सामाजिक बांधिलकी जपणारा कलाकार - रवींद्र पोंक्षे

    18-Jun-2025
Total Views | 22

Ravindra Ponkshe
 
संगीत क्षेत्रात प्राविण्यप्राप्त असलेले रवींद्र पोंक्षे. सामाजिक जाणिवेतूनअनेक वर्षे त्यांनी रचनात्मक कार्य केले. संगीतकार आणि संवेदनशील कलाकार म्हणून ही स्वतःचा ठसा उमटवणार्‍या रवींद्र पोंक्षे यांच्या कलाक्षेत्रातील योगदानासह सामाजिक भानही लक्षणीय आहे. त्यांच्या विचारकार्याचा मागोवा घेणारा हा लेख...
 
रविंद्रचा संगमेश्वर तालुक्यातील आंबव या गावी दि. 22 एप्रिल 1970 रोजीचा जन्म. आंबव गाव सूर्यनारायण मंदिरासाठी प्रसिद्ध आहे. दरवर्षी माघ प्रतिपदेला तिथे मोठा उत्सव होतो व सर्व पोंक्षे मंडळी तो उत्साहाने साजरा करतात. प्रख्यात अभिनेते शरद पोंक्षे हे रवींद्रचे चुलत भाऊ. त्यांच्याशिवाय स्वरतीर्थ सुधीर फडके, पंडित जितेंद्र अभिषेकी, प्रभाकर पणशीकर, बाळ कोल्हटकर हेसुद्धा या उत्सवात सहभागी होत असत. पिताश्री मधुकर पोंक्षे भजन आणि भारुडाचे महाराष्ट्रभर कार्यक्रम सादर करीत असत. अशा कार्यक्रमांतून रवींद्रला संगीताची गोडी लागली आणि वयाच्या अवघ्या चौथ्या वर्षापासून तो वडिलांना तबलासंगत सहजपणे करू लागला व पाचव्या वर्षापासून माधव तारे यांच्याकडे तबल्याचे रीतसर शिक्षण सुरू झाले. तबलावादनातील रवींद्रची निपुणता पाहून त्यांनी रवींद्रला ज्येष्ठ तबलावादक उस्ताद अमीर हुसेन खा साहेब यांचे पट्टशिष्य पं. अरविंद मुळगावकर यांचेकडे सुपूर्द केले.
 
थिरकवा साहेबांचे शागीर्द पं. नारायण जोशी यांच्याकडील शिक्षणानंतर रवींद्रने पुणे भारत गायन समाज या महाविद्यालयातून ‘संगीत विशारद’ पदवी प्राप्त केली. याचबरोबर आता तो ‘एम.ए. संगीत’च्या शेवटच्या वर्षाला आहे. संवादिनीवादकाची उपलब्धता नसेल, तेव्हा वडील रवींद्रला पेटीच्या साथीसाठीही घेऊ लागले. दरम्यानच्या काळात ज्येष्ठ संवादिनीवादक पं. गोविंदराव पटवर्धन यांचेही मार्गदर्शन घेण्याची संधी रवींद्रला मिळाली आणि हार्मोनियमवादनातही त्याने प्राविण्य मिळवले. संगीताच्या क्षेत्रात अग्रक्रम मिळवणार्‍या गायनातही रवींद्रने मुशाफिरी यशस्वीपणे केली. पं. गजाननबुवा जोशी यांचे सुपुत्र पं. मधुकर जोशींकडे रवीने गायकीचे धडे घेतले आणि ते गिरवत असताना किरण फाळके यांच्याकडून गिटारचे शिक्षण घेऊन यशस्वी गिटारवादक म्हणून मान्यता मिळविली. तसेच वेस्टन स्टाईल कीबोर्ड अ‍ॅलेक्स डिसिल्वा यांच्याकडे शिकला. कठोर परिश्रमातून संगीत साधना केली, तरी त्यावर पोटाची भूक भागवण्याचा तो जमाना नसल्याची जाणीव असल्याने इतिहास, अर्थशास्त्र या आगळ्यावेगळ्या विषयांचा अभ्यास करून ‘बी.ए.’ पदवी तर मिळवलीच, शिवाय ‘मार्केटिंग मॅनेजमेंट’ही तो उत्तीर्ण झाला व त्याच्या जोरावर ‘टाटा हाऊसिंग’, ‘रहेजा’ आणि ‘अजमेरा’सारख्या प्रथितयश मल्टीनॅशनल कंपन्यांमधून उच्च पदाच्या नोकर्‍या केल्या. त्यांना जेआरडी टाटा आणि रतन टाटा यांना प्रत्यक्ष भेटण्याची संधी मिळाली. ज्येष्ठ नाटककार विद्याधर गोखले यांच्याबरोबरसुद्धा त्यांनी मिर्झा गालीबसाराचे बरेच कार्यक्रम महाराष्ट्रभर केले.
 
1988 सालीच ‘हेरंब स्कूल ऑफ म्युझिक’ या संस्थेची त्याने स्थापना केली. त्याकाळी शनिवार व रविवार हे दोनच दिवस तो शिकवत असे.पण, काही विद्यार्थ्यांच्या आग्रहाखातर गायनाचे नव्हे, तर जोडीला तबला, गिटार, कीबोर्ड, माऊथ ऑर्गन, ड्रमवादनाच्या शिक्षणाचे वर्ग सुरू करण्यासाठी नोकरीला रामराम ठोकला आणि डोंबिवली येथे मोठ्या प्रमाणात संगीताचे वर्ग सुरू केले. रवींद्रला गिटारचे शिक्षण देणार्‍या किरण फाळके यांची कन्या सोनिया यांनी तबल्याचे धडे गिरवत असताना रवींद्रबरोबर जीवनाच्या वाटेवरही पत्नी म्हणून साथसंगत केली. ‘हेरंब स्कूल ऑफ म्युझिक’तर्फे गंधर्व महाविद्यालय, पुणे गायन समाज, द्रिनिटी कॉलेज ऑफ लंडन व इन हाऊस लाईट म्युझिकच्या परीक्षेला बसवले जाते. आजपर्यंत हजारो विद्यार्थी वेगवेगळ्या परीक्षांत उत्तीर्ण होऊन संगीतावर आपला उदरनिर्वाह, त्याचप्रमाणे निरनिराळ्या ठिकाणी कलाकार म्हणून जगभरात आपले नाव करत आहेत. अक्षय कावळे (कीबोर्ड), कौस्तुभ दिवेकर (तबला), रोहन मोकल, हर्ष परमार (तबला ड्रम), त्याचप्रमाणे गाण्यात धवल भागवत, अनन्या नाईक, हार्दिक शुक्ल व अनेकजण आता या क्षेत्रामध्ये नाव कमावत आहेत.‘हेरंब म्युझिक’ने या वर्षापासून ‘एशियन इंटरनॅशनल’ या ‘यूजीसी’ मान्यताप्राप्त युनिव्हर्सिटीबरोबर टाय-अप केला आहे, ज्यायोगे आता विद्यार्थ्यांना संगीतात तर ‘बी.ए.’, ‘एम.ए.’ करता येणार आहेच, पण बाकी विषयांतही जसे की ‘हॉटेल मॅनेजमेंट’, ‘बी.कॉम.’, ‘एम. कॉम.’, ‘बी.एस्सी.’, ‘एम.एस्सी.’ तसेच ‘एम.बी.ए.’सारख्या अनेक परीक्षाना ‘हेरंब’च्या माध्यमातून बसता येणार आहे. याच काळात चार ऑडिओ कॅसेट निघाल्या आणि आंतरराष्ट्रीय लघुपटाला दिलेल्या संगीताला आशिया खंडात पहिला पुरस्कार प्राप्त झाला.
 
या प्रकारे संगीत प्रवास अनेक दिशांनी प्रगतिपथावर होता.याच पथावर त्याला अनेक पुरस्कार जसे की ‘केडीएमसी’तर्फे ‘डोंबिवली गौरव’, ‘आदर्श डोंबिवलीकर 2012’, ‘चैतन्य पुरस्कार 2013’, ‘प्रोफेशनल एक्सलन्स 2014’, रोटरी स्कूल, ‘कोकण संगीत भूषण पुरस्कार 2018’, ‘ताल साधक पदवी 2019’, स्वरमहिमा कला अ‍ॅकेडमी पुणे, ‘साहित्य गौरव पुरस्कार 2023’ साहित्य संस्था पुणे ‘झपताल’ या पुस्तकाचे प्रकाशन संगीतकार अनिल मोहिले यांच्या हस्ते पार पडल्यानंतर ‘गिटार’ पुस्तक प्रकाशन सोहळा ज्येष्ठ संगीतकार श्रीनिवास खळे यांच्या हस्ते संपन्न झाला, तर सदानंद नायमपल्ली यांनी ‘रूपक’चे प्रकाशन केले. ज्येष्ठ गायक पंडित मधुकर जोशी, संगीतकार दशरथ पुजारी, पंडित हृदयनाथ मंगेशकर अशा दिग्गज कलाकारांना साथसंगत करण्याचे भाग्य लाभले. काही वर्षांपूर्वी लातूरमध्ये भूकंप झाला होता. तेव्हा रवींद्र ‘टाटा’तर्फे कल्लारी व राजे या दोन गावांचे पुर्नवसन करण्यासाठी एक वर्ष या गावांमध्ये होते. त्यावेळी त्यांनी पूर्ण प्रशासकीय कामकाज जबाबदारी सांभाळली. त्यातून समाजासाठी काहीतरी करावं, हे रुजलं गेलं. यासाठी रतन टाटांकडून सत्कारही, झाला. त्यामधून ‘हेरंब स्कूल ऑफ म्युझिक डोंबिवली’ या संस्थेमार्फत शिष्यांच्या सहकार्‍यातून ‘हेरंब फाऊंडेशन’ची स्थापना करण्याचा मोठा टप्पा गाठला गेला. या संस्थेच्या माध्यमातून डोंबिवली येथील ‘अस्तित्व’, खोणी येथील ‘अमेय पालक संघटना’ आणि ‘भरारी’ अस्थी-विकलांग विद्यार्थ्यांचे कार्य करणार्‍या अशा संस्थांना भरघोस अर्थसाहाय्य देण्याचा उपक्रम अनेक वर्षे राबविला जात आहे. कर्करोगग्रस्त, मोतीबिंदूच्या रुग्णांनाही आर्थिक मदत उदात्त हेतूने ‘हेरंब’ करीत आहे. याशिवाय, महत्त्वाची बाब म्हणजे दर महिना 80 ते 100 रुग्णांना एक वेळच्या डायलिसिससाठी अर्थसाहाय्य करण्याचे उदात्त कार्य गेली अनेक वर्षे करीत आहे.
 
यासोबत शिक्षण क्षेत्रातही ‘हेरंब’ मदत करत आहे. दरवर्षी आरोग्य शिबीर, रक्तदान शिबीर असे अनेक उपक्रम ‘हेरंब’ राबवत असते. या उपक्रमांसाठी रवींद्र व त्यांचे सहकारी दरवर्षी रु. 8 लाख, 50 हजारांचे योगदान देतात. ‘हेरंब’ने संगीतकार दशरथ पुजारी, ज्येष्ठ तबलावादक पंडित सदाशिव पवार, ज्येष्ठ गायक पंडित मधुकर जोशी, धनंजय पुराणिक, चतुरस्र गायिका अपूर्वा गोखले अशा संगीत क्षेत्रातील दिग्गजांच्या सत्काराप्रमाणेच ‘अस्तित्व’च्या गुप्ते, ‘शबरी समिती’चे करंदीकर दाम्पत्य, ‘विश्व हिंदू परिषदे’चे आप्पा जोशी आणि पनवेलजवळच्या ‘देह रंग’चे मोहन बापट अशा सामाजिक संस्थांतील ऋषितुल्य व्यक्तींचा सन्मान केला आहे. संगीत क्षेत्रात सर्व क्षितिजे यशस्वीपणे पादाक्रांत करणार्‍या रवींद्र पोंक्षे यांना मनापासून धन्यवाद आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा!
 
- श्रींकात पावगी
'मुंबई तरुण भारत'चं व्हॉट्सअप चॅनल फॉलो करा!
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121