हजारो शब्दांना जी किमया साधता येणार नाही, ते काम एक चित्र करू शकते. चित्र हे माणसाच्या अभिव्यक्तीचे अत्यंत सकस असे दृश्य माध्यम. कलाकुसर करून अत्यंत बारकाईने निर्माण केलेल्या चित्रापासून ते आजच्या ‘एआय’ जनरेटेड फोटोच्या युगापर्यंत, चित्रांच्या मोहिनीपासून कुणाचीही सुटका झालेली नाही. परंतु, आपल्यासमोर जे चित्र आहे, तेच सत्य आहे का? असा विचार आता बहुतांशी लोक करत आहेत. तंत्रज्ञानाच्या अतिक्रमणामुळे वास्तव आणि आभास यातील रेषा हळूहळू धूसर होत असून, सत्याचा शोध घेणे दिवसेंदिवस अवघड झाले आहे. परंतु, आज कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वापरामुळेच या गोष्टी घडत आहेत असे नाही. इतिहासामध्ये प्रसिद्धी पावलेल्या चित्रांच्या मागचे सत्य बरेचदा आपल्याला माहीत नसते किंवा कधी कधी त्या चित्राभोवती रचलेल्या कथांनाच आपण वास्तव समजण्याची चूक करतो. अशीच काहीशी गोष्ट घडली आहे, एका युद्धाच्या चित्राबाबत.
अमेरिका-व्हिएतनाम युद्धामुळे दोन्ही बाजूला मोठ्या प्रमाणात मनुष्यहानी, वित्तहानी झाली. व्हिएतनाममध्ये सुरू असलेल्या युद्धाचे वास्तव लोकांसमोर येण्यासाठी, एक दशकापेक्षा जास्त काळ जावा लागला. परंतु, दुर्दैवाने तोपर्यंत कधीही न भरून येणारे नुकसान झाले होते. अशातच 1972 साली एका छायाचित्रकाराने काढलेल्या छायाचित्राची जगभरात चर्चा झाली. या छायाचित्रामध्ये असे दिसते की, रस्त्यावरून काही मुलं पळत आहेत. त्यामध्ये एक लहान मुलगी विवस्त्र आहे. त्यांच्या मागे काही सैनिक उभे आहेत. निक युट या छायाचित्रकाराने हे छायाचित्र काढल्याचे म्हटले गेले. 1973 साली या छायाचित्राला ‘वर्ल्ड प्रेस फोटो ऑफ द इयर’चा पुरस्कार सुद्धा मिळाला. या छायाचित्राला काही काळाने ‘नापलम् गर्ल’ असेसुद्धा काहींनी संबोधित केले.
व्हिएतनामच्या युद्धातील भीषण वास्तवाची प्रचिती या छायाचित्राच्या माध्यमातून येते, असे मत काहींनी व्यक्त केले. या छायाचित्रानंतर निक युट यांचा पत्रकारितेमध्ये चांगलाच जम बसला. ‘द टेरर ऑफ वॉर’ हे नाव या छायाचित्राला देण्यात आले. मात्र, 2025 साली प्रदर्शित झालेल्या ‘द स्ट्रिंगर’ या माहितीपटामध्ये हे छायाचित्र निक यांनी काढलेले नसून, छायाचित्रकार न्गुयेन थान न्घे यांनी काढले आहे, असा दावा करण्यात आला. या दाव्यामुळे निक यांच्या विश्वासार्हतेवर प्रश्न उपस्थित केला गेला आहे. या माहितीपटामुळे ‘वर्ल्ड प्रेस फोटो’ या संस्थेने, तपासकार्याला सुरुवात केली. तपासाअंती असे लक्षात आले की, दक्षिण व्हिएतनामच्या परिसरात जिथे हा फोटो काढण्यात आला होता, त्याचे भौगोलिक स्थान, कॅमेराचा वापर, अंतर या सर्व गोष्टी लक्षात घेता हा फोटो न्गुयेन थान न्घे किंवा हुएन्ह काँग फुक या छायाचित्रकारांनी काढण्याची शक्यता जास्त आहे. दुसर्या बाजूला व्हिएतनामच्या असोसिएटेड प्रेसने या दाव्याची तपासणी केली आणि निक यांचे श्रेय कायम ठेवले. छायाचित्राच्या खरेपणावर संशायाचे काळे ढग पसरल्यामुळे ‘वर्ल्ड प्रेस फोटो’ने मालकीची अधिकृतपणे नोंद न घेता तो ‘अज्ञात’ आहे, असे घोषित केले. यापुढे ‘वर्ल्ड प्रेस फोटो’ या संस्थेच्या म्हणण्यानुसार, कदाचित हा फोटो खरोखर कुणी काढला याचे वास्तव आपल्यासमोर येणार नाही.
इतिहासाच्या पानांमध्ये आणि विशेषतः युद्ध पत्रकारितेमध्ये, अशा दृश्य माध्यमांना आणि पुराव्यांना विशेष महत्त्व आहे. कारण, ही छायाचित्र केवळ इतिहास मांडत नाहीत, तर त्या त्या ठिकाणी असलेल्या लोकांची मनोभावना आपल्याला सांगत असतात. चित्र माणसाशी संवाद साधतात, विस्मृतीत गेलेल्या काळाचे दर्शन आपल्याला चित्रांच्या माध्यमातून घडते. छायाचित्रांमध्ये मानवी संवेदनांचे अवशेष दडलेले असतात, ज्यामुळे बघणार्यांसाठी ती कधीही जुनी होत नाही. काळाच्या ओघात उलट ती अधिकच मौल्यवान झालेली आपल्याला बघायला मिळतात. ज्या वेळेस ‘एआय’च्या माध्यमातून ‘घिबली’ थीममधून निर्माण केलेल्या चित्रांचा वाद घडत होता, त्यावेळीसुद्धा या चित्रांची निर्मिती आणि मालकी हक्क याच विषयाचा वाद चव्हाट्यावर आला होता. कायद्याच्या दृष्टीने यावर अनेक खलबते सुरू असतात. छायाचित्रावर मालकी हक्क कोणाचाही असो, स्वामित्व वा हक्कांच्या बाबतीत आपल्याला सतर्क राहायला हवे, हाच धडा आपण यातून घ्यायला हवा.