धर्म-अधर्माच्या नावावर...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    17-Sep-2021   
Total Views |

vaccine_1  H x
 
 
कोरोनाने जगाचे स्वरूप बदलले. मात्र, काही बाबी अजूनही कायम आहेत. त्यापैकी एक म्हणजे, ‘आमच्या धर्मात अमुक चालत नाही, आमच्या धर्मात तमुक चालत नाही.’ अमेरिकेमध्ये कोरोनाचा कहर सुरुच आहे. कोरोनामुळे मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्याही जास्त आहे. म्हणूनच सर्व नागरिकांना कोरोनाची लस देण्याचा अमेरिकेचाही संकल्प आहे. व्यक्तिस्वातंत्र्य आणि धार्मिक स्वातंत्र्याचे आपण कैवारी आहोत, हे अमेरिका नेहमी दाखवत असते. मात्र, या स्वातंत्र्यप्रेमामुळे अमेरिकेसमोर सध्या एक वेगळी समस्या निर्माण झाली आहे. अमेरिकेतील हजारो कामगारांनी कोरोनाची लस घेण्यास नकार दिला आहे. धार्मिक असमर्थता दाखवत या कामगारांनी कोरोनाची लस चक्क नाकारली आहे. कोरोनाची लस कोणत्या घटकापासून बनवली जाते, याचा साधा गंधही या कर्मचाऱ्यांना नाही. पण, तरीही ‘आमच्या धर्मात कोरोनाची लस घेणे लिहिले नाही,’ असे म्हणत हजारो कामगारांनी लस घेण्यास नकार दिला. दुसरीकडे हे लोण फ्रान्समध्येही पोहोचले. आता फ्रान्सच्याही हजारो लोकांनी कोरोनाची लस घेण्यास नकार दिला. कारण, त्यांच्या धर्मात कोरोनाची लस घेणे प्रतिबंधित आहे. या कारणामुळे फ्रान्स आणि अमेरिकेमध्ये काही समाज अभ्यासकांनी चिंता व्यक्त केली आहे. त्यांचे म्हणणे आहे की, सरकार आणि प्रशासनाने केलेल्या लोककल्याणकारी योजनेला धर्माच्या नावावर विरोध करणे चुकीचे आहे. त्यातही कोरोनाची लस घेणे यात अधार्मिकपणा तो काय? याबद्दलही लस न घेणारी माणसं काही सांगत नाहीत. कोरोनाची लस घेणार नाही, कारण आमच्या धर्मात कोरोना लस घेणे अधर्म आहे, असे ही लोकं सांगतात. आता काही लोकांचे म्हणणे आहे की, कोरोना २०२० साली जगात आला. जगातले सगळेच धर्म त्यापूर्वीचे. मग धर्माने कोरोना लस विरोधात कधी नियम बनवले? कोरोना लस अधार्मिक ठरवण्याचे प्रयोजन काय असावे? तर्कशुद्ध पद्धतीने विचार केला असता, या विधानाला सत्याचा काहीच अंश नाही. उन्माद, वेडेपणा आणि मूर्खपणाची अतार्किकता हेच यामागचे कारण आहे. लस नाकारणाऱ्यांचे म्हणणे आहे की, त्या सर्वोच्च शक्तीने जन्म-मृत्यू ठरवला आहे. त्याच्या इच्छेशिवाय एक पानही हालत नाही. त्याची इच्छा असेल, तर आम्ही मरू. मग कोरोनाची लस का घ्यावी? पण, खोलवर विचार करता त्यांचे म्हणणे पटत नाही. कारण, इतर वेळी ताप-पडसे अगदी खोकला झाल्यावर याच लोकांनी इंजेक्शन आणि औषधं घेतली आहेत. परमेश्वराची इच्छा असेल तर ताप, सर्दी, खोकला जाईल, असे या लोकांना पूर्वी कधी का वाटले नाही? मग कोरोनाच्या लसीबाबतच असे का वाटावे? तर अमेरिका आणि फ्रान्समधील काही अभ्यासकांनी याचा मागोवा घेतला. त्यात सत्य समोर आले.
 
 
 
कोरोना लस नाकारणाऱ्या लोकांना भीती वाटत होती. ही लस आपल्याला नपुंसक बनवण्यासाठी दिली जात आहे. आपली लोकसंख्या कमी करण्यासाठी ही लस देत आहेत, असे या लोकांचे म्हणणे. यावरून एकच कळते की, कोरोनाची लस अधार्मिक मानणाऱ्यांना धर्म वगैरे जरी नाव घेतले, तरी त्यांच्या मनात अल्पसंख्याक आणि बहुसंख्याक या संख्याबळाचा खेळ कायम आहे. भारतातही काही ठरावीक वस्त्यांमध्ये हे सुरू आहे. समाजाची जो धारणा करतो तो धर्म. पण, काही लोक समाजात अस्थिरता माजवत त्या गोष्टी धर्माच्या नावावर खपवत असतात. असेच सध्या जगभरात सुरू आहे. अफगाणिस्तान आणि इतर राष्ट्रांत काय सुरु आहे ते तर अगदी जगजाहीर. महिलांना पशूसारखे कोंडवाड्यात कोंडणे हे कोणत्या धर्मात लिहिले असेल का? माणसांना किड्या-मुंग्यासारखे टिपून मारावे, असे कुठच्या धर्माचे सूत्र असू शकते का? १९व्या शतकाच्या शेवटी युरोपमध्ये ‘चेटकीण प्रथा’ ही अशीच धर्माच्या नावावर खपवली गेली. त्याच काळात आफ्रिकेतील अश्वेतवर्णीय आणि आशिया खंडातील गहूवर्णीय हे गुलाम म्हणूनच जगण्यासाठी जन्माला येतात, असा ठाम विश्वास असणारे देशही होते. त्यांच्या अशा समजुतीला आधार काय होता? तर धर्माचाच. ‘क्रुसेड’ याचे उत्तम उदाहरण. पुढे मुस्लीम दहशतवाद्यांचा ‘जिहाद.’ थोडक्यात, धर्माच्या नावावर काहीही खपवण्याचे चित्र काही जुने नाही. हे सगळे चित्र उलगडताना भारतातसुद्धा पूर्वी अस्पृश्यता आणि इतर अमानवी प्रथांना काही तथाकथित धर्ममार्तंडांनी धर्माचा आधार देण्याचा खोटा प्रयत्न केला होता. भारताचे सुदैव की, भारतात अनेक समाजसुधारक, तत्त्वचिंतकांच्या पुण्याईमुळे या भयंकर प्रथा नामशेष होत आहेत. अमेरिका, युरोपातही चेटकीण, गुलामी, अनिष्ट प्रथा मोडल्या गेल्या. जगात धर्म-अधर्म करत असे घडतच राहणार, हे नक्की!
 
 
@@AUTHORINFO_V1@@