीकारली. पुढील वर्षी या हजारो रोपांचे एकाच वेळेला शास्त्रशुद्ध पद्धतीने ऐतिहासिक वृक्षारोपण करून पालकत्व स्वीकारणार्या प्रत्येक व्यक्तीचे नाव या वृक्षांना देण्यात येईल. सगळ्यांत विशिष्ट गोष्ट म्हणजे या प्रत्येक वृक्षाला एक क्यूआर कोड ‘हिरवांकुर’द्वारा दिला जाईल. हा कोड स्कॅन करताच, त्या वृक्षाची बॉटनिकलपासून आयुर्वेदिक उपयुक्ततेपर्यंतची माहिती एका क्षणात मिळेल. सोबत दत्तक घेणार्याचे नाव पालक म्हणून कायमस्वरूपी अंकित असेल. म्हणजे एकप्रकारे प्रत्येक वृक्षाचे आधार कार्ड तयार केले जाईल. ‘वृक्ष दत्तक संकल्पने’ला सुरुवात करताना नाशिक मनपा, नाशिक, जळगाव, नंदुरबार येथील जिल्हा सामाजिक वनीकरण विभाग यांचे मोठे सहकार्य लाभले. त्यामुळेच 32 पेक्षा जास्त तालुक्यांमध्ये हे कार्य जोमाने सुरू आहे. जवळपास 30 हून अधिक न्यायालयांमध्ये जागतिक पर्यावरण दिन साजरा करण्यात येऊ लागला. वृक्ष, वृक्षारोपण, पर्यावरण, जैवविविधता व पाण्याची बचत या विषयांवर प्रबोधन मार्गदर्शन करणारे सत्रही घेतले गेले. न्यायालयात न्यायाधीशांसह अनेक वकील हे शेतीशी संलग्न असल्याने तेदेखील मार्गदर्शन करतात. बोरगड येथील हवाई दळाच्या रडार स्टेशनला ‘हिरवांकुर’ने भेट देऊन अधिकार्यांना भारतीय प्रजातींच्या वृक्षारोपणाचे महत्त्व समजावून सांगितले. अधिकार्यांच्या परवानगीने या ठिकाणी सुमारे 200 वृक्षांचे रोपण करण्यात आले. नाशिक मनपाच्या 41व्या वर्धापन दिनानिमित्त पर्यावरणासाठी सर्वोच्च कार्य केल्याबद्दल टीम ‘हिरवांकुर’ला तत्कालीन आयुक्त डॉ. अशोक करंजकर यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. ‘स्ट्राइकिंग स्ट्रायडर्स’च्यावतीने 2024 साली नाशिक मॅरेथॉनमध्ये ‘हिरवांकुर फाऊंडेशन’ने सक्रिय सहभाग घेतला. प्रत्येक धावपटूला सुमारे 1 हजार, 300 भारतीय प्रजातींची बाळरोपे दत्तक देण्यात आली.डॉ. संदीप भानोसे, प्रा. अमोल अहिरे, नलिनी शाह, राखी शाह, मयंक शाह, संजय फडके, अनिल खालकर, महेश चावला, अजित मेहरोलिया, मधुर अग्रवाल, विठ्ठल चौधरी, प्रिती चौधरी, उज्वला कापसे, अपर्णा दिवगी, ज्योती देवरे, प्रशांत देवरे, तेजस बेदमुथा, दिपक कुलकर्णी, सुनिल भट्ट, अश्विनी भट्ट, कमलेश संत, सरिता संत, रवी वेलाणी, योगेश वारे, कॅप्टन डॉ. राजेंद्र राजपूत, नाना पाटील आदि ‘हिरवांकुर’ योद्धे पर्यावरण संवर्धनासाठी फाऊंडेशनच्या विविध उपक्रमांत तन-मन-धनाने सक्रिय सहभाग घेत आहेत.
विषमुक्त शेती ही काळाची गरज
आजकाल धान्य, भाजीपाला, फळफळावळ भरमसाठ रसायने फवारून पिकवले जातात. ते मानवासाठी हानिकारक आहेत. तसेच त्यासाठी होणार्या अमाप खर्चाने शेतकरी हवालदिल होत आहे. यावर मात करण्यासाठी ‘हिरवांकुर’तर्फे शेतकर्यांना कंपोस्ट, नैसर्गिक, जैविक खत आणि त्याच्या निर्मिती प्रक्रियेची माहिती दिली जाते. टाकाऊ वस्तू प्रत्येक शेतकर्याकडे सहजपणे उपलब्ध आहेत. यामुळे केवळ पैशाची बचत होत नाही, तर नैसर्गिक धान्य आणि भाजी पालादेखील तयार होतो, ज्यामुळे मानवी आरोग्यामध्ये सुधारणा होते. याकरिता ‘हिरवांकुर’तर्फे ‘विषमुक्त शेती-काळाची गरज’ असा जनजागृतीपर उपक्रमही राबविला जातो.
पर्यावरणीय संवर्धनासाठी वृक्षोत्सवाचे आयोजन
‘हिरवांकुर फाऊंडेशन’ आणि नाशिक मनपा यांच्या संयुक्त विद्यमाने पर्यावरणीय संवर्धनासाठी 2023 साली वृक्षोत्सव आयोजित केला गेला. याअंतर्गत तीन दिवसीय प्रदर्शनात हजारो नागरिकांना स्वच्छ, हरित, प्लास्टिक मुक्त व जलयुक्त पर्यावरणाचे प्रात्यक्षिकासह धडे देण्यात आले. विविध पर्यावरणीय स्पर्धांचे यशस्वीपणे आयोजन केले गेले.
विद्यार्थी दशेतून हरित संस्कार
शिक्षणाचे महत्त्व लक्षात घेत विद्यार्थीदशेतून ‘हिरवांकुर’ ‘हरित संस्कार’ हे शैक्षणिक मार्गदर्शक पुस्तक फाऊंडेशनचे अध्यक्ष शाह यांनी लिहिले. या पुस्तकाचे विविध मान्यवरांनी कौतुकही केले. भारतीय वृक्षप्रजाती, ऐतिहासिक स्थळे, पक्षी मधमाशीपालन आणि सेंद्रिय खतनिर्मिती याविषयी पुस्तकात सखोल माहिती आहे.
दुर्मीळ बियाणांचा खजिना
‘हिरवांकुर फाऊंडेशन’च्या चमूने सुमारे 200 प्रकारच्या भारतीय प्रजातींच्या बिया मिळवल्या असून त्यावर सतत अभ्यास सुरू आहे. आपल्या अनुभवाव्यतिरिक्त कृषी अधिकारी, आदिवासी, शेतकरी व इतर जाणकारांसह उच्चशिक्षित प्राध्यापक, लेखक यांच्याकडून माहिती मिळवण्याचे कार्य अविरत सुरू आहे. अनेक प्रयोग व अभ्यासाअंती बालक-पालक ही संकल्पना एकमताने प्रभावीपणे अमलात आणली. या बियांमध्ये काही परिचयाचे वृक्ष आहेत, तर काही लुप्त होत असलेल्या प्रजाती. जसे की, बहावा, आवळा, बेलाचे वृक्ष, फणस, चिंच, जांभूळ, आंबा, भोकर, आपटा, रिठा इ. यांचा समावेश आहे.
‘हिरवांकुर’ प्रयोगशाळा
कोणतेही कार्य करण्यापूर्वी त्याचा अभ्यास करणे अत्यंत अत्यावश्यक आहे. त्यामुळे वृक्षारोपणापूर्वी एक योग्य पद्धत निश्चित करण्यात आली. वृक्षारोपणासाठी भारतीय प्रजातींच्या बियांची निवड करण्यात आली. नैसर्गिक खते, बिया, वृक्ष, वातावरण अशा विविध गोष्टींचा अभ्यास करण्यासाठी निलयबाबू शाह जैन यांनी आपल्या निवासस्थानीच ‘हिरवांकुर’ प्रयोगशाळा सुरू केली.
शास्त्रशुद्ध पद्धतीने वृक्षारोपण
‘हिरवांकुर’ एक सेवाभावी संस्था आहे. लोकांना रोपांचे शास्त्रशुद्ध पद्धतीने वृक्षारोपण शिकवणे गरजेचे असल्याने त्यासाठी ‘हिरवांकुर’ने प्रयत्न सुरू केले. शाळा आणि स्थानिक समुदायांसोबत भागीदारी करून विद्यार्थी आणि स्वयंसेवकांना पर्यावरण संवर्धनाचे महत्त्व पटवून दिले जाऊ लागले. या उपक्रमाद्वारे ‘हिरवांकुर’ने हजारो झाडे लावून, हवेची गुणवत्ता सुधारून कार्बन फूटप्रिंट्स कमी करण्याचा सफल प्रयत्न केला आहे.
दुष्काळग्रस्त रनाळागाव घेतले दत्तक
रनाळा या गावात दुष्काळी परिस्थिती असल्याचे समजल्यानंतर टीम ‘हिरवांकुर’ने तेथील ग्रामस्थांशी चर्चा केली. त्याप्रमाणे सर्व ग्रामस्थांनी एकमताने ग्रामसभेत ठराव करून गावातील पर्यावरणीय स्थिती बदलण्याकरिता ‘हिरवांकुर’ला आमंत्रित केले. शिरपूर पॅटर्नचे जनक व जिओलॉजिकल एक्सपर्ट सुरेश खानापूरकर तसेच नाशिक येथील इंजिनिअरिंग महाविद्यालयाचे जिओलॉजिस्ट के. टी. पाटील व त्यांची टीम अशा दोन जिओलॉजिकल अनुभवी तज्ज्ञांकडून रनाळा गावाचे भौगोलिक सर्वेक्षण करण्यात आले. त्यानंतर सुमारे तीन किमी नदीला नांगरटी करून जागोजागी चौकोनी खड्डे खोदले. विहिरी व बोअर यांचे पुनर्भरण, रेनवॉटर हार्वेस्टिंगच्या जनजागृतीसाठी भव्य सेमिनार गावकर्यांकरिता आयोजित करण्यात आला. त्यामुळे सुमारे 100 पेक्षा जास्त घरे रेनवॉटर हार्वेस्टिंगयुक्त बनले. मागील पावसाळ्यात दोन हजार वृक्षांचे रोपण प्रत्येक गावकर्याला जबाबदारी देऊन करण्यात आले. यामध्ये निम्मी रोपे ही फळझाडांची वाटण्यात आली. प्रत्येक शेतकर्याला दोन ते तीनच रोपे देण्यात आली. ती त्यांनी सांभाळून छान तयार केल्यास पुढील वर्षी इतर काही फळझाडांची बाळ रोपे देण्यात येतील. ‘हिरवांकुर’ने दुष्काळग्रस्त रनाळा गाव दत्तक घेतल्यानंतर आता तेथील परिस्थितीमध्ये आमूलाग्र बदल पाहायला मिळत आहे.
जलमंदिरांचे लोकार्पण
यंदा जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून ‘हिरवांकुर फाऊंडेशन’तर्फे 33 जलमंदिरे म्हणजेच शोषखड्ड्यांचे (रेन वॉटर हार्वेस्टिंग पिट्स) लोकार्पण करण्यात आले. जलमंदिर निर्माणाचा उपक्रम गतवर्षी महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून ‘विनजीत टेक्नोलॉजी’च्या ‘विनअर्थ’ उपक्रमांतर्गत ‘कॅच द रेन’ ही संकल्पना हाती घेऊन विविध प्रकारचे प्रयोग करत पाच मॉडेल साकारण्यात आले होते. यावर टीमने व्यवस्थित अभ्यास करून व भरपूर परिश्रम घेत यंदा नाशिकमध्ये विविध ठिकाणी 33 जलमंदिरांचे (शोषखड्डे) निर्माण केले व कार्य पुढे सुरू आहे. या 33 जलमंदिरांची एकूण वार्षिक शोषण क्षमता जवळपास 1 कोटी, 50 लाख लिटरची असून ‘हिरवांकुर फाऊंडेशन’ला नाशिक मनपाचे भक्कम पाठबळ लाभत असून केबीटी महाविद्यालयाच्या अभियांत्रिकी विभागाचे तांत्रिक मार्गदर्शन मिळत आहे. ‘एक पेड माँ के नाम’ असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आवाहन केले. त्या धर्तीवर ‘एक जलमंदिर हर एक परिवार के नाम’ असा मूलमंत्र घेतल्यास आपण अनेक संकट व नुकसानापासून वाचू. जीवन सुजलाम्-सुफलाम् होऊन निश्चित धरतीवर स्वर्ग उतरेल, असे फाऊंडेशनचे अध्यक्ष निलयबाबू शाह जैन सांगतात. पाणी म्हणजे ईश्वराने आपल्या दारात अगदी निशुल्क पोहोच केलेले अमृत. त्याच अमृताचा आपल्यासाठी संग्रह करायचे ठिकाण म्हणजे जलमंदिर. जलमंदिरासाठी शेत, मोकळ्या जागेवर, इमारत, बंगल्याच्या मोकळ्या परिसरात उताराने जेथे पावसाचे पाणी साचते, तेथे सहा फूट लांब बाय सहा फूट रुंद बाय सहा फुटांपेक्षा शक्य तेवढा खोल खड्डा करावा. यामध्ये खाली 40 टक्के मध्यम आकाराचे दगड त्यावर मजबूत शेडनेटचे आवरण. त्यानंतर 40 टक्के 20 एमएम खडी. त्यावर 200 जीएसएमचे जिओफॅब्रिकचे आवरण. त्यावर वाळू किंवा क्रशरची वाळूसारखीच सॅण्ड याला चारही बाजूंनी 12 इंचाची कोणतीही फरशीची चौकट करावी. फरशी आठ इंच जमिनीत व चार इंच जमिनीच्या वर ठेवावी. म्हणजे वाहून आलेली माती, घाण, कचरा बाहेरच राहील. अशा प्रकारे जलमंदिराचे स्वरूप आहे.
पवन बोरस्ते
7058589767