मुंबईतील स्व. अटल बिहारी वाजपेयी शिवडी-न्हावा शेवा अटल सेतू हा भारतातील सर्वांत मोठा सागरी सेतू आणि कालच पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन झालेला चिनाब रेल्वे पूल हा जगातील सर्वाधिक उंचीवरील रेल्वे पूल ठरला. अटल सेतू शिवडी ते नवी मुंबईच्या पुढे न्हावा-शेवा असा तब्बल २१ किमीचा. असाच अविस्मरणीय प्रवासाचा अनुभव देणारा दुसरा पूल आहे, तो मुंबई सागरी किनारा रस्ता, ज्यावरून पावसाळ्यात मुंबईकरांचा विलोभनीय दृश्य अनुभवत प्रवासाचा आनंद अगदी द्विगुणित होतो. मात्र, हे प्रकल्प जगभरातील अनेक प्रकल्पांतून प्रेरणा आणि अभ्यास करून भारतात साकारण्यात आले आहेत.
जगभरातील हे पूल खरं तर अभियांत्रिकीचा अद्भुत अविष्कार. हे पूल या भागातील स्थानिकांना, स्थळांना आणि संस्कृतींना जोडणारा एक दुवा. विशेषतः हे सागरी पूल मानवी कल्पकतेचे प्रतीक आहेत, जे भूभागांना जोडण्यासाठी विशाल जलप्रवाहांवर मात करत उभारण्यात आले आहेत. हे प्रभावी सागरी पूल केवळ अभियांत्रिकी अविष्कार नाहीत, तर मानवी दृढनिश्चय आणि सर्जनशीलतेचेही प्रतीक आहेत. हे प्रकल्प त्या क्षेत्राची आर्थिक वाढ सुलभ तर करतात, पण त्याचबरोबर लोकांना व प्रदेशांना जोडणारे दुवे प्रदान करतात. आज जगातील अशाच सर्वांत प्रभावी सागरी सेतूंचा आढावा घेऊया, ज्यांनी असाधारण स्थापत्य आणि अभियांत्रिकीचा आदर्श प्रस्थापित केला आहे.
डेन्मार्क आणि स्वीडनदरम्यान ‘ओरेसुंड पूल’ हा डेन्मार्कमधील कोपनहेगन आणि स्वीडनमधील मालमोला शहरांना जोडणारा रेल्वे आणि महामार्ग असा संयुक्त पूल. हा १६ किमी लांबीचा पूल ओरेसुंड सामुद्रधुनी ओलांडतो. या पुलावरील केबल-स्टेड ब्रीज आणि एक कृत्रिम बेट, पेबरहोम हे प्रमुख आकर्षणाचे ठिकाण. हा पूल डॅनिश बाजूला पाण्याखालील बोगद्यातून जातो. या मार्गामुळे दोन्ही देशांमधील आर्थिक संबंध अधिक मजबूत झाले आहेत. याचसोबत डेन्मार्क आणि स्वीडनदरम्यान प्रवास सुलभ आणि अधिक वेगवान झाला आहे.
‘चेसापीक बे’ हा अमेरिकेतील उड्डाणपूल आणि बोगदा रस्ता प्रकल्प. चेसापीक बे ब्रिज बोगदा हा अमेरिकेतील चौथ्या क्रमांकाचा सर्वांत लांब पूल आहे, ज्याची एकूण लांबी २८ किमी इतकी. तो व्हर्जिनियाच्या पूर्व किनार्याला मुख्य भूमीशी जोडतो. त्याच्या अद्वितीय डिझाईन आणि बांधकामामुळे हा पूल-बोगदा अभियांत्रिकी अविष्कार मानला जातो. याचे क्रॉसिंग मुख्य शिपिंग चॅनेलच्या खाली दोन ठिकाणी बोगद्यांमध्ये बांधले आहे. सरासरी ४० फूट खोल पाण्यात बांधलेली चार कृत्रिम बेटे हे प्रवेशद्वार म्हणून काम करतात, ज्यातून रस्ता बोगद्यांमध्ये प्रवेश करतो.
‘ओव्हरसीज हायवे’ म्हणून ओळखला जाणारा अमेरिकेतील एक लोकप्रिय राष्ट्रीय महामार्ग आहे, जो मुख्य भूमीच्या दक्षिण टोकापासून ११३ मैल अंतरावर ४४ उष्णकटिबंधीय बेटांवर ४२ पुलांसह विस्तारलेला आहे. या मार्गावरून प्रवास करणारी व्यक्ती एकूण प्रवासाच्या १५ टक्क्यांहून अधिक वेळ पुलांवर घालवते. याशिवाय, ओव्हरसीज हायवेवरील सर्वांत लांब पूल सेव्हन माईल ब्रिजदेखील आहे, जो सर्वाधिक लोकप्रिय आहे. या महामार्गावर एकूण ४२ पूल आहेत. या मार्गातून जाणारी सर्वच बेटे ही स्फटिकासारख्या स्वच्छ पाण्याने वेढलेली आहेत, जिथे अटलांटिक महासागर मेसिकोच्या आखाताला मिळतो आणि फ्लोरिडा उपसागर पसरलेला आहे. हा परिसर चमकदार समुद्र, पांढरे वाळूचे किनारे आणि हिरवळीने नटलेले त्याच्या अद्भुत सौंदर्यासाठी ओळखला जातो.
आज वाढत्या लोकसंख्येमुळे जलद प्रवास सुनिश्चित करण्यासाठी जगभरात विविध पर्यायांवर विचारविमर्श सुरू आहे. अशावेळी जागतिक कल हा अधिक शाश्वत, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून कमी खर्चात चांगल्या पायाभूत सुविधा उभारण्याकडे दिसून येतो. हे पाहता, महत्त्वाच्या आर्थिक आणि शहरी केंद्रांना जोडण्यासाठी पाश्चात्य देशांत नेहमीच अभियांत्रिकी अविष्कार म्हणून सागरी पूल, नदीवरील पूल बांधण्यावर भर देण्यात आला. हे पूल आर्थिक केंद्र जोडणारे तर होतेच, मात्र त्या त्या क्षेत्राच्या सौंदर्यातही त्यांनी भर टाकली. हे पाहता, आता भारतातही आज अटल सेतू, पम्बन ब्रिज, यांसारखे पूल आज जगाच्या अभियांत्रिकी स्पर्धेत आपल्या देशाचे नाव उंचावत आहेत.